टपाल खात्याची खुशाली (मर्म)

टपाल खात्याची खुशाली (मर्म)

"गंगाजला‘ची बाटली; तीही टपाल खात्यात विक्रीला आली आहे, असे कळताच कोलकाता आणि सिलिगुडी येथील टपाल कार्यालयांमध्ये लोकांची एकच झुंबड उडाली आणि हातोहात सर्व बाटल्या खपल्या. अनेकांना निराश होऊन परतावे लागले. थोडक्‍यात टपाल खात्याच्या या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. काहीतरी नवे, कल्पक मार्ग काढले, तर सध्याच्या स्पर्धेच्या जमान्यातही टिकून राहता येते, याचा हा "वस्तु‘पाठ. परंतु, केवळ नव्या कल्पना मांडून आणि राबवून पुरेसे नाही, तर त्या अनुषंगाने संपूर्ण व्यवस्थेने कात टाकायला हवी. टपाल खात्याच्या बाबतीत ते झाले आहे, असे अजूनही म्हणता येत नाही आणि म्हणूनच त्याच्या खुशालीची चिंता.

वास्तविक काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत शहरापासून खेड्यापाड्यापर्यंत दीड लाखाहून अधिक कार्यालये असलेले हे खाते. विश्‍वासार्हता हे त्याचे बलस्थान. आता गरज आहे ती त्याला वेगाची जोड देण्याची. टपाल खात्याचे आधुनिकीकरण ही काळाची हाक आहे, हे ओळखून आपल्याकडे त्याची योजना आखण्यात आली. त्यानंतर काही प्रमाणात चित्र बदलले; परंतु आव्हानांचे स्वरूप पाहता अजूनही बरेच अडथळे कायम आहेत. दळणवळणाच्या बाबतीत कुरिअर कंपन्यांशी आणि बचत योजनांच्या बाबतीत इतर विविध गुंतवणूक पर्यायांची स्पर्धा आहे. त्याला तोंड द्यायचे तर कार्यपद्धतीत आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच; परंतु भक्कम पायाभूत सुविधा हा कळीचा मुद्दा आहे. ग्राहकाला आता कमी वेळेत सेवा हवी आहे, मग ती बॅंकिंगची असो वा दळणवळणाची. ती गरज भागविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित आणि पुरेसे मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि आनुषंगिक सुविधा मिळाल्या हव्यात. टपाल खात्यात पेमेंट बॅंकिंगही आणायचे असेल, तर या गोष्टी फारच महत्त्वाच्या ठरतात. कर्मचारी वर्गानेही लवचिकता, कार्यक्षमता आणि व्यावसायिकता या त्रिसूत्रीचा अवलंब केला, तर या खात्याचा अक्षरशः कायापालट होऊ शकतो. त्यांनी या सगळ्या बदलांकडे नवी संधी म्हणून पाहिले तर त्यांना "इकडील सर्व क्षेम‘ असे समाधानाने म्हणता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com