सं. एकच मेला! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 6 मार्च 2017

(एक नाट्यप्रवेश...)

स्थळ - मातोश्री महाल, अंत-पुर.
वेळ - गोंधळलेली.
काळ - वेंधळलेला.
प्रसंग - सादळलेला.
पात्रे - आदळलेली!!

उधोजीराजे - (ताडताड पावलं टाकीत प्रवेश करत) कमळे, कमळे काय केलंस हे?

कमळाबाई - (पाठमोऱ्या पोजमध्ये मुसमुसत) काय केलं आम्ही?

उधोजीराजे - (आश्‍चर्यचकित होत) आम्ही? आम्ही? स्वत-ला ‘आम्ही’ म्हणायला लागलीस इतक्‍यात? ह्या महालात दासी-बटकी म्हणून वावरलीस, हे विसरू नकोस!! का परत आलीस ह्या घरात?

(एक नाट्यप्रवेश...)

स्थळ - मातोश्री महाल, अंत-पुर.
वेळ - गोंधळलेली.
काळ - वेंधळलेला.
प्रसंग - सादळलेला.
पात्रे - आदळलेली!!

उधोजीराजे - (ताडताड पावलं टाकीत प्रवेश करत) कमळे, कमळे काय केलंस हे?

कमळाबाई - (पाठमोऱ्या पोजमध्ये मुसमुसत) काय केलं आम्ही?

उधोजीराजे - (आश्‍चर्यचकित होत) आम्ही? आम्ही? स्वत-ला ‘आम्ही’ म्हणायला लागलीस इतक्‍यात? ह्या महालात दासी-बटकी म्हणून वावरलीस, हे विसरू नकोस!! का परत आलीस ह्या घरात?

कमळाबाई - (हुंदका काढत) बोला! बोला मला फडाफडा!! मीच मेली कमनशिबी!! मी पडले बाईमाणूस...काय करू? कुठं जाऊ? 

उधोजीराजे - (मनातल्या मनात चुळबुळत) छे, हे भलतंच त्रांगडं होऊन बसलं! पंचवीस वर्षं नासवल्यानंतर एकदाची ही पीडा घरातून टळली असं वाटलं होतं...पण छे, कसचं काय नि कसचं काय! काळं तोंड घेऊन परत आली! (उघडपणे) बये, आता किती दिवस राहणार आहेस?

कमळाबाई - (कारण स्पष्ट करत) माझा मोबाइलचा चार्जर राहिला होता, म्हणून आल्ये!!

उधोजीराजे - (पुटपुटत) त्यासाठी परत कशाला यायचं? कुणाचा तरी ढापायचा!! नाहीतरी तुला ढापाढापीची सवयच आहे, कमळे!! 

कमळाबाई - (फणकाऱ्यानं) अडलंय माझं खेटर! मी कशाला ढापू? पहिला होता, तोच तुमचा ढापला होता!! हुहुहु!! आणि हो, हे माझंच घर आहे. कधीही येईन...कधीही जाईन!

उधोजीराजे - (संतापून) आमचा महाल म्हंजे धर्मशाळा नव्हे, कमळाबाई!! ही वाघाची गुहा आहे गुहा!! इथं येणाऱ्याची पावलं दिसतात, पण जाणाऱ्याची नव्हे. कळलं?

कमळाबाई - (फायनल स्वरात) आता हेच माझं घर आहे. मी इथंच राहणार! 

उधोजीराजे - (स्तंभित होत्साते) कमळे, तुझा अपमानबिपमान होत नाही का गं? किती हा लोचटपणा? किती ही लाचारी? एखाद्या घरातून धक्‍के मारून हाकलल्यानंतर तिथं सावलीलादेखील थांबू नये, असं म्हणतात. आणि तू तर कोडगेपणाचा कळस केलास!! मान ना मान, मै तेरा मेहमान!!

कमळाबाई - (एक दीर्घ नि-श्‍वास टाकत) प्रजेच्या कल्याणासाठी मी एक काय, लाख अपमान सहन करीन! माझा अपमान होण्यानं मुंबईकरांचे अच्छे दिन येणार असतील, तर...

उधोजीराजे - (गोरेमोरे होत) बरं बरं! पुरे झाला तुझा नाटकीपणा!! पण परत आल्येस तर पुन्हा राणीसारखी राहशील, ह्या भ्रमात राहू नकोस! ह्या घरात तुला दाणापाणी, कपडालत्ता काहीही मिळणार नाही! कोपऱ्यात पडून राहावं लागेल! पानात पडेल ते खावं लागेल! अंघोळीला गरम पाणी, साबण काहीही मिळणार नाही! आहे कबूल?

कमळाबाई - (जसे सिंधूने सुधाकराच्या पायावर लोटून घेतले तस्से...) नाथ...तुम्ही म्हणाल तश्‍शी राहीन! अंगावर धडुतं, आणि पोटाला कोरभर भाकरी मिळाली, तर त्यात समाधान मानीन! मी तुमच्या चरणीची दाशी आहे! घरकाम करीन, दळणकांडण करीन! राब राब राबीन!! पण मला अव्हेरू नका! (धाडकन त्यांच्या पायाशी स्वत-ला लोटून देत) ही पाहा, हा देह तुमच्या पायावर लोटिला! स्त्रीजातीचं खरं धन शेवटी तिचं कुंकूच असतं बरं!! 

उधोजीराजे - (सपशेल गोंधळून जात) देवा रे देवा! आता हा काय तिढा पडला? ह्या लोचट भवानीचा विळखा कसा बरे सोडावावा? ज्याप्रमाणे एखाद्या कल्पवृक्षाच्या खोडावर अमरवेल चढावी, आणि त्या वृक्षाचा सारा जीवनरस शोषून घेत अमरवेलीनं आपला मांडव उभारावा, तद्‌वत अवस्था झाली!! (कमळेस उद्देशून) हो, हो! तू म्हणत्येस तसं होईल! पण आधी माझे पाय ओढणं थांबीव! 

कमळाबाई - (डोळे पुसत) थांक्‍यू!

उधोजीराजे - (डोळे बारीक करत संशयानं)...पण अचानक तुझ्यात हा बदल झाला कशानं, कमळे?

कमळाबाई - (कपटीपणाने हसत) मी म्हटलं होतं नं...परिवर्तन तर होणारच!

Web Title: dhing tang