लघू उद्योगांतील प्रशिक्षणात ‘स्टार्टअप’चे योगदान

startup
startup

भारतीय उद्योग क्षेत्रात लघू उद्योग आणि उद्योजकांचे विशेष स्थान आहे. देशांतर्गत आर्थिक विकासात ४० टक्के सरासरी वाढ लघू उद्योगांच्या माध्यमातून होत असते, तर या क्षेत्रातील रोजगारांची संख्या ४.५ कोटींच्या घरात आहे. यावरून सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योगांचे महत्त्व आणि माहात्म्य प्रकर्षाने जाणवते. आवश्‍यक तंत्रज्ञान व कार्यपद्धतींच्या जोडीला लघू उद्योगांना आर्थिक पाठबळ, तसेच कुशल व प्रशिक्षित कर्मचारी आणि मनुष्यबळाची नेहमीच गरज भासते. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन प्रगत तंत्रज्ञानावर आधारित सल्ला - सेवा व कर्मचारी प्रशिक्षणासाठी विविध स्तरांवर पुढाकार घेऊन काही ‘स्टार्टअप’ कंपन्यांनी जे उपक्रम आणि प्रयत्न सुरू केले आहेत, ते निश्‍चितच उल्लेखनीय आहेत. या प्रयत्नांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यात लघू उद्योगांना प्रगत व वापरण्यास सुलभ असे आर्थिक, तंत्रज्ञान, व्यावसायिक कामकाज, ग्राहकांच्या विविध गरजा आणि आवश्‍यक कौशल्यांच्या माध्यमातून केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर सहकार्य करण्याचे मोठे काम छोट्या-छोट्या ‘स्टार्टअप’ उपक्रमांद्वारे यशस्वीपणे होत आहे. त्यापैकी काही निवडक प्रयत्नांचा हा गोषवारा.

‘फिनटेक’ स्टार्टअपतर्फे मध्यम व लघू उद्योगांसाठी आवश्‍यक अशा कौशल्यविकास मंचाचे काम सुरू आहे. याअंतर्गत ‘स्टार्टअप’साठी त्यांच्या विशिष्ट गरजा आणि कार्यपद्धतीसाठी आवश्‍यक असणारे निवडक कर्मचारी प्रत्यक्ष कामाच्या सरावासह प्रशिक्षित करणे, त्यांना गरजेनुरूप तज्ज्ञांकरवी मार्गदर्शन करणे, लघू उद्योजकांना व्यवसायवाढीसाठी सल्ला देणे, प्रसंगी भांडवलाची व्यवस्था करणे, वित्तीय संस्थांशी संपर्क साधणे, विक्री व्यवस्थेत सुसूत्रता आणून स्थायी व्यवसायासाठी मदत करणे आदी कामे केली जातात. त्याचा चांगला फायदा संबंधित लघू उद्योजकांना होतो. लघू व मध्यम उद्योगांच्या व्यवसायाशी निगडित अशा आर्थिक गरजा व अडचणी यावर आधारित अहवाल ‘इन्स्हामाजो’ या अर्थविषयक कंपनीने २०१८ मध्ये प्रकाशित केला आहे. त्यानुसार आज मध्यम व लघू उद्योगांपुढील सर्वांत मोठे व्यावसायिक आव्हान कुशल व प्रशिक्षित कर्मचारी हेच आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे ६०० लघू उद्योजकांनी प्रामुख्याने मान्य केलेली बाब म्हणजे, कुशल कर्मचाऱ्यांची वानवा. यातील सुमारे ३० टक्के लघू उद्योजकांनी तर त्यांची व्यावसायिक अस्थिरता व अपयशामागे कर्मचारी प्रशिक्षित व कौशल्यपूर्ण नसणे हे प्रमुख कारण असल्याचे नमूद केले आहे.

लघू उद्योगांच्या विशेष कामकाज व व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या गरजांची संगणकीय पद्धतीने पूर्तता करण्यासाठी मोजो विद्यापीठाने संगणकीय धर्तीवर आधारित खास मध्यम व लघू उद्योगांसाठी उपयुक्त अशी विशेष कौशल्य विकासपद्धती विकसित केली आहे. त्याचा फायदा या क्षेत्रातील विशेषतः नव्याने प्रवेश करणाऱ्या उद्योजक, कर्मचाऱ्यांना होत आहे.

सुरवातीच्याच या प्रयत्नाला लाभलेले यश आणि प्रतिसाद यामुळे प्रेरित झालेल्या मोजो विद्यापीठाने आता ‘स्टार्टअप’ उद्योगांसाठी सेवा तंत्रज्ञानविषयक माहितीचे संकलन करून ती पुरविणे, लघू उद्योगांना परस्परसहकार्य संबंधांसाठी माध्यम व व्यासपीठ उपलब्ध करून देणे, गरजेनुरूप गुंतवणूकदार वा भागीदार उपलब्ध करून देणे, विविध उद्योग व आर्थिक संस्थांशी समन्वय साधून देणे ही कामे सुरू केली आहेत. मुख्य म्हणजे मध्यम व लघू उद्योजकांना संबंधित व आवश्‍यक अशा विषयांवरील औपचारिक शिक्षण-प्रशिक्षण अभ्यासक्रमही उपलब्ध केले जातात. मोजो विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हे उपयुक्त अभ्यासक्रम सर्वसाधारणपणे काही तासांत व संगणकीय पद्धतीने पूर्ण केले जातात. अभ्यासक्रमांच्या रचनेनुसार लघू उद्योगांच्या व्यावसायिक स्वरूपानुरूप विषयानुरूप संक्षिप्त व उपयुक्त माहिती या अभ्यासक्रमांद्वारे शिकविली जाते.‘मोजो’च्या या अभ्यासक्रमांमधील मध्यम व लघू उद्योगांसाठी अर्थसाह्यविषयक योजनांची तरतूद आणि फायदे व या क्षेत्राशी संबंधित प्रमुख कामगार कायद्यांची ओळख आणि कायदेशीर अंमलबजावणी हे अभ्यासक्रम लघू उद्योगांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. याशिवाय विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमात ‘जीएसटी’ कायदा आणि तरतुदी या विशेष अभ्यासक्रमाचा नव्यानेच समावेश करण्यात आला असून, या साऱ्या संगणकीय पद्धतीने शिकविल्या जाणाऱ्या लघू अभ्यासक्रमांना त्यांची व्यावहारिक उपयुक्तता व निकड लक्षात घेता प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रयत्नांमुळे स्थापनेनंतरच्या केवळ तीन महिन्यांच्या कालावधीतच लघू उद्योग प्रशिक्षणासाठी विशेष प्रशिक्षण देणाऱ्या ‘इन्स्हामाजो’ या ‘स्टार्टअप’ उपक्रमाकडे सुमारे २५०० लघू व मध्यम स्वरूपाच्या उद्योजकांनी नोंदणी केली आहे. ‘झेरोडा’ या ‘स्टार्टअप’ने खास लघू व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना व्यवसायविषयक माहिती पुरविण्याशिवाय या उद्योगांच्या व्यवसायाशी संबंधित विविध प्रश्‍नांवर त्यांना मार्गदर्शन करण्याच्या जोडीलाच याच विषयांशी संबंधित सल्ला सेवाही सुरू केली आहे. त्याचा लाभ संबंधित उद्योजक घेत आहेत. थोडक्‍यात सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची उपयुक्तता आता त्यांच्यासह साऱ्यांच्याच लक्षात आली आहे. सरकारपासून मोठ्या उद्योगांनाही ही बाब आता पटली आहे. नव्या भरारीसह काम करणाऱ्या मध्यम व लघू उद्योजकांच्या विविध व्यावसायिक व व्यावहारिक गरजांची पूर्तता करण्यासाठी ‘स्टार्टअप’ क्षेत्राने सुरू केलेले नावीन्यपूर्ण उपक्रम निश्‍चितच अनुकरणीय आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com