रक्‍ताळलेली उपराजधानी (मर्म)

रक्‍ताळलेली उपराजधानी (मर्म)

महाराष्ट्राची उपराजधानी- नागपूरमधील गेल्या काही महिन्यांमधील वाढती गुन्हेगारी पाहता ही उपराजधानी रक्‍ताने माखलेली असल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे. खाकीचा वचक नाहीसा झाल्यामुळे म्हणा किंवा खाकीला भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळे म्हणा गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यातही गुन्हेगारी वृत्तीला कोठून का होईना सत्तेची ऊब असली, तर जास्त अनर्थ ओढवितो. आमदारपुत्रांनी केलेल्या राड्यातून त्यांच्या मित्राचा खून झाल्याच्या नागपुरातील ताज्या घटनेने हेच दाखवून दिले. शहरात कायद्याचा वचक राहिलेला नाही, हेही त्यातून स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्र्यांचे शहर असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष उपराजधानीकडे असते. त्यामुळेच की काय, अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी येथे रुजू होण्यास घाबरतात. नागपुरात बदली झाली, तर लगेच बदली तरी करून घेतात किंवा वैद्यकीय रजेवर जाऊन येथे येण्याचे टाळतात. पोलिस अधिकाऱ्यांच्या या मानसिकतेवर अद्याप तरी गृह मंत्रालयाला तोडगा सापडलेला नाही.
उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री व नागपुरातील राजकारण्यांवर प्रसारमाध्यमांनी ताशेरे ओढले; पण परिणाम शून्य. गेल्या अकरा महिन्यांत 82 जणांचा खून झाला आहे, तर 82 जणांवर प्राणघातक हल्ले झाले. महिला व महाविद्यालयीन युवतींसाठीही हे शहर असुरक्षित बनले आहे. सुमारे 160 महिला वासनांधांना बळी पडल्या आहेत, तर महिलांची छेड काढण्याचे 355 प्रकार घडले आहेत. या साऱ्याचा दोष पोलिसांचा हलगर्जीपणा व लाचखाऊ प्रवृत्तीलाच द्यावा लागेल.


शहरात सध्या गुन्हेगारीला आश्रय देणारे "नाईटलाइफ कल्चर' रुजत आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री दोन-तीनपर्यंत बिअरबार, हॉटेल, हुक्‍का पार्लर सुरू असतात. भ्रष्ट प्रवृत्ती वरचढ झाल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सेक्‍स रॅकेटचे अड्‌डे बिनधास्त सुरू आहेत. पिस्तुलांचा सुळसुळाट झाला असून गोळीबार तर नित्याचाच झाला आहे. एखाद्या आमदाराची मुले बिअरबारमध्ये जातात अणि नंतर झालेल्या भांडणात त्यांच्या मित्राचा खून होतो. ही घटनाच राजकारणाचे किती गुन्हेगारीकरण झाले आहे, हे दाखविणारी आहे. गस्तीसाठी रस्त्यावर पोलिस अपवादानेच दिसत असल्याने चोरट्यांनी थैमान घातले आहे. यावर तातडीने उपाय करून सर्वसामान्य जनतेतील असुरक्षिततेची भावना दूर करण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस गुन्हेगारांवर बडगा उचलून दरारा निर्माण करीत नाहीत, तोवर उपराजधानीची झालेली "रक्‍तरंजित शहर' ही ओळख बदलणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com