काहे गया परदेस? (ढिंग टांग)

काहे गया परदेस? (ढिंग टांग)

सदू - (नेहमीप्रमाणे फोनमध्ये) म्यांव म्यांव!

दादू - (वैतागून) छुत छुत!! डायरेक्‍ट वाघाला फोन करणारा कोण रे तू बोक्‍या? असा समोर ये, खांडोळी करीन, खांडोळी!!

सदू - (झटक्‍यात गंभीर होत) दादूराया, रागावतोस काय असा? गंमत केली!

दादू - (निर्धाराने) मी तुझा आवाज ओळखलाय सद्या! तुझा हा गंमत करण्याचा स्वभाव मला अजिबात पसंत नाही!! कधीतरी सीरिअस हो!! सीरिअसनेस नसल्यामुळे तुझ्या करिअरचं किती नुकसान झालंय, बघतोयस ना?

सदू - (शिताफीने विषय बदलत) कधी आलास सुट्‌टीवरून!

दादू - (गुळमुळीत) छे, कुठली सुट्‌टी? मऱ्हाटी दौलतीची चिंता वाहणाऱ्यास सुट्‌टी घेता येत नाही, सदूराया!

सदू - (आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खर्जात) कंबोडियात जाऊन फोटो काढून आलास! पुरावा आहे माझ्याकडे!!

दादू - (चमकून) कॅहित्तरीच! पुरावा कसला?

सदू - (गुप्तहेराच्या आवाजात) गेल्या आठवड्यात मंगळवारी सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनी मौका-ए-वारदात पर याने की कंबोडियातील सुप्रसिद्ध ....मंदिराच्या आवारात आपण फोटो काढत होता. गुन्हा कबूल?

दादू - (उडवून लावत) नाकबूल! सपशेल नाकबूल!! मुळात कंबोडिया एका देशाचं नाव आहे की गुजरातेतील इसबगुलाच्या व्यापाऱ्याचं आडनाव, हेच मुळात मला माहीत नाही! हाहा!!

सदू - (हबकून) हायवेच्या अर्धा किलोमीटर अंतरातले बार बंद झाले! अयोध्येचा निकाल लागला!! तूरडाळीच्या उतन्नापायी शेतकरी बुडाला!! झालंच तर चंद्रपूर, परभणी, लातूरला तुमच्या पक्षाची वासलात लागली! इथं इतकं काय काय घडत होतं, तेव्हा आपण कुठे होता दादूदादा? तुमच्याकडून साधी प्रतिक्रिया नाही!! एरवी कश्‍शाकश्‍शावर बोलत असता सारखे!!

दादू - (ठामपणाने) व्हेरी मच इथंच होतो!..आणि इथं काहीही घडत नव्हतं...(पडलेल्या आवाजात) घडायचं ते घडून गेलं महापालिका निवडणुकीत! त्यानंतर काय घडायचं बाकी ऱ्हायलंय?

सदू - (खिजवत) बाय द वे, दादूराया, तू शब्दाचा पक्‍का आहेस ना?

दादू - (अभिमानाने) हा काय प्रश्‍न झाला? अवघा महाराष्ट्र जाणतो, ह्या दादूच्या शब्दाचं मोल!

सदू - (कोंडीत पकडत) निवडणुकीनंतर मुंबईकरांची घरपट्‌टी माफ करणार होता तुम्ही! त्याचं काय झालं?

दादू - हे बघ सद्या, नसत्या कुरापती काढू नकोस! तुझ्या पक्षात तर सगळाच आनंदीआनंद आहे! (हेटाळणीच्या सुरात) पक्ष कसला? फू-!! ्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌मित्रमंडळ आहे ते तुझं निव्वळ!!

सदू - (संतापून) मित्रमंडळ? मोठा झालास, म्हणून काहीही ऐकून घेणार नाही हं तुझं, दादू! 

दादू - (हेटाळणी कंटिन्यू...) निवडणुकीआधी उगीच नाही टाळी द्यायला आला होता तुम्ही!! पायाखालची वाळू सरकली की मोठा भाऊ आठवतो तुम्हाला! अप्पलपोटे लेकाचे!! बाकी तुझ्या मित्रमंडळाच्या बैठकीत तुझे वाभाडे निघाले म्हणे? साहेब भेटत नाहीत, कार्यक्रम देत नाहीत म्हणे!! खरं की काय?

सदू - (सर्द होत) आमचे वाभाडे काढणारा अजून जन्माला यायचाय!...बरं? आणि तुमचे कार्यक्रम काय? तर कंबोडियात जाऊन फोटो काढायचे!! हॅ-!!

दादू - (संतापातिरेकानं) शेवटचं सांगतो- मी कंबोडियात गेलो नव्हतो!! 

सदू - (चौकशी करत) मग कुठे गेला होतास?

दादू - (गडबडून) तुला काय करायचंय? मी कंबोडियात जाईन, नाहीतर झांबियात जाईन!! तो माझा प्रश्‍न आहे!! मराठी माणसानं कुठे जावं, काय खावं, काय प्यावं हे तुम्ही ठरवू शकत नाही!!   

सदू - आख्ख्या महाराष्ट्राला हे माहीत व्हायला हवं की गेले आठ-दहा दिवस तुम्ही कुठे होता ते!!

दादू - (निकरानं) नाही सांगणार ज्जा!!

सदू - (गळ घालत) सांग ना दादूराया!

दादू - (विर्घळत) मी ना...सावरकरांचं ‘माझी जन्मठेप’ वाचत होतो!! कळलं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com