श्रमिकांचा आधारवड

yashwant chavan
yashwant chavan

कॉम्रेड यशवंत चव्हाण यांच्या निधनाने कामगार चळवळीतील एक ज्येष्ठ दुवा हरपला आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी ते काळाच्या पडद्याआड गेले. अलीकडचा काही काळ सोडला, तर आयुष्यभर त्यांनी अखंडपणे चळवळीचा झेंडा सोडला नाही. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ चळवळीत सक्रियपणे काम करणे सोपे नाही. कामगार चळवळ ही खरे तर संघर्षाचीच वाट आहे. या वाटेवर इतका दीर्घकाळ कार्यरत राहणे, हे ध्येयापोटी समर्पणाने काम करणारी व्यक्तीच करू शकते. एखाद्या व्यक्तीचे केवळ अस्तित्वही अनेकांना आधारवड ठरते; पण चळवळीचा हा आधारवड आता राहिला नाही, हे दुःखदायक आहे. कामगार चळवळीपुढे आधीच असलेल्या आव्हानांत सध्या आणखी भर पडत आहे. अशा स्थितीत चळवळीतील जुन्या, जाणकार आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकणाऱ्या नेत्याची ‘एक्‍झिट’ एकूणच कामगार चळवळीसाठीही धक्कादायक म्हणावी लागेल.

यशवंत चव्हाण मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील रावबहाद्दूर चव्हाण हे संस्थानकाळात न्यायाधीश होते. पण यशवंत हे संस्थानविरोधी चळवळीत सक्रिय होते. तरुणपणीच त्यांचा संघर्ष सुरू झाला. पुढे कामगार चळवळीत काम करताना त्यांनी सर्व श्रमिक संघाची स्थापना केली. त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा पगडा होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून त्यांनी दीर्घकाळ विविध चळवळीत योगदान दिले; पण पुढे १९४२ मध्ये पक्षांतर्गत मतभेदांमुळे आणखी काही सहकाऱ्यांसह ते कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडले. चळवळीची कास मात्र त्यांनी सोडली नाही. लाल निशाण पक्षाची पक्षाची स्थापना करून ते त्या माध्यमातून कामगारांच्या हक्कासाठी लढत राहिले. अगदी अलीकडेच त्यांचा लाल निशाण पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन झाला. हे विलीनीकरण म्हणजे डाव्या चळवळीच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरेल. चळवळीची उमेद जागवणारी व बळ वाढवणारी ही घटना आहे, असा विश्‍वास या चळवळीतील मान्यवरांनी व्यक्त केला होता. यशवंत चव्हाण आज हयात नसले तरी त्यांचा विचार आणि आचार चळवळीत नव्याने येणाऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक असेल. शेवटच्या श्‍वासापर्यंत त्यांनी वैचारिक बांधिलकीशी कधी तडजोड केली नाही. वर्तमानाचा विचार करता याला खूपच महत्त्व आहे. साधी राहणी आणि केलेल्या कामाचा कधीही गवगवा न करण्याचा त्यांचा स्वभावही विशेष उल्लेखनीय. कामगार चळवळीतील ते एक व्रतस्थ कर्मयोगी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com