फणफणलेले राजकारण! (अग्रलेख)

Cyclone Fani
Cyclone Fani

वादळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीतील प्रचाराची पातळी किती खालावली आहे, याचेच निदर्शक आहे.

लोकसभा निवडणुकीच्या महाउत्सवातील शेवटच्या ‘स्लॉग ओव्हर्स’ आता सुरू झाल्या असून, त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या विखारी फटकेबाजीलाही जोर आला आहे. सोमवारी पाचव्या टप्प्यात झालेले मतदान आधीच्या टप्प्यांपेक्षा काहीसे वाढल्याचे दिसत असले, तरी पश्‍चिम बंगालमध्ये या मतदानाला हिंसाचाराचे पुन्हा गालबोट लागले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात ‘फणी’ वादळावरून झालेल्या जोरदार शाब्दिक खडाजंगीमुळे राजकारण कसे फणफणले आहे, याचेही दर्शन घडले. बंगालमध्ये काही ठिकाणी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामाऱ्या झाल्या. मात्र, ‘फणी’ वादळग्रस्तांच्या प्रश्‍नावरून मोदी व ममतादीदी यांच्यात सुरू झालेली खडाखडी निव्वळ अश्‍लाघ्य आहे. ‘पश्‍चिम बंगालमधील वादळग्रस्तांच्या मदतीत ‘स्पीडब्रेकर’ ममतादीदी अडथळे आणत आहेत,’ असे वक्‍तव्य पंतप्रधानांनी मतदान सुरू असतानाच करून वातावरण पेटवले. तर या ‘एक्‍सापायरी डेट’ उलटून गेलेल्या पंतप्रधानांशी याबाबत बोलणी करण्याऐवजी आपण भावी पंतप्रधानांशीच संपर्क साधू, असा टोला ममतादीदींनी लगावला. एकीकडे ममतांना लक्ष्य करतानाच, मोदी यांनी उर्वरित दोन टप्प्यांतील निवडणुका माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावर लढवण्याचे जाहीर आव्हानच काँग्रेसला दिले आहे.

मात्र, या सर्वात निषेधार्ह बाब ही वादळग्रस्तांच्या मदतीवरून उभ्या राहिलेल्या वादाची आहे. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालेले नवीन पटनाईक आज ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. निकालानंतर सरकार स्थापनेसाठी ‘मित्रां’ची मदत लागू शकते, हे वास्तव मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर समोर येऊ लागल्यामुळे मोदी यांनी पटनाईक यांच्यासमवेत वादळाचा फटका बसलेल्या ओडिशाची हवाई पाहणी करणे आणि एक हजार कोटींची अतिरिक्‍त मदत जाहीर करणे, यातील राजकारण लपून राहिलेले नाही. उत्तर भारतातील हिंदीभाषक राज्यांत आपल्या जागांमध्ये होणारी घट विशेषतः पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांतून काही प्रमाणात भरून काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळेच भाजपने या दोन राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातही बंगालमध्ये भाजप नेतृत्वाने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. ममता बॅनर्जी या कोणत्याही परिस्थितीत भाजपप्रणीत आघाडीत सामील होणार नाहीत, हे स्पष्ट असल्यामुळेच ‘पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री वादळग्रस्तांच्या मदतीसाठी चर्चेसही यायला तयार नाहीत,’ असा आरोप करून मोदी बंगालमधील जनतेची सहानुभूती मिळवू पाहत आहेत. पुलवामातील हल्ला आणि त्यानंतर बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे राजकारण करणारे मोदी यांना त्यात काही वावगे वाटण्याचेही कारण नाही. उलट चक्रीवादळाच्या प्रश्‍नावरून ममताच राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, ममतादीदींनी त्यांना अत्यंत सडेतोड उत्तर दिले असून, ‘निवडणुकीच्या या हंगामात आपण मोदी यांच्याबरोबर कोणत्याही व्यासपीठावर जाणार नाही,’ असे त्यांनी सांगून टाकले आहे. ‘मोदी जातील तेथे उपस्थित राहण्यास आम्ही त्यांचे ‘नोकर’ नाही!’ असा फटका ममतादीदींनी लगावला आहे. एकूणातच आता शेवटच्या सातव्या टप्प्याचा प्रचार १७ मे रोजी संपेल, तोपावेतो मोदी, तसेच त्यांचे राज्याराज्यांतील प्रतिस्पर्धी यांच्यातील ही फटकेबाजी आणखीनच जोरदार आणि परस्परांची लक्‍तरे चव्हाट्यावर आणणारी ठरणार, याचीच प्रचिती यामुळे आली आहे. या साऱ्या पलीकडली बाब म्हणजे, मोदी यांनी या निवडणुकीच्या मैदानात थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना लक्ष्य करणे ही आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या ‘चौकीदार चोर है!’ या नाऱ्याला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे मोदी यांनी ‘मिस्टर क्‍लीन’ म्हणून पंतप्रधानपदी विराजमान झालेले राजीव गांधी हे ‘भ्रष्टाचारी नंबर वन!’ असल्याचा आरोप केला. हा आरोप म्हणजे अन्य ठोस मुद्दे नसल्याने जुन्या गोष्टी उकरून त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. निवडणूक प्रचाराची पातळी आपल्या देशात एवढ्या खालच्या स्तराला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवाय, ‘बोफोर्स’ तोफा खरेदीतील कथित भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यावर त्याबाबत चौकशी करण्यासाठी राजीव गांधी यांनी संसदेची संयुक्‍त चिकित्सा समिती नेमली होती आणि त्यातून, तसेच न्यायालयीन सव्यापसव्यानंतरही राजीव गांधी यांच्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला नव्हता. राफेल विमाने प्रकरणात मात्र अशी समिती नेमण्यास मोदी यांनी नकारच दिला आहे. या साऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात मतदारांना भेडसावणारे रोजी-रोटीचे प्रश्‍न पालापाचोळ्यासारखे उडून गेले आहेत. मात्र, त्याची पर्वा आहे कोणाला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com