यंदा कर्तव्य नाही? (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 3 मार्च 2017

आमचे पूर्वाश्रमीचे मित्र
श्रीमान नाना फडणवीस यांसी,
कोपरापासून नमस्कार. 

आमचे पूर्वाश्रमीचे मित्र
श्रीमान नाना फडणवीस यांसी,
कोपरापासून नमस्कार. 

माझे (तुमच्याविना) बरे चालले आहे, हे आपण पाहातच असाल. (आमच्याविना) तुमचेही सारे क्षेम आहे, हे मीदेखील पाहातो आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार की तुम्ही आम्हाला, हा आता कळीचा मुद्दा राहिलेला नाही; पण लोकांना कोण सांगणार? सारखी आपली चर्चा सुरू आहे. शेवटी काल कंटाळून मी आमच्या लोकांना सांगून टाकले, ‘कोणालाही महापौर करा! काय फरक पडतो?’ असो. एका वेगळ्याच कारणासाठी हे पत्र लिहीत आहे. सहसा मी कुणाला पत्र लिहीत नाही; पण आता काही इलाजच उरला नाही. पत्र लिहिण्याचे कारण मात्र अतिशय गंभीर आणि संतापाचा कडेलोट करणारे आहे. तुमच्या कमळ पार्टीच्या लोकांचे असेच वर्तन राहिले तर मात्र शंभर टक्‍के (तुमच्या भाषेत शतप्रतिशत) मी आमचा पाठिंबा काढून घेईन आणि तुमचे सरकार दाणकन पाडीन!! ही धमकी नसून ह्या अजिंक्‍यवीर उधोजीचा शब्द आहे, हे बरे जाणून असा!! 

गेले काही दिवस पाहातो आहे. अचानक तुमच्या पार्टीतल्या लोकांनी आपापल्या घरी लग्नाचे बार उडवले आहेत. गेल्या काही दिवसांत मला इतकी विवाहाची निमंत्रणे आली, की दसरा- दिवाळीला इतक्‍या शुभेच्छादेखील आल्या नाहीत. रोज उठून बघावे तर टेबलावर विवाह निमंत्रणपत्रिकांची नवी चळत असते. हा काय मामला आहे? कमळ पार्टीतल्या इतक्‍या लोकांनी एकदम घाऊक लग्ने का काढली, हे काही समजत नाही. गेल्या आठवड्यात महापौरपदाचा मामला गरम असताना तुमचे कमळाध्यक्ष रावसाहेब दानवेजी मुलाच्या लग्नाची पत्रिका देऊन गेले. निमंत्रणदेखील अघळपघळ!! (आदल्या रात्रीच कार्यालय हातात मिळणार असल्याने) सीमांत पूजनापासून रिसेप्शनपर्यंत कंप्लीट उपस्थित रहा, असे ऐसपैस निमंत्रण. सकाळी नाश्‍त्याला इडली आणि उपमा ठेवलाय, हे सांगायलाही त्यांनी कमी केले नाही. (उपवासवाल्यांना साबूदाणा खिचडी मिळेल, असे आश्‍वासनही दिले.) आता असे निमंत्रण मिळाल्यावर एखाद्याला ‘नाही येणार’ असे कसे सांगणार? तोंडदेखले ‘हो’ म्हणालो इतकेच. काल की परवा तुमचे ते कृषिमंत्री बावनकुळे येऊन गेले. येऊन उभे राहिले, तेव्हा नेमकी आमच्याकडे मीटिंग चालली होती. सगळ्यांना पत्रिका कशी वाटणार? म्हणून उगीच वेळ काढत होते. शेवटी मीच उठून त्यांना कोपऱ्यात नेऊन निमंत्रणपत्रिका घेतली. त्यांच्या घरीही कार्य आहे. म्हटले, हे काय चालले आहे?

काल तुमच्या त्या कोल्हापूरच्या चंद्रकांतदादांचा फोन आला. ते गेले काही दिवस ‘येऊ का, येऊ?’ अश्‍या पोकळ धमक्‍या देतच होते. त्यांना म्हटले ‘काय काढलं?’ तर म्हणाले, ‘‘बोलणी करायला कधी येऊ?’’ मी म्हटले, ‘‘कसली बोलणी?’’ तर म्हणाले, ‘‘ याद्या, देवाणघेवाण, सगळं व्यवस्थित रीतीप्रमाणे झालेलं बरं असतं!’’ आता ह्यावर काय बोलायचे? मी इतका संतापलो. अरे, महापौरपदाचे प्रकरण म्हणजे काय लग्नकार्य आहे? याद्या काय, बोलणी काय! देवाणघेवाण काय!! 

‘यंदा कर्तव्य नाही!’ असे सांगून मी फोन ठेवून दिला. पण कोल्हापूरकरदादा आहेत महाचिवट. ‘व्हाट्‌सॲप’वर मेसेजवर मेसेज पाठवताहेत. शेवटी फोन बंद करून ठेवला आहे. 

तुमच्याबद्दल पर्सनली माझी काही तक्रार नाही. तुम्ही कधीही ‘मातोश्री’वर या. बटाटेवडे आणि कोळंबीच्या तिखल्याचं काय एवढे? पण तुमच्या ह्या कमळ पार्टीतल्या लोकांना आवरा. असे प्रत्येक लग्नाला जायला लागलो तर दिवाळे वाजेल. आधीच नोटाबंदीनंतर आहेराचे पाकीट डोईजड व्हायला लागले आहे. उभ्याने जेवणासाठी आहेराचे पाकीट आजकाल पर्वडत नाही. तरी ही निमंत्रणे रोखा. आम्हाला यंदा कर्तव्य नाही हे जाणून असा. 

तुमचाच माजी मित्र. उधोजी.

ता. क. : तुम्ही वऱ्हाडातले आहात, हे मला माहीत आहे; पण लग्नाच्या वऱ्हाडातले आहात का? हे कृपया स्पष्ट करा. मगच या!! 

Web Title: dhing tang