गुडघ्याला बाशिंग ! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

पंतप्रधान होण्याची मनीषा राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. पण राजकारणात संधीवर झडप घालण्यासाठी अचूक टायमिंग साधावे लागते. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नसले, तरी त्यासाठी पाया पक्का नको काय?

पंतप्रधान होण्याची मनीषा राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. पण राजकारणात संधीवर झडप घालण्यासाठी अचूक टायमिंग साधावे लागते. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नसले, तरी त्यासाठी पाया पक्का नको काय?

न रेंद्र मोदी चार वर्षांपूर्वी पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी देशाला ‘अच्छे दिन!’ नावाच्या एका स्वप्नाच्या मोहमयी दुनियेत नेऊन उभे केले होते. त्या ‘सपनों की दुनिया’वर मतदार मोठ्या प्रमाणावर भाळले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात भरभरून मते टाकली. परिणामी, मोदी यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ अलगद पडली. त्यानंतरच्या चार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या संघर्षात ‘मॅण्डेटरी ओव्हर’ सुरू असताना, ‘मी पंतप्रधान व्हायला तयार आहे!’ असे वक्‍तव्य करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी षटकार मारला आहे. राजकारणात संधीवर झडप घालण्यासाठी अचूक टायमिंग साधावे लागते. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नसले, तरी त्यासाठी पाया पक्का नको काय? सध्या विरोधकांना एक व्हा, असे हाकारे घालण्यात काँग्रेस पक्ष गुंतलेला असताना स्वप्नाचा जाहीर उच्चार करण्याची घाई खटकते. आजमितीला देशातील किमान अर्धा डझन नेते वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल आणि पंतप्रधानपदावर आपणच विराजमान होऊ, अशा स्वप्नांच्या दुनियेत मश्‍गूल झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनीही तेच स्वप्न बघितले, तर त्यात काहीच गैर म्हणता येणार नाही! मात्र, आपली सारीच स्वप्ने ही जाहीरपणे बोलून दाखवायची नसतात, हेही त्यांना ठाऊक असणारच. अर्थात, पंतप्रधान होण्याची मनीषा राहुल यांनी काही पहिल्यांदाच व्यक्‍त केलेली नाही. गेल्या सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, ‘पक्षाने निर्णय घेतला, तर पंतप्रधानपद स्वीकारायला माझी हरकत नाही!’ असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर मंगळवारी बंगळूरमध्ये मोजक्‍या विचारवंतांच्या मेळाव्यात बोलताना, त्यांनी त्याच आशयाचे वक्‍तव्य केल्यामुळे दिल्ली आणि उत्तर भारताला ग्रासणाऱ्या धुळीच्या वादळापेक्षाही मोठाच धुराळा उडाला! केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यामुळे नव्वदच्या दशकात ‘दूरदर्शन’वर गाजलेल्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ या मालिकेचे स्मरण झाले; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल यांच्या या वक्‍तव्यावर ‘बाजारात तुरी... कोण कोणास मारी!’ अशी मार्मिक टिप्पणी केली.
अर्थात, राहुल यांनी हे वक्‍तव्य स्वत:हून बिलकूलच केलेले नाही. बंगळूर येथील त्या मेळाव्यात ‘तुम्हाला पंतप्रधान व्हायला आवडेल काय?’ असा प्रश्‍न विचारला गेला आणि त्यास उत्तर देताना राहुल यांनी ही प्रतिक्रिया दिली. ‘काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आला, तर पंतप्रधानपद स्वीकारण्यासाठी मी तयार आहे!’ असे त्यांचे उत्तर होते आणि आपल्या या वक्‍तव्याचे विश्‍लेषणही त्यांनी केले. ‘उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव एकत्र आले, तर भाजपच्या वर्चस्वाला मोठा हादरा बसू शकतो. भाजपलाही त्याची जाणीव आहे आणि पराभव हा मोदी यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे!’ असे ते म्हणाले. मायावती आणि अखिलेश एकत्र आल्यास काय होऊ शकते, ते दोनच महिन्यांपूर्वी गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघातील लोकसभेच्या पोटनिवडणुकांच्या निकालांवरून दिसून आले आहे. शिवाय, देशातील आजची राजकीय परिस्थिती बघता भाजपला गेल्या वेळेसारखे निर्विवाद बहुमत मिळणे अवघड आहे. तसे झाले आणि ‘रालोआ’चे सरकार येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, तर त्या आघाडीतील पक्ष पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी वा अन्य कोणी यांची निवड करतील, असेही राहुल यांनी सूचित केले. त्यात तथ्य आहे. त्यामुळेच मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असे राहुल ठामपणे सांगत आहेत.

अर्थात, हे सर्व ‘जर-तर’चे तर्क आहेत आणि लोकसभा निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी आहे. त्या निवडणुकीत; तसेच निवडणूकपूर्व रणधुमाळीत नेमके काय होऊ शकेल, ते आज सांगता येणे कठीण आहे. हे लक्षात घेता राहुल यांना ‘आय वुईल क्रॉस द ब्रिज, व्हेन आय वुईल कम ॲक्रॉस इट’ या प्रसिद्ध इंग्रजी वाक्‍प्रचाराचा आधार घेऊन ‘वेळ आल्यावर तो निर्णय घेतला जाईल!’ या धर्तीचे वक्‍तव्य करता आले असते. मात्र, ‘काँग्रेस मोठा पक्ष ठरला तर...’ अशी पुस्ती त्यांनी जोडली आहे आणि खरी मेख इथेच आहे!

Web Title: congress leader rahul gandhi dream prime minister editorial