विध्वंसाची स्पर्धा

दहशतवादाची त्यांच्यापेक्षा कडवी ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस)नामक आवृत्ती आता त्या देशात धुमाकूळ घालत आहे
destruction terrorism Islamic State attack on gurdwara in Afghanistan
destruction terrorism Islamic State attack on gurdwara in Afghanistansakal
Summary

दहशतवादाची त्यांच्यापेक्षा कडवी ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस)नामक आवृत्ती आता त्या देशात धुमाकूळ घालत आहे

दहशतवाद हे राजकीय उद्दिष्ट प्राप्त करण्याचे साधन म्हणून वापरण्यास सुरवात केली, की त्यातून उठणारे आगीचे लोळ सरसकट विनाश घडवितात. इतिहासाने हे वारंवार सिद्ध केले असूनही त्या मार्गातील कोणाला शहाणपण सुचत नाही. त्यातही धार्मिक कट्टरतावादाची झापडे डोळ्यावर चढलेली असली, की विध्वंसाचीही वकिली करता येते. अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्षे तालिबानी याच मार्गाने काम करीत होते. त्यातूनच त्यांनी अफगाणिस्तानची सत्ता मिळविली. पण ती मिळवणे जेवढे सोपे, तेवढे चालविणे अवघड. सत्ता चालविण्यासाठी काही किमान पायाभूत गोष्टी लागतात. अर्थकारणाची घडी बसवावी लागते. त्यासाठी अन्य देशांशी चांगले संबंध निर्माण करावे लागतात. आता कुठे त्यांना याचे भान येऊ लागले आहे. त्या दिशेने त्यांची खटपट सुरू असतानाच दहशतवादाची त्यांच्यापेक्षा कडवी ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस)नामक आवृत्ती आता त्या देशात धुमाकूळ घालत आहे. अफगाणिस्तानातील गुरुद्वारावर झालेला भीषण हल्ला ही त्या प्रकारच्या संघर्षातील ताजी घटना. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना `इसिस’ने भारतातील भाजप प्रवक्त्यांच्या वादग्रस्त विधानांचा सूड म्हणून हे करीत असल्याचे म्हटले आहे. हे निमित्त या कडव्या संघटनेने वापरले असले तरी या हल्ल्याची पार्श्वभूमी आहे ती अफगाणिस्तानातील विध्वंसाच्या स्पर्धेची.

असा विध्वंसक कार्यक्रम हाती घेतलेल्यांना चर्चा, संवाद, सहकार्य अशा सगळ्याच गोष्टींची तीव्र ॲलर्जी असते. राजनैतिक प्रयत्नांची आवश्यकता ओळखून भारताने नुकतीच अफगाणिस्तानातील तालिबान सरकारशी चर्चेची प्रक्रिया सुरू केली होती. परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या देशाचा दौरा केला होता. अफगाणिस्तानात आता शिल्लक राहिलेल्या एकमेव गुरुद्वारावरील हल्ल्याला याही घटनेचा संदर्भ आहेच. तिथे स्थिरता निर्माण होऊ द्यायचीच नाही, असे `इसिस’सारख्या संघटनांचे इरादे आहेत. त्यादृष्टीने ते सतत त्रास देत राहणार, याचीच दुश्चिन्हे या हल्ल्याने समोर आणली आहेत. जो धडा तालिबानला आता मिळत आहे, तसाच तो पाकिस्तानलाही खरे तर मिळाला आहे. प्रश्न आहे तो हे दोघे किती शिकले आहेत, याचाच. पाकिस्तानने दहशतवादाचा उपयोग भारताचे नुकसान करण्यासाठी वापरला; पण दुसऱ्याचे नुकसान करण्याच्या नादात पोसलेल्या भस्मासुरांनी त्या देशाची वाट लावली. इतकी की आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर तो देश येऊन ठेपला आहे. वीज वाचवण्यासाठी कराचीतील मॉल, रेस्टॉरंट, दुकाने, आस्थापना सर्व बंद ठेवण्याचे पाऊल कराचीसारख्या शहरात उचलावे लागले आहे. आयात चहावरील खर्चाचा बोजा परवडत नसल्याने लोकांना चहा कमी प्या, असा सल्ला देण्याची वेळ सरकारवर आली आहे. देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी महत्प्रयास करावे लागणार आहेत. ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’ने दहशतवादाच्या प्रश्नावर पाकिस्तानला करड्या यादीत टाकल्यापासून त्या देशाला आर्थिक निर्बंधही सहन करावे लागत आहेत. त्या यादीतून नाव काढावे म्हणून निरीक्षकांना लवकरात लवकर पाकिस्तानात पाठवावे, अशी गळ परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी त्या संघटनेला घातली आहे.

त्या बाबतीत तो देश किती घायकुतीला आला आहे, हेच स्पष्ट होते. एकेकाळी अफगाणिस्तानातील तत्कालिन सरकारच्या विरोधात तालिबानला सर्व प्रकारची मदत पाकिस्तान पुरवत होता. तालिबान सत्तेवर आल्यानंतर मात्र दोघांत तणाव निर्माण झाला आहे. ‘पाकिस्तानविरोधी कारवाया करणाऱ्या तुमच्या भूमीवरील दहशतवाद्यांना आवरा’, असे पाकिस्तान तालिबानला सांगत आहे. अफगाणिस्तानच्या हद्दीत जाऊन पाकिस्तानने कारवाईही केली. काळ धडा देतो तो असा. या बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील आपले हितसंबंध सुरक्षित राखणे, त्या देशावरील प्रभाव कायम राखणे यासाठी भारत प्रयत्नशील आहे. तालिबानशी चर्चा म्हणजे त्या संघटनेला व तिच्या राजवटीला अधिमान्यता दिल्यासारखे होईल, असा एक मतप्रवाह असूनही भारत सरकारने व्यवहार्य विचार करून चर्चेचा एक मार्ग खुला केला आहे. प्राप्त परिस्थितीत तो रास्तही आहे. मध्य आशियातील देशांशी राजकीय,आर्थिक संबंध अधिक घनिष्ठ होत असताना सर्वच दृष्टीने अफगाणिस्तानातील स्थैर्य आपल्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. युद्धातील विध्वंसानंतर त्या देशाच्या फेरउभारणीत भारताने पुढाकार घेतला होता. आर्थिक मदतही केली. ती ‘गुंतवणूक’ वाया जाता कामा नये. त्यामुळे हे प्रयत्न जारी ठेवतानाच दहशतवादाविरुद्धची लढाईही खऱ्या अर्थाने चालू ठेवावी लागणार आहे. अमेरिका,रशिया, चीन यासारखे बडे देश असोत वा पाकिस्तानसारखे देश यांनी आपापल्या हितसंबंधांतूनच आजवर दहशतवादाच्या प्रश्नाकडे पाहिल्याने अद्यापही त्या विरोधातील लढाईला यश आलेले नाही. अमेरिकेने एकेकाळी या लढाईला ‘वैश्विक’ असे नाव दिले होते. पण प्रत्यक्षात ती खऱ्या अर्थाने कधीच वैश्विक झाली नाही. आता त्याची सगळ्यांनाच झळ बसत असताना तरी या सर्व देशांना जागे व्हावे लागेल.

एकाच शत्रूविरुद्ध सारखे सारखे लढलात, तर तुम्हीच तुमची युद्धविद्या शत्रूला शिकवाल.

- नेपोलिअन बोनापार्ट, सेनानी-राज्यकर्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com