लोकशाही चिरायु होवो! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

बेटा : (नेहमीची उत्साही एण्ट्री घेत) ढॅणटढॅण!! मम्मा, आय ऍम बॅक! 
मम्मामॅडम : (नर्व्हसपणे) हं! 
बेटा : (खट्टू होऊन) हे काय? इतकं थंड स्वागत? मी इतक्‍या दिवसांनी परत आलोय! आर यू नॉट हॅपी? 
मम्मामॅडम : (स्वत:ला सावरून) येस, आय ऍम बेटा!..जा, टेबलावर तुझा आवडता पास्ता करून ठेवलाय, तो खा!! दमला असशील ना? 

बेटा : (नेहमीची उत्साही एण्ट्री घेत) ढॅणटढॅण!! मम्मा, आय ऍम बॅक! 
मम्मामॅडम : (नर्व्हसपणे) हं! 
बेटा : (खट्टू होऊन) हे काय? इतकं थंड स्वागत? मी इतक्‍या दिवसांनी परत आलोय! आर यू नॉट हॅपी? 
मम्मामॅडम : (स्वत:ला सावरून) येस, आय ऍम बेटा!..जा, टेबलावर तुझा आवडता पास्ता करून ठेवलाय, तो खा!! दमला असशील ना? 
बेटा : (आळस देत) पास्ता नको! चनागुड होगा, तो देना!! अखिलेशबरोबर राहून राहून मला चनागुडची हॅबिट लागली आहे!! सकाळी चनागुड खाल्ला की दिवसभर दम कायम राहातो, माहिताय? तिथं, यूपीत रोज इतकी सायकल चालवली की विचारू नकोस! स्टॅमिना जाम वाढलाय माझा!! मम्मा, पण सायकलिंग केल्यावर खूप भूक लागते ना? 
मम्मामॅडम : (दटावत) आपल्याला झेपेल तेच खावं, आणि झेपेल तेच करावं! पाय दुखतील अशानं!! त्या अखिलेशच्या नादाला लागलास, आणि निष्कारण दमणूक झाली जिवाची!! 
बेटा : (निरागस सुरात) मी नाही काही लागलो त्याच्या नादी!! तो लागला माझ्या!! हाहा!! तोच मला म्हणाला की आपली दोस्ती सॉल्लिड है और रहेगी!! ("शोले'मधलं फेमस गाणं म्हणत)...ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे!! 
मम्मामॅडम : (सुस्कारा टाकत) साथ नहीं छोडी, पर दम तोडना पडा...असंच ना? 
बेटा : (दुर्लक्ष करत) आपली फ्रेंडशिप अमर आहे, असं मी त्याला वचन दिलं! 
मम्मामॅडम : (खोल आवाजात) मग काय म्हणाला तो? 
बेटा : (निरागसपणा कंटिन्यू...) तो म्हणाला, "अमर' हा शब्द माझ्यासमोर उच्चारूसुद्धा नकोस!! मला काही कळलंच नाही!! पण ते जाऊ दे. (उजळलेल्या चेहऱ्यानं) यूपीतून परत आल्या आल्या मी आपल्या पार्टीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. मला बघून एवढे दचकले आपले लोक!! हाहा!! 
मम्मामॅडम : (हताशपणे खुर्चीत बसत) दरवेळी निवडणुका झाल्या की आपले लोक असे वेळी अवेळी दचकतात बरं! त्यांच्याकडे लक्ष नको देऊस!! तुझं काम तू प्रामाणिकपणाने करत राहा!! एक दिवस तुला चांगलं फळ मिळेल!! 
बेटा : (चक्रावलेल्या सुरात) मम्मा, मला काही कळतच नाहीए! मी आणि अखिलेशनं सायकलवरून आख्खा उत्तर प्रदेश पालथा घातला! गावोगाव खाटा टाकून सभा घेतल्या! आमच्या सभांना इतकी गर्दी व्हायची की मला वाटलं होतं की आम्ही आरामात बाजी मारू!! लोकांना आमची दोस्ती आवडलीये!! पण सभांना लोकं टाइमपास करण्यासाठी येतात, हे माझं मत आता फायनल झालं आहे!! लेकाचे येतात, खाटेवर बसून पकोडे खातात, पाणी पितात आणि खाट घेऊन घरी जातात! मतं काही देत नाहीत!! ह्याला लोकशाही कसं म्हणणार? 
मम्मामॅडम : (कडवट घोट गिळल्याप्रमाणे) फळाची आशा न धरता आपलं कर्म आपण करत राहावं! एक दिवस लोक आपल्याला सत्ता देतातच! त्याला लोकशाही म्हणतात!! 
बेटा : (जोराजोराने मान हलवत) नोप!! लोकशाही म्हंजे काय, हे मला आता चांगलंच कळलं आहे!! 
मम्मामॅडम : (कौतुकानं) अच्छा? काय बरं लोकशाही म्हंजे? कळू दे की आम्हालासुद्धा!! 
बेटा : (नीट समजावून सांगण्याच्या आविर्भावात) त्याचं असं आहे की...यूपीतल्या निवडणुकीचे निकाल लागल्यावर मी एकदम खिलाडूवृत्तीनं नमोअंकलना ट्विटरवरून कॉंग्रॅच्युलेट केलं!! 
मम्मामॅडम : (नाक मुरडत) काही अडलं होतं? 
बेटा : (दुर्लक्ष करत) मी म्हटलं, ""अंकल, यूपीतल्या विजयाबद्दल अभिनंदन!!'' त्यांनी उलटा मेसेज पाठवला- थॅंक्‍यू...लोकशाही चिरायु होवो!! हाहा!! 
मम्मामॅडम : (दात ओठ खात) थॅंक्‍यू म्हणाले काय!! बघतेच!! कळतात ही तिरकस बोलणी म्हणावं!! 
बेटा : (निरागसतेचा कडेलोट) "लोकशाही चिरायु होवो' असंही म्हणाले ना ते!! ह्याचा अर्थ लोकशाही म्हंजे....मीच!! हो ना? 
 

Web Title: dhing tang