शर्त महंगी पड सकती है गोरे साब!

श्रीमंत माने shrimant.mane@esakal.com
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

पिअर्स मॉर्गन हे पश्‍चिमेकडील माध्यम क्षेत्रातले मोठे नाव आहे. "द सन‘, "न्यूज ऑफ द वर्ल्ड‘, "डेली मिरर‘, "सीएनएन‘ आणि आता "मेल ऑनलाइन‘ अशा नामांकित संस्थांच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा आहे. तर हे मॉर्गन गेल्या आठवड्यात काही कारण नसताना भारताविरुद्ध घसरले. 

पिअर्स मॉर्गन हे पश्‍चिमेकडील माध्यम क्षेत्रातले मोठे नाव आहे. "द सन‘, "न्यूज ऑफ द वर्ल्ड‘, "डेली मिरर‘, "सीएनएन‘ आणि आता "मेल ऑनलाइन‘ अशा नामांकित संस्थांच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा आहे. तर हे मॉर्गन गेल्या आठवड्यात काही कारण नसताना भारताविरुद्ध घसरले. 

"सव्वा अब्जाचा देश दोन हरलेल्या पदकांचा जल्लोष करतोय, हे नामुष्कीजनक नाही का‘‘, असा सवाल त्यांनी भारतीयांच्या रिओ ऑलिंपिकमधील सुमार कामगिरीच्या अनुषंगाने ट्‌विटरवर विचारला अन्‌ या सोशल मीडियावर प्रचंड फॉर्मात असलेल्या क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या तडाख्यात सापडले. गेले आठ-दहा दिवस मॉर्गन व सेहवाग यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलाय. 

"हो आम्ही छोट्या छोट्या यशाचाही आनंद घेतो; पण, क्रिकेटचा शोध ज्यांनी लावला ते ब्रिटिश अजून विश्‍वकरंडक जिंकू शकलेले नाहीत, हे नामुष्कीजनक नाही का‘‘, असा प्रतिसवाल वीरूने विचारला. हजारो भारतीयांनी त्याच्या सुरात सूर मिसळला. मग "इंग्लंडचा क्रिकेट विश्‍वकरंडक व भारताचे ऑलिंपिक सुवर्णपदक‘ यावर दहा लाखांची पैज मॉर्गनने लावली. भारताने आतापर्यंत नऊ सुवर्णपदके जिंकल्याचे लक्षात आल्यानंतर तो "ट्‌विट‘ हटवला व यापुढचे सुवर्णपदक अशी दुरुस्ती करणारा "ट्‌विट‘ टाकला. त्यावरूनही मॉर्गनविरोधात जोरदार फटकेबाजी झाली. "शर्त महंगी पड सकती है गोरे साब, जिसने लगाई थी, नोकरी भी गई और बहन भी‘‘, अशी "लगान‘ चित्रपटाच्या कथानकाची आठवण करून देणारी प्रतिक्रिया उमटली. इंग्लंडच्या महाराणीकडे असलेल्या कोहिनूर हिऱ्याचा विषयही निघाला. मॉर्गनची भारतीय आवृत्ती अर्णब गोस्वामीने म्हणे या मुद्द्यावर वीरेंद्रला "न्यूज अवर‘मध्ये चर्चेसाठी निमंत्रित केले होते. तथापि "असला कसलाही "एअरटाइम‘ मिळविण्यासाठी पिअर्स मॉर्गन पात्र नसल्याने आपण ते निमंत्रण नाकारले‘, असे वीरेंद्र सेहवागने ट्‌विटरवरच जाहीर केले. त्यावर एकाने तर, मॉर्गन व गोस्वामी हे दोघेही एअरटाइमसाठी अपात्र असल्याची मिश्‍किल टिप्पणी केली. ""हा मॉर्गन शोभा डे सारखा का वागतोय‘‘, हा ट्विट भारतीय खेळाडू ज्याला "सर‘ म्हणतात त्या रवींद्र जडेजाने टाकला. त्याच्या या प्रश्‍नार्थक प्रतिक्रियेने फटकेबाजीत मजाही आणली आणि ऑलिंपिकदरम्यानच्या एका जखमेवरची खपलीही निघाली.

योगेश्‍वर आणि सोन्याची कुऱ्हाड
रिओ ऑलिंपिकमध्ये पराभूत होऊन मायदेशी परतलेल्या कुस्तीपटू योगेश्‍वर दत्तला एकामागे एक सुखद बातम्यांचे धक्‍के बसत आहेत. त्या बातम्या आधीच्या लंडन ऑलिंपिकशी संबंधित आहेत. 60 किलो फ्रीस्टाइल गटात लंडनला रौप्यपदक मिळवणारा रशियाचा बेसिक कुडखोव्ह मादक द्रव्य चाचणीत दोषी ठरल्याने त्याचे रौप्य योगेश्‍वरला मिळेल, अशी शक्‍यता आहे. डिसेंबर 2013 मध्ये कुडुखोव्हचे अपघाती निधन झाले असल्याने त्याला बाजू मांडण्याची संधी नाही. योगेश्‍वरने मयत कुडुखोव्हच्या कुटुंबाकडेच ते पदक राहावे, अशी इच्छा व्यक्‍त केली आहे. पाठोपाठ लंडनमधील सुवर्णपदक विजेता अझरबैजानचा तोघरूल असगारोव्ह याचे नमुने सदोष निघाल्याने योगेश्‍वरच्या हाती न पडलेले रुपेरी पदक सोनेरी बनणार, अशी बातमीही आली. खरेतर हे शक्‍य नाही. कारण पहिल्या फेरीत योगेश्‍वरला पराभूत करणारा कुडुखोव्ह अंतिम फेरीत पोचल्याने रिपेचेज नियमानुसार योगेश्‍वरला संधी मिळाली व त्याने कांस्य जिंकले. सुवर्णपदकाचे तसे नाही. योगेश्‍वरप्रमाणेच अमेरिकेचा कोलमन स्कॉट याला असगारोव्हकडून पराभूत झाल्यानंतर रिपेचेजमुळे उपांत्य फेरीत संधी मिळाली व त्यानेही कांस्य जिंकले. असगारोव्हचे सुवर्ण पदक आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने किंवा ऑलिंपिक समितीने काढून घेतलेच तर त्यावर पहिला हक्‍क स्कॉटचा असेल. ही पदकांची पदोन्नती सगळ्याच माध्यमांमध्ये चर्चेत असताना, "ई-सकाळ‘च्या एका वाचकाला लाकूडतोड्याची तंतोतंत लागू पडणारी गोष्ट आठवली. त्याची कुऱ्हाड तलावात पडते. देव आधी चांदीची, मग सोन्याची कुऱ्हाड त्याला देऊ पाहतो. तर तो मात्र त्याच्या स्वत:च्या लोखंडी कुऱ्हाडीसाठी हटून बसतो. त्याच्या प्रामाणिकपणावर खूश होऊन देव त्याला चांदी व सोन्याचीही कुऱ्हाड देऊन टाकतो. योगेश्‍वरचेही काहीसे तसेच होऊ पाहतेय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The condition can be expensive screen is white Saab!