युद्धावशेष... (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 4 मार्च 2017

गुरमेहर इतकेच म्हणाली, की
तिच्या वडलांना नाही मारले
पलिकडल्या पाकिस्तान्यांनी.
तिच्या वडलांना नाही मारले,
अलिकडल्या आक्रस्ताळ्यांनी.
तिच्या वडलांना मारले
एका अनावश्‍यक युद्धाने.

युद्धे माणसे मारतात,
सबब, युद्ध नकोत...नकोतच.

गुरमेहर इतकेच म्हणाली, की
मी ह्यांना घाबरत नाही.
मी त्यांनाही घाबरत नाही.
मी कुणालाच घाबरत नाही.
ह्याचा अर्थ एवढाच की
गुरमेहर फक्‍त घाबरते
अनावश्‍यक युद्धाला.

गुरमेहर इतकेच म्हणाली, की
तिच्या वडलांना नाही मारले
पलिकडल्या पाकिस्तान्यांनी.
तिच्या वडलांना नाही मारले,
अलिकडल्या आक्रस्ताळ्यांनी.
तिच्या वडलांना मारले
एका अनावश्‍यक युद्धाने.

युद्धे माणसे मारतात,
सबब, युद्ध नकोत...नकोतच.

गुरमेहर इतकेच म्हणाली, की
मी ह्यांना घाबरत नाही.
मी त्यांनाही घाबरत नाही.
मी कुणालाच घाबरत नाही.
ह्याचा अर्थ एवढाच की
गुरमेहर फक्‍त घाबरते
अनावश्‍यक युद्धाला.

गुरमेहर बोलली नाही
काहीही चुकीचे, तरीही
एवढे बोलून ती पळून गेली
आपल्या गावाला किंवा गेलाबाजार 
एखाद्या अज्ञात ठिकाणी,
एखाद्या संभावित सत्यासारखी.

सत्य नेहमी असेच वागते...
त्याला नसतात आईबाप,
किंवा असलेच तर
असतात युद्धात मारले गेलेले.
मग अनाथ, पोरके सत्य
अचानक उगवते कुठेतरी
आणि आपला चेहरा दाखवून
पुन्हा दडून बसते अज्ञात ठिकाणी.
सत्य दिसले रे दिसले की
दोन गोष्टी हमखास होतात.
सत्याच्या बाजूने निघतात
शहाजोग मोर्चे आणि
सत्याच्या विरोधात
उगारल्या जातात मुठी.

गजबजतात न्यायालयांची
अशीलबाज आवारे आणि
रात्रभर ठणकत राहतात आवाज
ठिकठिकाणच्या पोलिस ठाण्यात.
दैनिकांच्या रकान्यांप्रमाणे
भरगच्च भरून वाहू लागतात
मतेमतांतराचे नाले, आणि
ड्रेनेज हिडीस द्वेषाचे.
भळभळा वाहू लागते जखम
एरवी दडून 
राहणाऱ्या अश्‍वत्थाम्याची.
ज्याच्या भाळी युगानुयुगे
पिकत असतो अमरत्वाचा शाप!
सत्य निघते भरडून चांगले
जात्याच्या दोन पात्यांमध्ये
परंतु, त्या जात्याचा खुंटा
ज्याच्या हाती असतो,
तो मात्र अज्ञातच राहातो,
जात्याभोवती जमा झालेले
पीठ तेवढे तो घेऊन जातो...

गुरमेहरला एवढेच 
म्हणायचे होते, की
युद्धात विजेते नसतात...
असतात फक्‍त विधवा.
पण युद्धे ही एक 
राजकीय सोयदेखील असते,
हे गुरमेहरला कोणी सांगावे?

तोवर सत्याने अज्ञात ठिकाणी
तोंड काळे केलेलेच बरे!

Web Title: dhing tang