
ढिंग टांग : जागावाटप वॉर..!
प्रिय मित्रवर्य मा. नानासाहेब यांसी, गेले सहा- आठ महिने मी रोज सरासरी साडेतीनशे सेल्फी काढून देतो. माझ्याकडे कोणीही निवेदन घेऊन आले की लगेच आश्वासन देतो, आणि त्यांना सेल्फीसाठी उभे करतो. तथापि, काल दिवसभरात मी कुणाही सोबत फोटो काढून घेऊ शकलो नाही.
याला कारणीभूत तुमचे अध्यक्ष मा. बावनकुळेसाहेब आहेत. या गृहस्थांकडे गेल्या टायमाला वीज खाते होते, अजूनही ते शॉक देऊ शकतात, हे काल कळले! कृपया त्यांना आवरता येईल का, ते पहावे.
राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत, त्यातल्या फक्त ४८ जागा (फक्त हां!) शिंदेसेनेला दिल्या जातील, दोन्ही पक्ष मिळून दोनशे जागा जिंकतील, असे मा. बावनकुळेसाहेब म्हणाल्याचे कळले. फक्त अठ्ठेचाळीस जागा?
बावनकुळेसाहेबांनी निदान बावन्न तरी म्हणायला हवे होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होता, तेव्हा मी काही अभ्यागतांसमवेत सेल्फी घेत होतो. मी बघेपर्यंत तो डिलीट करुन टाकण्यात आला.
…खरे काय आहे? त्यांच्या या जागावाटपाच्या घोषणेमुळे कालपासून आमच्या पक्षातील इनकमिंग थंडावले आहे. एक माजी नगरसेवक तर दाराशी येऊन (चहा पिऊन) परत गेला. सेल्फीलादेखील चक्क नको म्हणाला.
मा. बावनकुळेसाहेबांनी जागावाटप जाहीर केल्याने आमच्या पक्षातले चाळीस आमदार भडकले आहेत. मंत्रिमंडळात नाही तर नाही, पण तिकिट मिळणाऱ्या ‘त्या’ ४८ जणांमध्ये तरी आमचा नंबर लागणार का? असा प्रश्न विचारु लागले आहेत.
काय करावे? असेच चालू राहिले तर मला पुन्हा गुवाहाटीला जावे लागेल, आणि त्याला जबाबदार सर्वस्वी तुमचे बावनकुळेसाहेब असतील. कळावे. (तरीही) आपला विनम्र. कर्मवीर लोकनाथ (मु. पो. ठाणे)
प्रिय मित्र मा. कर्मवीर, शतप्रतिशत प्रणाम. तुमच्या सेल्फी कार्यक्रमात व्यत्यय आल्याचे ऐकून वाईट वाटले. चहा आणि सेल्फी हे दोन्ही घटक तुमच्या कारकीर्दीचे अविभाज्य घटक आहेत. आमच्या मा. बावनकुळे यांच्या भाषणाचे फारसे मनावर घेऊ नका. तुमचे चहा-सेल्फी चालू राहू द्या. मी तुम्हाला शब्द दिला आहे, हे लक्षात ठेवा!
आमच्या बावनकुळेसाहेबांनी ते वक्तव्य ‘असेच गंमत म्हणून’ केले होते. त्यांना मी स्वत: फोन करुन खुलासा विचारला होता. ते निरागसपणे म्हणाले, ‘‘आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना हुरुप यावा म्हणून सहज बोललो!’’
‘‘…पण अठ्ठेचाळीस हा आकडा कुठून काढलात?,’’ मी विचारले. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर मासलेवाईक आहे. मी कांदाच मागवला!
‘‘त्याचं काय झालं की मी खरं तर उलटंच बोललो होतो. २४० जागा शिंदेसेनेला आणि आपण फक्त ४८ जागा लढवायच्या आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, असं मी कार्यकर्त्यांना सांगत होतो..,’’ बावनकुळेसाहेबांच्या या उत्तराने मी हबकलो, आणि स्वत:च घाईघाईने त्यांचा व्हिडिओ डिलीट करायला सांगितला. तो तसाच ठेवला असता तर आमचीच गोची झाली असती.
जागावाटपाचे अजून काहीही ठरलेले नाही, हे तुम्ही जाणताच. गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला (ठाकरे २१, राष्ट्रवादी १९ आणि काँग्रेस ८) जाहीर झाला होता. तीदेखील वावडीच होती. आपण का मागे राहायचे?
असे आपल्या लोकांना वाटणारच. त्याच हेतूने ही पुडी बावनकुळ्यांनी सोडून दिली असावी, असे मला वाटते. खरे खोटे दिल्लीश्वरच ठरवतील. सोशल मीडियावर माणसाला हल्ली मागे पडून चालत नाही. तिथे युद्ध चालू आहे, आणि तुम्ही वॉरियर आहातच!
…यथावकाश आपण दिल्लीला जाऊ, आणि जागावाटपाचे पक्के करुन घेऊन. कळावे. आपला एकनिष्ठ. नानासाहेब फ.