ओंजळ

ओंजळ

पारिजात बहरून आला होता. उमललेल्या इवल्या फुलांची प्रसादचिन्हं जमिनीवर उमटली होती. फुलांचा आर्द्र गंध आजूबाजूला भरला होता. चार नाजूक पाकळ्या. त्यांना धरून बसलेला केशरी देठ. गोऱ्या कपाळावर लावलेलं केशरी गंधच जणू! काही देठांनी फुलांना उभं राहायला आधार दिलेला. काही देठांनी नजरा आकाशाकडं खिळवून ठेवलेल्या. काही फुलांनी पाकळ्यांची बोटं एकत्र गुंफून फेर धरलेला; तर काही फुलांनी दहीहंडीचा खेळ सुरू केलेला. आकाशात ढगांकडं पाहताना, मनात जो आकार येईल त्याची प्रतिकृती दिसू लागते; तसंच या फुलांच्या हालचालींतही मनातले किती तरी आकार उलगडत होते; मिटत होते. छोटे. मोठे. गोलाकार. चौकोनी. झाडाच्या मनातली भूमिती समजणं कठीण होतं.

मंद गंधाचं आणि आकारांच्या नक्षीचं पिसं विलक्षण असतं. हे निसर्गदेणं उचलून बरोबर घेण्याची ओढ काही केल्या बाजूला करता येईना. फुलं भरून घ्यायला जवळ काहीच नव्हतं. विचार आला ः आणखी काय कशाला हवं? - ओंजळ तर आहे! ओंजळभर फुलं घेतली. घरी आणून काचपात्रात ठेवली. पारिजातकाचं अवघं लाघव तिथं हसू लागलं. रंगांतून गंध उधळू लागलं. गंधांच्या हलक्‍या तरंगांतून रंग पसरवू लागलं. पाहता पाहता रंग आणि गंध एक झाले.

ओंजळ ती केवढी; पण तिनं पारिजातकाचं सगळं झाडच जणू बरोबर आणलं होतं. ओंजळ भासते छोटी; मात्र असते खूप मोठी. आपली सुख-दुःखं तिच्यात मावतात. आपल्या आकांक्षा तिच्यात सामावतात. मनाच्या तळाशी दडलेले भावनांचे कल्लोळ ओंजळीत पेलता येतात. ओंजळीत मायेचं चांदणं ठेवता येतं. ओंजळीत आकाश उतरू शकतं आणि सप्तसागरांचं पाणीही बसू शकतं. ओंजळीत म्हणे ब्रह्मांडालाही जागा असते.

जाग आल्यावर प्रथम करदर्शन करण्याचा संस्कार आपल्याकडे आहे. बोटांच्या अग्रांवर लक्ष्मी आहे; मध्यभागी सरस्वती आहे आणि मुळाशी गोंविद आहे. करदर्शनानं आपण त्यांचं स्मरण करतो. मगच उद्योगाला लागतो. दारी अतिथी आला, तर त्याला विन्मुख पाठवीत नाहीत. त्याला पसाभर पीठ-धान्य दिलं जातं. आरतीनंतर निरांजनाच्या ज्योतीतून परमेश्वराचा वत्सल आशीर्वादही आपण ओंजळीतूनच घेतो. सूर्याला अर्घ्य अर्पण करतो, तेही ओंजळीतूनच. असं म्हणतात ः साडेतीन हात लांबीच्या माणसाच्या देहाला ओंजळीत मावेल, तेवढंच अन्न पुरेसं असतं. त्यापेक्षा अधिक खाण्यानं अजीर्ण होतं. उषःपानही ओंजळीनंच करायचं असतं. तेवढं पाणी माणसाची तृष्णा शमवतं. माणसाच्या अनेक कृतींशी आणि भावनांशी ओंजळीचं असं घट्ट नातं असतं.

ओंजळ हे दातृत्वाचं रूप आहे. समर्पणाच्या भावनेचंही ते द्योतक आहे. स्वीकारायला ओंजळ लागते, तशीच द्यायलाही ती लागते. ओंजळ कधीच रिती होत नाही. ती पुनःपुन्हा भरत जाते. ओंजळ सांगते ः आधी द्या, मग घ्या. पारिजातकाच्या ओठांवर शब्द होते ः

ओंजळभर रंग द्या, ओंजळभर गंध द्या,
झिरझिरत्या सुखाची आभाळभर फुलं घ्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com