स्थानिक कामगारांवर भिस्त!

Local Worker
Local Worker

कोरोनाच्या काळात व ताज्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नव्या उमेदीसह सुरू होणाऱ्या उद्योग-व्यवसायांसमोर कौशल्यपूर्ण कामगारांची समस्या उभी ठाकली आहे. कोरोना व ‘लॉकडाउनमुळे अन्य राज्यांतील कामगार गावी गेले. त्यापैकी अनेक कौशल्यपूर्ण कामगार परत न आल्याने कौशल्यधारी कामगारांची वानवा असतानाच प्रमुख उद्योगांनी स्थानिक उमेदवारांची निवड करून त्यांना विशेष कौशल्य प्रशिक्षण देण्यावर भर दिल्याचे दिसते. यामध्ये प्रामुख्याने दालमिया सिमेंट’, ‘केईसी इंटरनॅशनल’, ‘ह्युमॅक्स’, ‘ह्युंदाई मोटर्स’ यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

कामगार समस्या आणि उपाययोजना
कोरोना काळात उद्योजकांपुढे आर्थिक, व्यावसायिक, वाहतूक-व्यवहार, कर्मचाऱ्यांचे व स्वतःचे मनोधैर्य सांभाळणे ही आव्हाने होती. त्यात भर पडली परप्रांतीय कामगारांची घरची वाट धरून ते अद्यापही परत न आल्याने निर्माण झालेल्या कामगार-कौशल्याच्या आव्हानाची. उदा. दालमिया सिमेंट’ कंपनीला कारखान्यांमधून लक्षणीय संख्येत मजुरांनी स्व-राज्यात जाण्याने निर्माण झालेल्या स्थितीवर तातडीने मात करण्यासाठी उपाययोजना केली. यासाठी प्राधान्यतत्त्वावर स्थानिक उमेदवारांची निवड केली. हे उमेदवार अननुभवी असल्याने कंपनीने त्यांना विशेष प्रशिक्षणाद्वारे आवश्यक कामासाठीचे कौशल्य शिक्षण दिले व त्यांना एका महिन्यात कौशल्यदृष्ट्या उपयुक्त बनविले. कोरोनापूर्व काळात दालमिया सिमेंट’मध्ये असलेले स्थानिक कामगारांचे २० ते २५ टक्के प्रमाण आता ९० टक्क्यांपर्यंत गेले आहे. दालमिया सिमेंट’चे मानव संसाधन विकास विभागाचे समूह संचालक अजित मेनन यांच्यानुसार, कोरोनामुळे आम्हाला स्थानिक उमेदवारांना आवश्यक ते कौशल्य दिल्यास ते उत्पादन क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करू शकतात, याची जाणीव झाली. त्याचवेळी स्थानिक उमेदवारांना आपण कौशल्याचे काम करून पैसा आणि प्रतिष्ठा मिळवू शकतो, हे समजले. हे स्थिती उद्योग आणि स्थानिक उमेदवारांसाठीही दूरगामी फायद्याची आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘केईसी इंटरनॅशनल’ने आपल्या नागपूर, हलोल, जयपूर, म्हैसूर व जबलपूर या ठिकाणच्या उत्पादन कारखान्यात कामगारांची नेमणूक करताना स्थानिकांना प्राधान्य दिले. परिणामी स्थानिक कामगारांचे प्रमाण दोन टक्क्यांहून ५० टक्क्यांपर्यंत वाढले. कंपनी व्यवस्थापनानुसार, कोरोना काळात व त्यानंतरच्या परिस्थितीत ‘केईसी इंटरनॅशनल’ने परिस्थितीचा कल लक्षात घेता तातडीने स्थानिक कामगारांची निवड करण्यास सुरुवात केली. त्यांना प्रशिक्षण दिले. परिणामी कंपनीला उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करता आले. वाहनांसाठी सुटे भाग उत्पादित करणाऱ्या ‘लॅमॅक्स’ कंपनीला यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. कंपनीचे देशांतर्गत ३३ कारखाने असून, त्यापैकी बहुतांश ठिकाणी कोरोनादरम्यान कामगारांची टंचाई निर्माण झाली. यावर उपाय म्हणून ‘लॅमॅक्स’ने ३० ते ५० किलोमीटर परिसरातील स्थानिक उमेदवारांची निवड केली व यातूनच त्यांची कामगारांची निकड भागवली. ‘महिंद्रा’ कंपनीनेसुद्धा कामगार टंचाईच्या समस्येवर स्थानिक उमेदवारांची मोठ्या प्रमाणातील निवड हाच पर्याय स्वीकारलेला दिसून येतो. ‘ह्युंदाई’ मोटार कंपनीने कंत्राटदारांच्या जोडीलाच स्थानिक संस्था, नागरिकांचे साहाय्य घेऊन आपली कामगारांची मागणी पूर्ण केली. यासाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले गेले व त्याचा फायदा कंपनी आणि स्थानिक कामगारांना झाला.

प्रशिक्षण अन्‌ नेमणूक
‘मनरेगा’सह विविध निर्माण प्रकल्पांवर या श्रमिकांना त्वरित व तुलनेत अधिक काम  मिळाले. परिणामी, हे कामगार आपल्या कुटुंबासह मूळ गावी स्थायिक होण्याच्या मानसिकतेत आहेत. याचाच परिणाम औद्यागिकदृष्ट्या अधिक प्रगत असणाऱ्या राज्यांच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये कुशल व अनुभवी कामगारांची आकस्मित व मोठ्या संख्येत टंचाई निर्माण होण्यावर झाला. उद्योग व्यवसाय क्षेत्रातील जाणकारांच्या मते, इतर प्रांतांमधून येणाऱ्या कुशल व अनुभवी कामगारांची कमतरता कायम असेल, हे आता आपल्याला गृहित धरावेच लागणार असून, इतर प्रांतीय कामगारांची कौशल्य कमतरता पूर्ण करण्यासाठी स्थानिक उमेदवारांना शिक्षित-प्रशिक्षित करून त्यांची नेमणूक करण्याची धोरण परंपरा कायमस्वरूपी अमलात आणावी लागेल.

(लेखक एचआर-व्यवस्थापनसल्लागार आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com