चिंतनानंतरही काँग्रेसची चिंता कायम!

कॉंग्रेसचे ‘नवसंकल्प शिबिर’ नुकतेच पार पडले. त्या निमित्ताने पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची कॉंग्रेसची सद्यःस्थिती आणि सध्याचे राजकारण याविषयी घेतलेली मुलाखत.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSakal
Summary

कॉंग्रेसचे ‘नवसंकल्प शिबिर’ नुकतेच पार पडले. त्या निमित्ताने पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची कॉंग्रेसची सद्यःस्थिती आणि सध्याचे राजकारण याविषयी घेतलेली मुलाखत.

विविध निवडणुकांतील पराभवांच्या पार्श्वभूमीवर चिंतनासाठी कॉंग्रेसचे ‘नवसंकल्प शिबिर’ नुकतेच पार पडले. त्या निमित्ताने पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची कॉंग्रेसची सद्यःस्थिती आणि सध्याचे राजकारण याविषयी घेतलेली मुलाखत.

प्रश्न - कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात घडलं, कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली?

उत्तर - २०१४नंतरच्या काळात पक्षांतर्गत खुली अशी चर्चा झालेली नव्हती. सातत्याने होणाऱ्या पराभवांच्या मीमांसेसाठी हे शिबिर होतं. पण यावेळी नेहेमीप्रमाणे ठराव, भाषणे असं काही झालं नाही. कार्यक्रम दिल्लीपुरता सीमित झाला. राज्याचे मंत्री घेतले नव्हते. चर्चागटाचे समन्वयक जेवढं सांगतील, तेवढीच चर्चा करायची, असं ठरलं होतं. त्यामुळे दुसऱ्या गटात काय चर्चा झाली, याची मला माहिती नाही. अशा चर्चेचे फलित काय, हे त्यामुळेच सांगता येत नाही.

काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही असण्याची आवश्‍यकता वाटते का?

यासाठीच आम्ही कोरोनाच्या काळात गोपनीय पत्र अध्यक्षांना दिलं होतं. पण त्यातील काही वाक्य ‘लीक’ झाली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. त्या पत्रात आम्ही पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा आणि त्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर सोनिया, राहुल आणि प्रियांका यांच्याबरोबर १९ जणांची बैठक झाली. आमच्या मनात काय होतं, काय चिंता आहेत हे आम्ही त्यांनी सांगितलं. `चिंतन शिबिरात चर्चा करू’, या उत्तरानं आमचं समाधान झालं होतं.

राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी योग्य नाहीत, असे वाटते?

असं काही नाही. ते हुशार आहेत, ते सांभाळू शकतात; पण पक्षाचे अध्यक्षपद ही जबाबदारी असते. पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही पद्धतीने व्हाव्यात, अशी आमची मागणी होती. आम्हाला प्रभावी विरोधी पक्ष म्हणून टिकायचंय. त्यामुळे भाजप आमच्यावर काय टीका करतो, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. त्या पक्षाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे आणि त्याला पर्याय देण्यास कॉंग्रेस पक्ष अयशस्वी ठरला आहे. पण तसा पर्याय देण्याची क्षमता पक्षात आहे. त्यासाठी प्रयत्न हवेत. प्रादेशिक पक्षांना राज्यांत यश मिळत असले तरी ते पर्याय होऊ शकत नाहीत.

राज्यात संघटनात्मक पातळीवर तुम्हाला कोणतीच जबाबदारी देण्यात आली नाही. तुम्हाला डावललं जातंय का?

नाही, ज्यावेळी सरकार स्थापन झालं, तेव्हा विधानसभा अध्यक्ष व्हा, म्हणून विनंती करण्यात आली होती; पण राजकीय पद नसल्यानं मी ते स्वीकारलं नाही. त्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचं नाव ठरवलं. मला त्याबाबत विचारलं नाही. सध्या दीड वर्षापासून विधानसभेला अध्यक्ष नाही. काँग्रेसकडे असलेल्या पदाला उमेदवार मिळत नाही. मी खूप पदे भूषवली आहेत. संघटनेसाठी काम केलंय; राज्यात संघटनेचं काम याआधी केलं नव्हतं. पक्षासाठी मला काहीतरी योगदान देता आलं तर नक्की देईन, पण एखाद्या पदासाठी स्पर्धा करणं योग्य नाही.

नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष केलं तेव्हा तुम्हाला सांगितलं नव्हतं का?

त्यावेळी फोनवर मत घेण्यात आलं होतं. अशी कधी विधानसभा अध्यक्षाची निवड होत नसते.

राज्यात पुढच्या निवडणुकांपर्यंत आघाडी राहील का?

भाजपाने निवडणुकांच्या आधी काँग्रेसला संपवायचा प्रयत्न केला होता. जवळपास ४० दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेतले तेव्हा आम्ही विचार केला की, यांच्या हातात जर सत्ता दिली तर पुन्हा ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ राहणार नाही आणि काँग्रेसही राहणार नाही, म्हणून आम्ही ही आघाडी केली.

महाविकास आघाडीत राहून काँग्रेस पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना का दिसत नाही?

त्याबद्दल आमचे नेतृत्व करणारे नेते विचार करतील. पण हा चिंतेचा विषय आहे.

महाविकास आघाडीत कॉंग्रेस पक्षाला डावललं जातंय का?

तसं बघितलं तर आमचा या सरकारमध्ये थोडा वाटा आहे. सत्तावाटपाचा जो कार्यक्रम झाला तो काही बरोबर झाला नाही. त्यामुळे जरा डावलल्यासारखं वाटतं खरं; पण एकदा एकत्र काम करायचं ठरवल्यावर तक्रार करून चालत नाही. निधीचे वाटप समसमान झाले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना समान वाटणी करत होतो.

२०२४ मध्ये काँग्रेसला निवडणुका जिंकायच्या असतील तर महत्त्वाचे तीन मुद्दे कोणते?

२०२४च्या निवडणुकांपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढायच्या, यावर उपाय आधी हवा. त्यावर चर्चा करावी लागेल. त्यानंतर पुढची रणनीती ठरवावी लागेल. राज्यात तिघांनी मिळून निवडणुका लढवल्या तर भाजपला हरविणे अवघड नाही. पण हे असे होण्यासाठी संवाद आवश्यक आहे.

राहुल गांधी नेते म्हणून मोठेच आहेत. पण अध्यक्षपदासाठी ते तयार नसतील तर काय करायचं? हा निर्णय किती दिवस अधांतरी ठेवायचा?

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

प्रशांत किशोरांचं काय झालं?

प्रशांत किशोर आणि माझी भेट झाली होती. मोदींना हटविण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्ये असल्याने ते पक्षात येण्यास इच्छुक होते. राहुल गांधींनी देशात जाहीर सभा घ्याव्यात आणि अध्यक्षपद दुसऱ्या कुणाला द्यावं, तसेच पंतप्रधानपदाचा उमेदवार आपण नाही, असंही जाहीर करावं, असं त्यांनी सुचवलं होतं. पण त्याबाबत झालेली चर्चा फिसकटली. काहींना वाटलं की हा कोण बाहेरचा आम्हाला शिकवणारा?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com