तिळगुळ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 15 जानेवारी 2018

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. 
वेळ : गोड गोड बोलण्याची. 
प्रसंग : अंगावर कांटा आणणारा. 
पात्रे : सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई आणि राजाधिराज उधोजी महाराज. 

................ 
महालाच्या अंत:पुरात गवाक्षाकडे उभे राहून कमळाबाई कुणाची तरी वाट पाहत आहेत. कुणाची तरी म्हंजे महाराजांचीच!! तेवढ्यात साक्षात उधोजीमहाराज प्रविष्ट होतात. अब आगे... 
उधोजीराजे : (आल्या आल्या सतरंजीला अडखळत धडपडत) वाटलंच होतं आम्हाला!! अगदी शिरस्त्याप्रमाणे आमचा अंगठा तुमच्या जाजमात अडकला आणि आम्ही धडपडलो!! 

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. 
वेळ : गोड गोड बोलण्याची. 
प्रसंग : अंगावर कांटा आणणारा. 
पात्रे : सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई आणि राजाधिराज उधोजी महाराज. 

................ 
महालाच्या अंत:पुरात गवाक्षाकडे उभे राहून कमळाबाई कुणाची तरी वाट पाहत आहेत. कुणाची तरी म्हंजे महाराजांचीच!! तेवढ्यात साक्षात उधोजीमहाराज प्रविष्ट होतात. अब आगे... 
उधोजीराजे : (आल्या आल्या सतरंजीला अडखळत धडपडत) वाटलंच होतं आम्हाला!! अगदी शिरस्त्याप्रमाणे आमचा अंगठा तुमच्या जाजमात अडकला आणि आम्ही धडपडलो!! 
कमळाबाई : (खोटं प्रेमानं हसून) इश्‍श!! काय बाई असं बोलणं ते!! जाजम काय म्हंटा? काश्‍मिरी गालिचा आहे तो!! 
उधोजीराजे : (अजूनही घुश्‍शातच) आमची काये आठवण काढिली...कळेल? 
कमळाबाई : (घाईघाईने वाटी पुढे करत) इश्‍श!! काय बाई असं बोलणं ते!! आज आपला तोंड गोड करण्याचा दिवस आहे नं? 
उधोजीराजे : (घाबरून) आँ? 
कमळाबाई : (मुरका मारत) काय बाई असं "आँ' करणं ते! आज स्पेशल दिवस आहे एवढंच म्हणायचं होतं आम्हाला!! 
उधोजीराजे : (गोंधळून) काय स्पेशल आहे आज? 
कमळाबाई : (शास्त्रोक्‍त पद्धतीनं) काय बाई असं विचारणं ते! 
उधोजीराजे : (खवळून) बाई, तुमचं हे "काय बाई' बंद करा बाई!! वीट आलाय त्याचा!! 
कमळाबाई : (समजुतीनं घेत) बरं बाई, ऱ्हायलं!! निदान आज तरी स्वारीनं गोड बोलावं!! एरवी कडू बोल ऐकतच आम्ही दौलतीचा कारभार हांकतो आहोत नं!! 
उधोजीराजे : (सात्त्विक संतापानं) निवडणुका जिंकणं आणि रयतेला थापा मारून भुलवणं म्हंजे कारभार हांकणं नव्हे, कमळे!! 
कमळाबाई : (डोळ्यात पोलिटिकल पाणी आणत) काय बाई भयंकर आळ हा!! तुम्हाला आपल्या पंचवीस वरसांच्या संसाराची आण आहे!! आजचा दिवस मी कडू बोल ऐकायची नाही मुळ्ळीच!! आजच्या दिवसाचा मान तरी ठेवावा स्वारीनं!! 
उधोजीराजे : (हताश संतापाने)...कुठल्या मुहूर्तावर आपण आमच्या आयुष्यात आलात, आणि ही संक्रांत ओढवली, देव जाणे!! जगदंब, जगदंब!! 
कमळाबाई : (पदरात तोंड खुपसत)...काय बाई असं भयंकर बोलणं ते!! आम्ही थापा मारल्या? आम्ही खोटं बोललो? (मुसमुसत) ह्या जगात न्यायच मुळी उरला नाही!! 
उधोजीराजे : (करारी आवाजात) नाहीच उरला मुळी!! न्यायदेवता आंधळी तर असतेच! पण ती आता मुकी आणि बहिरीदेखील झाली आहे!! इतकंच नव्हे, आम्ही तर म्हणू, की ती पांगळीदेखील झाली असून, तिला तिला सणकून सर्दीतापही आला आहे!! 
कमळाबाई : (वादविषयाला बगल देत) काय बाई हे असं टोचून बोलणं!! जाऊ देत त्या फालतू गोष्टी!! आज किनई सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणारेय! आजपासून किनई प्रत्येक दिवस तीळ तीळ वाढणाराय!! तशीच किनई तुमचं यश, कीर्ती आणि धनलक्ष्मी वाढत जावो, ह्याच आमच्या तीळभर सदिच्छा...(वाटी पुढे करत) घ्या तिळगूळ घ्या, खोटं खोटं बोला!!... 
उधोजीराजे : (रागारागाने) नको आम्हाला तुमचा तिळगूळ!! 
कमळाबाई : (फुरंगटून) आमचा तिळगूळ नको? मग बारामतीचा हवाय का? की नांदेडचा? 
उधोजीराजे : (गोरेमोरे होत) आम्हाला कुणाचाच तिळगूळ नको! आमची रयत अशी रडतमुखानं बसलेली असताना आम्ही तिळगुळाचे लाडू खात हिंडतोय, ही कल्पनाच सहन होत नाही आम्हाला!! 
कमळाबाई : (सूचकपणे) तुम्हाला हवी असलेली गोष्ट फक्‍त आमच्यापाशीच आहे!! गेली साडेतीन वर्षं त्याच गोष्टीवर तर आम्ही खूश ठेवलंय तुम्हाला!! 
उधोजीराजे : (संभ्रमात) अच्छा? आम्हाला हवी असलेली गोष्ट? कुठली हो? 
कमळाबाई : (मखलाशीनं) घ्या... आमचा हा सुंदर रंगीबेरंगी, गोड, काटेदार हलवा घ्या!! आवडतो ना तुम्हाला? हॅप्पी मकर संक्रांती बरं का!! 

Web Title: Dhing Tang