पारदर्शक आणि धारदर्शक! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 19 जानेवारी 2017

स्थळ - मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ - तिळगूळ घ्या आणि...अं...अं...अंऽऽऽ!
प्रसंग - दोन हजाराच्या नोटेसारखा गुलाबी.
पात्रे - राजाधिराज उधोजीमहाराज आणि सौभाग्यवती कमळाबाई.

अलंकारांनी मढलेल्या, काळी चंद्रकळा नेसलेल्या सौभाग्यवती कमळाबाई हातात चांदीची वाटी घेऊन उभ्या आहेत. वाटीत तिळगूळ आहे...बाजूला तिळगुळाचा रिकामा डबादेखील आहे. त्या कुणाची तरी वाट पाहत आहेत. तेवढ्यात मिशीला पीळ देत उधोजीराजे प्रविष्ट होतात. अब आगे...

कमळाबाई - (प्रेमभराने) इकडून एकदाचं येणं झालं म्हणायचं! कित्ती वाट बघत होत्ये मी!!

स्थळ - मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ - तिळगूळ घ्या आणि...अं...अं...अंऽऽऽ!
प्रसंग - दोन हजाराच्या नोटेसारखा गुलाबी.
पात्रे - राजाधिराज उधोजीमहाराज आणि सौभाग्यवती कमळाबाई.

अलंकारांनी मढलेल्या, काळी चंद्रकळा नेसलेल्या सौभाग्यवती कमळाबाई हातात चांदीची वाटी घेऊन उभ्या आहेत. वाटीत तिळगूळ आहे...बाजूला तिळगुळाचा रिकामा डबादेखील आहे. त्या कुणाची तरी वाट पाहत आहेत. तेवढ्यात मिशीला पीळ देत उधोजीराजे प्रविष्ट होतात. अब आगे...

कमळाबाई - (प्रेमभराने) इकडून एकदाचं येणं झालं म्हणायचं! कित्ती वाट बघत होत्ये मी!!

उधोजीराजे - (गोंधळून मागे बघत) अं? इकडूनच आलो की! खिडकीतून यायला हवं होतं का?

कमळाबाई - (खुदकन हसत) इश्‍श! भल्तेच बोआ विनोदी तुम्ही! कोसो सुच्तं हो तुम्हॉलॉ? आख्खा गाव आमचा तिळगूळ खाऊन गेला, तुम्हीच मागे राहिलात!

उधोजीराजे - (दुप्पट गोंधळून) आता ह्यात आम्ही विनोद काय केला? 

कमळाबाई - (हसू आवरत) ऱ्हायलं!! तिळगूळ घ्या आणि आजतरी गोड गोड बोला!!

उधोजीराजे - (हादरून) तुम्ही गोड बोलायला लागलात की हलव्यासारखा काटा येतो हो अंगावर!!

कमळाबाई - (खोट्या लाडीकपणाने) इश्‍श! आम्ही का चेटकीण आहोत? अंगावर काटा यायला? तिळगूळ तरी घ्या म्हंटे मी!!

उधोजीराजे - (हातावर तिळगूळ घेत) संक्रांत झाली की परवाच! आता कशाला तिळगूळ? उरलेले खपवताय वाटतं आमच्या तळहातावर!!

कमळाबाई - (वाटी झटकत) संपले! हे शेवटचे तिळगूळ होते!! हा बघा, संपला डबा!!

उधोजीराजे - (मिशीवर बोट फिरवत) प्लाष्टिकच्या डब्यात ठेवू नये तिळगूळ!! पारदर्शक असलं तरी प्लाष्टिक घातक असतं!

कमळाबाई - (अभिमानाने) आम्चं सगळं पार्दर्शकच असतं बरं का! आम्ही नै झाकून ठेवत काही!! हजार वर्ष टिकतं आमचं प्लाष्टिक! 

उधोजीराजे - (एक भिवई चढवत) तुमचं पारदर्शक असेल, तर आमचं धारदर्शक आहे! कळलं नं?

कमळाबाई - (गवाक्षाकडे गर्रकन तोंड फिरवत) निदान तिळगूळ खाताना तरी गोड बोलावं माणसानं! नंतर बारा महिने आहेच शिमगा!!

उधोजीराजे - (समजूत घालत) अहो, विनोद केला आम्ही!! विनोद केला तर फुरंगटता, नॉर्मल बोललो, तर तुम्हाला तो विनोद वाटतो! अशा परिस्थितीत आम्ही बोलायचं तरी काय अं?

कमळाबाई - (पदर घट्ट आवळून) माणसानं कसं आरशासारखं स्वच्छ मन ठेवावं! ओठात एक, पोटात एक... असं नाही बै आवडत आम्हाला! निवळशंख पाण्यासारखं आरपार असलं पाहिजे मन!! मन गढूळ असेल तर कसं टिकणार नातं? सांगा, सांगा ना!!

उधोजीराजे - (गडबडून) तुमचा हा अचानक पारदर्शक होण्याचा आग्रह का होतो आहे, समजत नाही!! गेल्या पंचवीसेक वर्षांची आपली सोयरीक... पण कधी हे पारदर्शकत्वाचं खूळ ऐकलं नव्हतं. आत्ताच का आठवला तुम्हाला पारदर्शकपणा, आं?

कमळाबाई - (मान वेळावत) मी पैल्यापास्नं सांगत होते की पारदर्शक व्हा, पारदर्शक व्हा!! पण तुम्ही आपले सदानकदा तलवारीला धार काढत बसलेले!!

उधोजीराजे - (खोल आवाजात) सगळं इतकं पारदर्शक असतं, तर आपलं नातं तरी जमलं असतं का? विचार करा!! झाकली मूठ का कधी पारदर्शक असते? बंद आहे म्हणून ती सव्वा लाखाची आहे, असं म्हणायचं!!

कमळाबाई - (कळवळून) नका हो असं वेडंवाकडं बोलू! आमचा पारदर्शी स्वभाव व तुमचा हा असा धारदर्शी बाणा... कसं होणार?

उधोजीराजे - (व्यावहारिक कोरडेपणाने) इतकी वर्षं झालं तसंच होणार! आमच्या व्यक्‍तिमत्त्वाची धार अवघा महाराष्ट्र जाणतो! धारदर्शक कारभार म्हटलं की पहिले आठवतो तो हा उधोजीच!! पण तुमचा पारदर्शकतेशी संबंध काय, ते आधी सांगा! पारदर्शक म्हंजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला?

कमळाबाई - (लाडीकपणाने जवळ येत) पारदर्शक म्हंजे समजत नाही? अहो, पारदर्शक म्हंजे- आमच्या मनासारखं!! कळलं?

Web Title: dhing tang