दिल्लीवरचे सावट!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

दिल्लीवर सध्या राज्य आहे ते धूळ, धुके आणि विषारी वायू यांचेच. दिल्ली परिसरातील अनेक गावांत सध्या शेतीची कापणी संपली आहे आणि त्यामुळे शेतात आगी लावून देण्याचा त्या परिसरातील प्रघात हा दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या प्रदूषित हवेस कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात, दिल्लीकर तसेच दिल्लीचे राज्यकर्ते यांचाही या प्रदूषणात तितकाच वाटा आहे

राजकीय घडामोडींमुळे कायम चर्चेत असलेल्या राजधानी दिल्लीवर सध्या सावट आले आहे ते प्रदूषणाचे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय नकाशावर मानाचे स्थान असलेल्या या महानगरात सध्या साधा फेरफटकाही मारू नका, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतील प्रदूषणाच्या पातळीने धोक्‍याच्या कमाल मर्यादाही ओलांडल्या आहेत आणि त्यामुळेच या महानगरात आरोग्य आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील शाळा या आठवडाअखेरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि प्रदूषणाची चादर या महानगरावर पसरल्यामुळे गेल्या दोन दिवसांत दिल्लीकरांना सूर्यदर्शनही होऊ शकलेले नाही. महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशाची मान यामुळे खाली जाणे, स्वाभाविक असले तरी ही परिस्थिती दिल्लीकरांनी स्वत:च ओढवून घेतली आहे, यात शंकाच नाही.

सध्या दिल्ली आणि परिसरात जोरदार वारे वाहत आहेत आणि त्यामुळे शेजारच्या राज्यांतून प्रदूषणाचे लोट दिल्लीच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे सध्या राजधानीवर ना. नरेंद्र मोदी सरकार राज्य करत आहे, ना. अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली सरकार! दिल्लीवर सध्या राज्य आहे ते धूळ, धुके आणि विषारी वायू यांचेच. दिल्ली परिसरातील अनेक गावांत सध्या शेतीची कापणी संपली आहे आणि त्यामुळे शेतात आगी लावून देण्याचा त्या परिसरातील प्रघात हा दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या प्रदूषित हवेस कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात, दिल्लीकर तसेच दिल्लीचे राज्यकर्ते यांचाही या प्रदूषणात तितकाच वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. या प्रतिष्ठेच्या शहरात रोज शेकडो टनांनी तयार होणाऱ्या कचऱ्यावर काही प्रक्रिया करण्याऐवजी तो सर्रास जाळला जातो. त्यात भर पडली ती श्री श्री रविशंकर यांनी यमुनेच्या थेट पात्रात आयोजित केलेल्या महाउत्सवाची. तेव्हा त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होईल, हे लक्षात घेऊन त्याला न्यायालयाने व राष्ट्रीय हरित लवादाने मनाई केली होती. मात्र, ती धाब्यावर बसवून, तो उत्सव पार पडलाच. त्यानंतर यंदाच्या दिवाळीत फटाक्‍यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी न्यायालयाने या परिसरात फटाके विक्रीस बंदी घातली होती. तरीही फटाक्‍यांच्या धुरामुळे व्हायचे ते झालेच. त्यामुळेच आता दिल्लीकरांना श्‍वसनापासून छाती भरून येण्यापर्यंत अनेक विकारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळेच दिल्लीवर ही आरोग्य आणीबाणीची परिस्थिती ओढवली आहे. आता यातून बाहेर पडायचे कसे ते दिल्लीकरांनीच ठरवायचे आहे.

Web Title: delhi pollution