...अँड इट वॉज ऑल यलो! (नाममुद्रा)

...अँड इट वॉज ऑल यलो! (नाममुद्रा)

उण्यापुऱ्या ३९ वर्षांचा हा ख्रिस मार्टिन आपल्या सुरेल  गाण्यांनी जगाला वेड लावतो आहे. रविवारीच त्याचा भन्नाट कार्यक्रम मुंबईतल्या बीकेसी मैदानावर पार पडला. त्या झिंगाट कार्यक्रमाच्या धुंदीतून मुंबईची तरुणाई अद्यापही सावरली नसणार. नोटाबंदीच्या गडबडगुंड्यानंतर एटीएमपुढे रांगा धरण्याऐवजी तरुणांचे जत्थे रविवारी बीकेसी मैदानाकडे वळले. सव्वा किलोमीटरच्या रांगेत उभे राहून लोकांनी प्रवेश मिळवला. ग्लॅमर जगतानेही हा दुर्मीळ योग चुकवला नाही. ए. आर. रहमानपासून अरिजित सिंगपर्यंत असंख्य गायक-गायिकांनी ख्रिस मार्टिनच्या साथीने आपापले गळे साफ करून घेतले. कोण आहे हा रॉकसंप्रदायाचा नवा संप्रति अवतार?

इंग्लंडमध्ये व्हाइटस्टोनमध्ये जन्मलेल्या ख्रिस्तोफर मार्टिननं कॉलेजात असतानाच आपला बॅंड सुरू केला. साल होतं १९९६, तेव्हा बॅंडचं नाव होतं पेक्‍टोराल्झ. जॉनी बकलॅंड ह्याला जोडीला घेऊन ख्रिस चिमुकले कार्यक्रम करत असे. पुढे लवकरच विल चॅंपियन आणि गाय बेरीमॅन त्याला सामील झाले. बॅंडचा व्यवस्थापक म्हणून फिल हार्वे पुढे आला. १९९६ मध्ये त्यांनी बॅंडचं नाव बदलून कोल्ड प्ले असं ठेवलं. दशकभरात कोल्ड प्लेनं रॉकचा चेहरामोहराच बदलून टाकला. ‘आम्ही पेश करतो ते हार्ड रॉक नाही. लाइमस्टोन रॉक म्हणा हवं तर...’ असं ख्रिस गंमतीने म्हणतो. पण ते जे काही आहे, ते जगाला आवडतं, हे मात्र खरं. २००० मध्ये त्यांचा ‘पॅराशूट्‌स’ हा आल्बम रसिकांनी डोक्‍यावर घेतला. त्यातलं ‘यलो’ हे गाणं तर अजूनही वाजतगाजत असतं. ‘पॅराडाइज’, ’विवा ला विदा’, ‘फिक्‍स यू’ अशी डझनभर तरी त्याची गाणी आज जगभरातल्या तरुणाईच्या ओठांवर आणि कानांवर आहेत. सच्चा सूर, तरुणाईच्या स्पंदनांशी थेट नातं सांगणारी शब्दरचना आणि सभ्य, सुसंस्कृत पेशकश ही कोल्ड प्लेची ढोबळ वैशिष्ट्यं. ख्रिस मार्टिन ठरल्याप्रमाणे मुंबईत आला, त्यानं जिंकलं आणि तो गेलाही! राजकारणाचा शिमगा व्हायचा तितका झाला. त्याचं कवित्वही काही दिवस चालेल. ख्रिसच्या कार्यक्रमाला राजाश्रय मिळाला होता. मनोरंजनकरातून मुक्‍ती, मैदानाच्या भाड्यात सवलत, अशा अनेक गोष्टींचा वर्षाव सरकारने केला. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी या सवलती दिल्या, असा आरोप होत असला तरी तरुणाई त्याकडेही दुर्लक्षच करेल, याचे कारण राजकारणाच्या कळकट रंगापुढे ख्रिसच्या गाण्यांचा रंग लॅबर्नमच्या पिवळ्यारंजन घोसांसारखा झगझगीत ‘यलो’ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com