गध्याची गोष्ट! (ढिंग टांग)

गध्याची गोष्ट! (ढिंग टांग)

मुलांनो, तुमचे जनरल नालेज फार्फार कमी पडत्ये अश्‍या तक्रारी आहेत. ह्या विश्‍वात ‘ऐकावे ते नवलच’ ह्या सदरात मोडणाऱ्या अनेक गोष्टी सांपडतात. त्या आपण अधून मधून (टीव्हीवर) बघाव्यात किंवा (माशिकात) वाचाव्यात. त्याने किनई आपले जनरल नालेज वाढते. आपल्या भारतात विविध प्रदेशांत विविध प्राणी सापडतात. उदाहरणार्थ, आपल्या महाराष्ट्रात वाघ आढळतो. खराखुरा वाघ हं? निवडणुकीतला नाही!! तर ह्या खऱ्याखुऱ्या वाघाचे खरेखुरे फोटो काढणारे खरेखुरे फोटोग्राफरदेखील आहेत. त्यांनी काढलेले फोटो बघावेत. त्यावरून आपल्याला कळते की वाघ हा नामशेष होणारा प्राणी असून, त्याला फार्फार जपले पाहिजे. वाघ कसा डर्काळतो? ‘जय महाराष्ट्र’ असे ओरडू नका रे... जाऊ दे.

बरं, हत्ती कुठे आढळतो सांगा बरे? नाही, नाही...मुलांनो, तुम्ही अडाणी आहात. हत्ती उत्तर प्रदेशात सापडतो, असे तुम्हाला कोणी सांगितले? खोटे आहे... उत्तर प्रदेशातला हत्ती हा निवडणुकीचा हत्ती आहे. खराखुरा नाही काही!! खरे हत्ती केरळातच. तिथे रस्ता क्रॉस करताना इकडे तिकडे बघावे लागते. हत्तींचा कळप तर येत नाही ना? हत्ती कसा ओरडतो?..छे, छे, कठीण आहे तुमचे. किती घाणेरडे आवाज काढता? जाऊ दे. 

आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी गुजराथ नावाचे एक राज्य आहे. आहे की नाही? हं...तर ह्या गुजराथ राज्यात कुठला प्राणी आढळतो सांगा पाहू? बरे बरे, तुम्हाला क्‍लू देतो... हा प्राणी कमालीचा हुश्‍शार आणि हॅंडसम आहे... काय म्हणालात? सिंव्ह? नाही, चुकलात, साफ चुकलात!! आणखी एक क्‍लू देतो... त्याची जाहिरात की नाही, आपला लाडका सुपरसूर्य अमिताभ बच्चन ह्यांनी केली आहे. कुछ दिन तो गुजारो हमारे गुजराथ में... अशी!! काय म्हणालात? आणखी क्‍लू देऊ? अरे, कसे रे तुम्हाला कळत नाही? जाऊ दे. 

आपल्या गुजराथचा सर्वांत प्रसिद्ध प्राणी आहे- गाढव!!

त्याला इंडियन वाइल्ड ॲस किंवा बलुची गधा असे म्हटले जाते. ते पाकिस्तानातही आढळते. गुजराथेत त्याला घुडखूर असे म्हटले जाते. घुडखूर म्हंजे घोड्याचे खूर असलेले गाढव. होय, गाढव!! हसू नका... तुम्हाला कितीही हसू आले तरी गाढव हा एक छानदार प्राणी आहेच मुळी!! गाढव लहानपणी तर फारच गोंडस दिसत्ये.-हरीण पाडसासारखे. असे वाटते की त्याला जवळ घ्यावे. त्याचे लांबच लांब कान ओढावेत. पण लांबून हं! तुमच्या मास्तरांनी एकदा जवळ जाऊन गाढवाचे कान ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना शीकलीव्ह वर जावे लागले. जाऊ दे.

साधेसुधे गाढव कान पाडून रेल्वेची खडी वाहताना दिसते. किंवा उकिरड्यावर धुमाकूळ घालताना दिसते. गाढव कसे ओरडते सांगा पाहू? अरे, अरे अरे... किती खिंकाळताय... पुरे पुरे!! गाढवाचा आवाज काढून दाखव, असं म्हटल्यावर लग्गेच हाँ ही हाँ ही हाँ ही हाँ ही काय करायला लागता?

साध्या गाढवाला काही अक्‍कल नसते. गाढवच ते!! त्याला कुठून असणार अक्‍कल? साधी गाढवे अगदीच गाढव असतात. पण गुजराथमधल्या गाढवांचे तसे नाही. ती जबरदस्त बुद्धिमान असतात. ती वेगाने पळतात. वेगाने उड्या मारतात. समोरून घोड्यासारखी दिसतात. पाठीमागून कशी दिसतात? विचारताय? तुम्हाला काय करायचे आहे? चावट लेकाचे!! गाढव म्हंजे काय नाचरा मोर आहे का? फक्‍त पुढूनच बघायला? काहीत्तरीच तुमचे!! हॅ:!!

आपल्या उत्तर प्रदेशात किनई अखिलेशकुमार यादव म्हणून एक पुढारी आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन ह्यांना विनंती केली आहे, की यापुढे गुजराथच्या गाढवांची जाहिरात तुम्ही टीव्हीवर करू नका म्हणून. क्‍यों पूछो?

कारण गधा अगर सावन में अंधा हो जाय, तो उसे हरियालीही हरियाली नजर आती है!! हाहाहा!! जा आता घरी!! गाढव कुठले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com