अग्रलेख : सांस्कृतिक सुवार्ता

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 September 2019

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यासारख्या एका साहित्य-संस्कृतीच्या राजदूताची नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे, ही अवघ्या महाराष्ट्रासाठी सांस्कृतिक सुवार्ता आहे.

अंगणांना कुंपणे घालण्याचे उद्योग वाढीस लागलेले असतानाच्या काळात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यासारख्या एका साहित्य-संस्कृतीच्या राजदूताची नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे, ही अवघ्या महाराष्ट्रासाठी सांस्कृतिक सुवार्ता आहे. पर्यावरणाला साहित्याच्या केंद्री आणणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्याला समाजाशी संवादी ठेवणारे लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते असलेले फादर दिब्रिटो यांना सन्मानपूर्वक देऊ केलेले संमेलनाध्यक्षपद हे साहित्य व निसर्ग, यांचाच सन्मान करणारे ठरेल. मराठी साहित्याची परंपरा ही मराठवाड्यातून सुरू झाली. मराठवाडा संतसाहित्याचा वारसा सांगत आला आहे. अशा मराठवाडा भूमीतील उस्मानाबाद येथील नियोजित संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचाच वारसा सांगणाऱ्या लेखकाचा सन्मान होणे उचितच झाले. ‘जैसी पुष्पामाजी पुष्पमोगरी। की परिमळामाजी कस्तुरी। तैसी भाषांमाजी साजिरी। मराठीचिया।।’ असे सांगणाऱ्या फादर स्टीफन यांचा वारसा फादर दिब्रिटो यांच्याकडे आला आहे. फादर दिब्रिटो म्हणजे पिढ्यान्‌पिढ्यांचा ‘भावरता’चा वारसा जपणारे, जलांहूनी निर्मल, शुभ्र वसनाइतकेच धवल असे व्यक्तिमत्त्व आहे. अशा लेखकाची सर्वमताने संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड मराठीमनांना निश्‍चितच सुखावणारी आहे. संमेलनाध्यक्षांची निवडणुकीऐवजी निवड करण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने निर्णय घेतल्यानंतर लागोपाठ दुसऱ्या वर्षी महामंडळाने सुखद धक्का दिला आहे. संमेलनाध्यक्षपदी मराठवाड्यातील चार ज्येष्ठ लेखकांची चर्चा सुरू असताना वसईसारख्या आडबाजूच्या, कोणत्याही गटा-तटांत नसलेल्या लेखकाची निवड करून या नव्या पद्धतीविषयीच्या शंकाकुशंकांनाही विराम दिला.

एखाद्या व्यक्तीची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर, त्या व्यक्तीचे मराठी साहित्यात योगदान काय, असा प्रश्न समाजमाध्यमांद्वारे विचारण्याचा आता रिवाज होतो आहे. फादर दिब्रिटो यांच्या निवडीनंतर समाजमाध्यमांवर शुभेच्छांच्या ‘पोस्ट’ आल्या, तशा आपले वैचारिक करंटेपण दाखवणाऱ्याही आल्या. अशा ‘पोस्ट’मुळे आपलेच अधःपतन आपण जगासमोर मिरवत असतो, हेही भान उरलेले नाही. सध्या द्वेषाने, मत्सराने, असंवेदनशीलतेने, असहिष्णुतेने भेदाभेदाचा कळस गाठलेल्या आणि हवेत विखार फवारला जात असतानाच्या काळात साहित्य-संस्कृतीचा दूत बनून राहणेही खूप महत्त्वाचे आहे. या एका कारणासाठीही दिब्रिटो यांची निवड सार्थ ठरावी. मराठी ही मातृभाषा असल्याचे अभिमानाने सांगणारा हा मितभाषी लेखक मराठीच्या प्रसारासाठी नेहमीच हिरिरीने पुढे असतो. आपल्या नम्र, ऋजू स्वभावानुसार शांत, हळू आवाजात ते बायबल आणि तुकाराम गाथा यांच्यातील अनुबंध समजावून सांगतात. ‘ओॲसिसच्या शोधात’ या ‘सकाळ’मधील लेखमालेने ते वाचकांमध्ये प्रिय झाले. ‘नाही मी एकला’ या त्यांच्या आत्मचरित्राची पहिली आवृत्ती एका दिवसातच संपली, यावरून त्यांच्या वाचकप्रियतेची कल्पना यावी. दिब्रिटो यांनी ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’ लिहिण्यासाठी बराच काळ इस्राईलमध्ये राहून संशोधन केले आणि हाती आलेली तथ्ये लेखमाला स्वरूपात ‘सकाळ’मधून प्रसिद्ध केली. ‘सुबोध बायबल’ हा ग्रंथराज भाषिक लहेजा सांभाळत त्यांनी मराठीत आणला आणि त्यांच्या या कामावर साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन लख्ख मोहोर उमटवली आहे. ‘सुवार्ता’ या प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या नियतकालिकाचे मुख्य संपादक म्हणून पंचवीस वर्षे काम करताना त्यांनी या नियतकालिकाला धार्मिक वार्तापत्राकडून साहित्यपत्रिकेकडे वळविले आणि सामाजिक प्रबोधनाची पत्रिकाही बनविले. वसई परिसरात अनेक ख्रिस्ती युवक-युवतींना लिहिते केले. त्यांच्या या कार्याचा हा गौरव आहे. साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवणारे न्या. महादेव गोविंद रानडे यांनी सामाजिक परिषदही स्थापन केली होती. साहित्यिकांनी सामाजिक बांधिलकीने कृतिशील असण्याची महाराष्ट्रात एकेकाळी परंपरा होती. पुढे हस्तिदंती मनोऱ्यात लेखक राहू लागले आणि त्यांचे समाजाशी असलेले नाते कमी होत गेले. अशा काळात साहित्याची पताका खांद्यावर घेतानाच हरित वसईसाठी कृतिशील असणारे दिब्रिटो उठून दिसतात. केवळ ते लेखणीनेच बोलत नाहीत, तर साहित्याच्या प्रांतात मृदूभाषी असलेला हा लेखक निसर्ग वाचविण्याच्या लढ्यात आणि माफियांविरुद्धच्या चळवळीत वज्राहून कठोर बनून रस्त्यावर येताना दिसतो. अशा एका सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेल्या कृतिशील समाजचिंतकाचा हा सन्मान आहे. महाराष्ट्राने एकेकाळी सहिष्णु व पुरोगामी विचारांचा वारसा अखिल भारताला दिला होता. हा वारसा आटोकाट जपण्याची व पुढे नेण्याची वेळ आली आहे. मराठीचा वारसा पुढे नेण्यासाठी भाषिक-सांस्कृतिक घुसळणीची गरज कधी नव्हे ती आता निर्माण झाली आहे. साहित्यनिर्मिती, सांस्कृतिक उन्नयनाचे प्रयत्न, सामाजिक चळवळी, पर्यावरणविषयक आंदोलने या सर्वच क्षेत्रांत ठाम भूमिकेने उभे असणारे फादर दिब्रिटो भाषिक-सांस्कृतिक-सामाजिक-वैचारिक घुसळणीला दिशा व गती देतील, असा विश्वास वाटतो. या भूमीची सांस्कृतिक नांगरणी करण्यासाठी त्यांच्याबरोबर आपणही उभे राहायला हवे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cultural good news for Maharashtra