टंग ऑफ स्लिप! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 29 मार्च 2018

"बाहुबलीने कटप्पाको कायको मारा?'' मोटाभाई अमितभाईंनी आम्हाला सवाल केला तेव्हा आम्ही निरुत्तर होणे साहजिक होते. हा सवाल ऐकून आम्ही आधी बुचकळ्यात, चकळ्यात, कळ्यात आणि सरतेशेवटी नुसतेच ळ्यात पडलो. मोटाभाई आमच्याकडे नुसते थिजलेल्या डोळ्यांनी पाहात राहिले. 

मोटाभाईसारखा धोरणी गृहस्थ आमच्या तरी पाहण्यात नाही. माणसाने कसे असावे? तर मोटाभाईंसारखे असावे. आमच्या आळीतील कोणीही आजवर मोटाभाईंना दांत घासताना, पारोश्‍या अवस्थेत पाहिलेले नाही. मनुष्य सदैव सुस्नात, सुगंधमंडित! सतत जनसेवेत निमग्न असलेले मोटाभाई प्रथमदर्शनी पेढीवरचे शेठ वाटतात. पण आहेत मात्र कमालीचे सच्छील ! पाहता पाहता जनलोक भजनी लावणार नंबर एक... म्हणूनच आज अकरा कोटी अनुयायी असलेले, तरीही कमालीचे प्रसिद्धिविन्मुख असे मोटाभाई आम्हा सर्वांसाठी प्रार्थनीय आहेत. असे म्हणतात, की प्रधानसेवक श्रीश्री नमोजी हे फक्‍त त्यांचेच ऐकतात. किंबहुना, नमोजींसमोर थेट बोलू शकणारे एकमेव गृहस्थ म्हंजे आमचे मोटाभाई !! 

नेमके तेच बोलणारे, नेमके तेच करणारे, नेमके तेच ऐकणारे मोटाभाई हे आमच्या आळीचे आदर्श आहेत, हे वेगळे काय सांगायचे? किंबहुना, मोटाभाई हे आमच्या आळीचे भूषण आहे ! 

उठवळ वागो नये। वायफळ बोलो नये। 
चळवळ करो नये। अकारण।। 

...ह्या सुप्रसिद्ध कमळदास-बोधातील (खुलासा : कमळदास-बोध हा श्‍लोकबद्ध ग्रंथ लौकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. प्रकाशनाच्या तारखेकडे लक्ष ठेवावे !) श्‍लोकानुसार त्यांचे हमेशा वर्तन असते. अधिकउणा शब्द चुक्‍कून तोंडातून जायचा नाही. मोटाभाईंना एकदा तरी व्हाट्‌सॅपी ज्योक सांगून हसवावे, ह्या आचरट महत्त्वाकांक्षेपोटी अनेकांनी हरप्रकारे प्रयत्न केले, पण फेल गेले !! आमच्या आळीत एक हसरा मुलगा आहे. (गालाला खळी पडत्ये हं !) शेजारपाजारी त्याचे राजपुत्रासारखे लाडकोड करतात. पिझ्झा म्हणू नका, चाकलेट म्हणू नका ! मध्यंतरी त्याने हट्ट धरला- पावभाजी हवी ! लग्गेच हजर झाली !! आल्यागेल्या घरी किमानपक्षी नारळाची वडी तरी त्याच्या हातावर ठेवलीच जाते. स्वभावाने लाघवी आहे मुलगा !! त्यानेही मोटाभाईंना हसवून पाहिले. पण छे ! असले विनोद करू नयेत, आपली जीभ आवरावी, असा शहाजोग सल्ला मात्र मोटाभाईंनी त्याला दिला. 

"आधी विश्‍वेश्‍वरय्या असं नीट म्हणून दाखव !'' असे सांगून मोटाभाईंनी त्याला परत पाठवले. त्या मुलानेही गुणीबाळासारखे हे नाव घोकले आणि पुन्हा मोटाभाईंना गाठले. 
"विश्‍वरय्या...विश्‍वर्यया...विश्‍व...'' त्याला काही केल्या जमेना ! मग मात्र मोटाभाई (किंचितसे) हसले. 

"जुओ, ना बोलवा मां नव गुण ! '' मोटाभाईंनी त्याला महामंत्र दिला. ह्याचा अर्थ एवढाच की न बोलण्यात शहाणपण असते. माणसाने गप्प राहून कार्यभाग साधावा !! 
अर्थात, सर्वांना हा पोक्‍तपणा साधतोच असे नव्हे ! 

कारण जीभ हा माणसाचा एक डेंजर अवयव आहे. आम्ही तर ह्या जिभेपायी उभी करिअर आडवी केली. चांगला पदार्थ पाहून चळणारी आमची ही रसना गप्पाष्टके रंगवण्याच्या नादात प्राय: घसरते. ""मोटाभाई, तुम्ही खरे कर्तृत्ववान...,'' आम्ही त्यांना जिन्यात गाठून भक्‍तिभाव प्रकट केला. 

"कर्तृत्व एकाच माणसाचं... त्या नमोजींचं... आम्ही कोण?'' आमच्या हातावर सिद्धेश्‍वराचा प्रसाद ठेवत मोटाभाई म्हणाले. 

"कसं काय तुम्हाला शक्‍य होतं बुवा.. !'' आम्ही प्रसादाचा तळहात मस्तकावरून फिरवत म्हणालो. 
"तुम्हालाही शक्‍य होईल... एक सवालाचं उत्तर द्या...,'' ते म्हणाले. 
"विचारा की !'' आम्ही. 

"बाहुबलीने कटप्पाको कायको मारा?'' मोटाभाई अमितभाईंनी आम्हाला सवाल केला तेव्हा आम्ही निरुत्तर होणे साहजिक होते. हा सवाल ऐकून आम्ही आधी बुचकळ्यात, चकळ्यात, कळ्यात आणि सरतेशेवटी नुसतेच ळ्यात पडलो. मोटाभाई आमच्याकडे नुसते थिजलेल्या डोळ्यांनी पाहात राहिले. 

"छे, बाहुबलीनं कुठे?...उलट कटप्पानेच...,'' प्रयत्न केला. वास्तविक आम्ही बाहुबली भाग एक व दोन अनुक्रमे चोवीस आणि पंचवीस वेळा पाहिला आहे. 
"इथंच तर चुकता तुम्ही...'' असे म्हणून मोटाभाई निघून गेले. 
...मोटाभाईंची जीभ घसरली की आमची बुद्धी हा आता नवाच सवाल उभा राहिला आहे. असो. 

Web Title: Dhing Tang on Amit Shah