अव्वल नंबरी कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

बिनधास्त स्वभावाच्या पंड्याने खेळातून तोच बिनधास्तपणा दाखवून आपला दरारा निर्माण केला आहे. आता न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतही टीम इंडियाची घोडदौड सुरूच राहील अशी आशा आहे. पण, असे यश परदेशातही मिळायला हवे, हेही तितकेच खरे आहे

भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणखी एक मालिका जिंकली. नुसती जिंकली नाही, तर दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले. गेल्या वर्षी असेच घवघवीत यश भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मिळविले होते. आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही असेच यश मिळवून सध्या तरी आपणच अव्वल नंबरी आहोत हे विराट सेनेने दाखवून दिले. सामने कुठेही खेळले जावोत, खेळात सातत्य नसेल, तर यश मिळत नाही. भारतीय संघाने राखलेले सातत्यच त्यांची ताकद दाखवणारे आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी ऑस्ट्रेलियाला निष्प्रभ केले. विशेष म्हणजे मालिकेला सुरवात होताना निवड समितीने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून फिरकी गोलंदाजांचे पर्याय चाचपण्यासाठी केलेली संघाची निवड धाडसी म्हणायला हवी.

आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा या प्रमुख फिरकी गोलंदाजांना त्यांनी वगळण्याचा निर्णय घेऊन युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या मनगटी फिरकी गोलंदाजांची निवड केली. शिखर धवननेही विश्रांती मागितल्याने त्याला पूर्ण मालिकेत बाहेर ठेवून अजिंक्‍य रहाणेवर दाखवलेला विश्‍वासही तेवढाच महत्त्वाचा होता. चहल आणि कुलदीप यांनी संधीचा पुरेपूर फायदा उठवून आता निवड समितीबरोबरच अश्‍विन आणि जडेजा यांच्यासमोरही आव्हान उभे केले आहे. अशी आपसातच स्पर्धा दिसली की खेळाडूही कामगिरी उंचावण्यासाठी प्रेरित होतात. वेगवान गोलंदाजांसाठीही निवड समितीसमोर अधिक सशक्त पर्याय आहेत. एकदिवसीय क्रिकेटचा विचार करता आता फलंदाजीसाठी निवड समितीने पर्याय शोधण्यास सुरवात करायला हवी. यातही अलीकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. या मालिकेत भारतीय संघाला हार्दिक पंड्याच्या रूपाने गुणी अष्टपैलू खेळाडू मिळाला असे म्हणायला नक्कीच जागा आहे. पाचही सामन्यांत त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. या मालिकेचे "फाईंड' म्हणून कर्णधार विराटनेही पंड्याचे कौतुक केले आहे. बिनधास्त स्वभावाच्या पंड्याने खेळातून तोच बिनधास्तपणा दाखवून आपला दरारा निर्माण केला आहे. आता न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतही टीम इंडियाची घोडदौड सुरूच राहील अशी आशा आहे. पण, असे यश परदेशातही मिळायला हवे, हेही तितकेच खरे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket australia india