खुर्ची की मिर्ची? (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938, भाद्रपद कृष्ण द्वादशी.
आजचा वार : तलवार!
आजचा सुविचार : धीर्धरा धीर्धरा तकवा...हडबडूं गडबडूं नका!!

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938, भाद्रपद कृष्ण द्वादशी.
आजचा वार : तलवार!
आजचा सुविचार : धीर्धरा धीर्धरा तकवा...हडबडूं गडबडूं नका!!

नमो नम: नमो नम: नमो नम: (आज 1111 वेळा लिहिणार आहे...) मन उदास आहे. सकाळी उठलो. दात घासावेसेसुद्धा वाटत नव्हते. तरीसुद्धा घासले. नाश्‍ता करावासा वाटत नव्हता, तरीही केला. आंघोळ तर...जाऊ दे. (खुलासा : तीसुद्धा केली.) मंत्रालयात जावेसे वाटत नव्हते. तरीही गेलो. घरी परतावेसे वाटत नव्हते. तरीही आलो. (कुठे जाणार?) समोर पंचपक्‍वान्नाचे ताट असावे, आणि शिवाय बाजूला शेवपुरीची फर्मास प्लेट असावी; पण ऍसिडिटीने जीव हैराण झाल्यामुळे काही म्हणता काही धड खाता येऊ नये, असे काहीसे झाले आहे. तोंडाची सगळी चवच बिघडून गेली आहे.

खुर्ची म्हटले की आजकाल मला शिळक येते. मंत्रालयात हपिसात गेलो होतो, तेव्हाही खुर्चीत बसावेसेच वाटत नव्हते. म्हटले, ज्या वस्तूची आपल्याला पर्वा नाही, त्यावर बसून काय उपयोग? उभ्यानेच फायली बघायला सुरवात केली. डाव्या बाजूला ठेवलेल्या फायली उचलायच्या, उजव्या बाजूला ठेवायच्या, या कामासाठी खुर्चीत कशाला बसायला हवे? उगीच दोन-चार कपाटे उघडून पाहिली. बंद केली. टेबलाचे खण उपसण्याचे मनात आले होते; पण नाही उघडले. टेबलाच्या खणांचे डिझाइन अत्यंत चुकीचे असते. खुर्चीत बसल्याशिवाय ते धड उघडता येत नाहीत, असा शोध मला लागला आहे. जमिनीवर बसून खणाची कडी खेचावी, तर आख्खा खण बाहेर येण्याचे भय असते. टेबलाच्या सर्वांत खालचा खण तर अत्यंत गैरसोयीचा प्रकार आहे. सबब, टेबलाशी फिरकलोच नाही. मग उगीच खिडकीशी जाऊन उभा राहिलो. इथे उभे राहून समुद्राची गंमत बघण्यात तासचे तास जातात, अशी टीप मला माजी मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यांचे ऑब्जर्वेशन चुकीचे नाही.

...मला बराच वेळ उभे पाहून आमच्या "पीए'ला वेगळाच संशय आला. ""काही प्रॉब्लेम आहे का सर?'' असे तीनदा विचारून गेला. मी अर्थात तीनदा "नाही' म्हटले. थोड्या वेळाने पीए महाशय परत आले. त्यांनी आमची खुर्ची निरखून पाहिली. लगबगीने बाहेर जाऊन एक कारागीर आणून वर आलेला खिळा ठोकून घेतला आणि म्हणाले, "" सर, आता बसायला हरकत नाही!''

""पण मला खुर्चीत बसायचंच नाही मुळी!'' मी ठणकावून सांगितले. ह्यावर "पण का सर?' असे त्याला विचारायचे असणार!! पण त्याऐवजी त्याने ""सुरणाची भाजी खा आणि तिखट खाऊ नका!'' असा अगम्य सल्ला का दिला, हे मला समजले नाही. जाऊदे.

खुर्चीची पर्वा नाही, असे मी सहज म्हणालो; पण त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत. कोझीकोडच्या पक्षाच्या कार्यकारिणीत आम्हाला "आता या!' असे सांगण्यात आले, इथपासून चंदुकाका कोल्हापूरकरांना चान्स गावणार, इथपर्यंत नाना तऱ्हेच्या वावड्या उठल्या. इतक्‍या, की ही वावडी ऐकून "रामटेक' सोडून जळगावला निघालेल्या नाथाभाऊंनी भर रस्त्यातून गाड्या पुन्हा मुंबईकडे वळवल्या, असेही कोणीतरी म्हणत होते. खरे खोटे नाथाभाऊच जाणोत!! हपिसात खिडकीशी उभा असतानाच काही मंत्री उगीच काही तरी कामाचे निमित्त काढून येत होते, नि चाचपणी करत होते. ""बरे आहात ना?'' असे विचारत होते. त्यातले "बरे'ला काही अर्थ नव्हता. ""आहात ना?''ला महत्त्व फार!! मी आपली मोघम उत्तरे देऊन त्यांना वाटेला लावत होतो. शेवटी वावडीने इतका कळस गाठला, की आमचे परममित्र श्रीमान उधोजीसाहेब यांचाच थेट फोन आला. "गरुड बसला का?' असे त्यांनी विचारले. ही आमची कोड लॅंग्वेज आहे. गरुड बसला का? याचा अर्थ "सगळे ठीक आहे ना?' असा घ्यायचा. "गरुड उडाला' म्हटले की "लोच्या झाला रे' असा घ्यायचा!!
...मी त्यांना म्हटले, "गरुड उभा आहे!''
असो.

Web Title: dhing tang

टॅग्स