कॉंग्रेसला संजीवनी मिळणार का?

राजीव रंजन तिवारी
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

"बेशुद्ध‘ आणि "संजीवनी‘ या दोन शब्दांचा एकमेकांशी असलेला संबंध सर्वांनाच माहीत आहे. रावणाचा मुलगा मेघनादने मारलेल्या बाणामुळे लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर वैद्य सुषेणच्या सांगण्यावरून वायुपुत्र हनुमानाने हिमालयातून संजीवनी आणून त्याचे प्राण वाचविले होते, असे तुलसीदासांच्या रामायणात म्हटले आहे. हा प्रसंग सध्याच्या कॉंग्रेसच्या परिस्थितीला बरोबर लागू पडतो. 

"बेशुद्ध‘ आणि "संजीवनी‘ या दोन शब्दांचा एकमेकांशी असलेला संबंध सर्वांनाच माहीत आहे. रावणाचा मुलगा मेघनादने मारलेल्या बाणामुळे लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर वैद्य सुषेणच्या सांगण्यावरून वायुपुत्र हनुमानाने हिमालयातून संजीवनी आणून त्याचे प्राण वाचविले होते, असे तुलसीदासांच्या रामायणात म्हटले आहे. हा प्रसंग सध्याच्या कॉंग्रेसच्या परिस्थितीला बरोबर लागू पडतो. 

देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात 2017 मध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच लहान-मोठ्या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र कॉंग्रेसच्या तयारीच्या चर्चा फारच रंगत आहेत. कारण स्पष्टच आहे. देशातील सर्वांत मोठा पक्ष असूनही उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये कॉंग्रेस सध्या बेशुद्धावस्थेतच आहे. त्रेतायुगातील सुषेणाप्रमाणे सध्याच्या कलियुगात या बेशुद्ध पक्षावर उपचार करण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांनी आपल्या खांद्यावर उचलली आहे. कॉंग्रेसला ऊर्जितावस्था आणण्यासाठी त्यांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. त्यानुसारच, आजपासून उत्तर प्रदेशात कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अडीच हजार किलोमीटरच्या महायात्रेला सुरवात होणार आहे. त्यामुळे "वैद्य‘ प्रशांत किशोर यांच्या सांगण्यानुसार, राहुल गांधी कॉंग्रेसला वाचविण्यासाठी "संजीवनी‘ शोधायला निघणार आहेत. राज्यात मागील 27 वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या कॉंग्रेसमध्ये प्राण फुंकून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यात राहुल यशस्वी होतील का, यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. 

 
कॉंग्रेसचे पुनरुज्जीवन करणे, या पक्षाची प्रतिष्ठा पुन्हा संपादित करणे आणि संपूर्ण देश पुन्हा एकदा कॉंग्रेसमय करणे, हे आव्हानच आहे. अर्थात, हे अवघड असले तरी नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यासाठी रणनीती आखून ती यशस्वी केलेल्या प्रशांत किशोर यांच्या खांद्यावर ही धुरा असल्याने यशाची थोडीफार अपेक्षा ठेवता येईल. आता उत्तर प्रदेशात त्यांची पुन्हा कसोटी लागणार आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची सध्याची ताकद अगदीच नगण्य आहे. इथे प्रशांत किशोर तोंडघशी पडतील, असे बहुतांश जनतेला वाटत आहे. मात्र, या सर्व टीकेकडे दुर्लक्ष करत त्यांचे काम चालू आहे. 

काही दिवसांपूर्वी लखनौमधील युवकांबरोबर राहुल यांचा संवाद साधण्याचा कार्यक्रम घडवून आणण्यात आला. प्रशांत किशोर यांचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाला. वाराणसीतही कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रोड शोला झालेल्या गर्दीची अद्यापही चर्चा होत आहे. याशिवाय, राज्यामध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित, राज बब्बर आणि प्रचार समितीचे अध्यक्ष संजय सिंह हे "27 साल, यूपी बेहाल‘ ही मोहीम चालवत आहेत. त्यामुळे राहुल यांची आजपासून सुरू होणारी अडीच हजार किलोमीटरची यात्रा हा किशोर यांचा चौथा प्रयोग असेल. राज्याच्या पूर्व भागात असलेल्या देवरिया जिल्ह्यातून किसान यात्रा काढत राहुल याची सुरवात करतील. 28 दिवसांच्या या महायात्रेचा समारोप दिल्लीत गांधी जयंतीला होणार आहे. या यात्रेत सहभागी झालेले कॉंग्रेस कार्यकर्ते यात्रेदरम्यान लागणाऱ्या गावांमधील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांचे प्रश्‍न समजून घेतील आणि ते सोडविण्याचा प्रयत्न करतील. राहुलही अनेक शेतकऱ्यांना भेटण्याचे आयोजन केले आहे. याआधीही शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी राहुल यांनी सोडलेली नाही. पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधण्याचा राहुल यांचा प्रयत्न असेल. 

या महायात्रेदरम्यान राज्यातील 403 विधानसभा मतदारसंघांपैकी 225 मतदारसंघांत आणि 55 लोकसभा मतदारसंघात राहुल पोचण्याची शक्‍यता आहे. ही महायात्रा 42 जिल्ह्यांमधून जाणार असून, अनेक ठिकाणी रोड शोचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे. काही वर्षांपूर्वी राहुल यांनी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोचण्याचे आदेश दिले होते. या कार्यकर्त्यांना स्थानिक समस्या सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्यास सांगितले होते. मात्र, राहुल यांची पाठ फिरताच हे कार्यकर्ते पुन्हा सुस्त झाले होते. या पार्श्‍वभूमीवर या महायात्रेत दोन कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचे लक्ष्य साध्य होते की नाही, याची उत्सुकता आहे. म्हणजे, बेशुद्ध कॉंग्रेसला शुद्धीवर आणण्यासाठी "वैद्य‘ प्रशांत किशोर यांनी सांगितलेली "संजीवनी‘ राहुल यांना सापडणार का?, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title: The Congress will boost?