जाहीरनामे! (ढिंग टांग)

- ब्रिटिश नंदी
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुलांनो, इकडे लक्ष द्या. अज्जिबात गडबड करायची नाही. हाताची घडी तोंडावर बोट. जो कोणी मध्येच हसेल आणि वाईटसाईट आवाज काढील, त्याला पोकळ बांबूचे फटके मिळतील. तेव्हा ऐका! मुलांनो, मुन्शिपाल्टीच्या निवडणुकांमुळे माहौल टाइट होत चालला असून, विविध पक्षांनी आपापले जबर्दस्त वचननामे कम वचकनामे कम जाहीरनामे कम आश्‍वासननामे जाहीर केले आहेत, हो की नाई? त्या सर्वांना लोकसेवेची भयंकर म्हंजे भयंकर खोड आहे. मुन्शिपाल्टीची निवडणूक ही तर लोकसेवेची जबर्दस्त संधी. तेव्हा त्यांना ही संधी आपण द्यायला हवी. म्हणून त्या निवडक पक्षांचा अजेंडा आपण आज (आपल्या शाळकरी भाषेत) थोडक्‍यात समजून घेणार आहोत. म्हंजे काय करायचं?

मुलांनो, इकडे लक्ष द्या. अज्जिबात गडबड करायची नाही. हाताची घडी तोंडावर बोट. जो कोणी मध्येच हसेल आणि वाईटसाईट आवाज काढील, त्याला पोकळ बांबूचे फटके मिळतील. तेव्हा ऐका! मुलांनो, मुन्शिपाल्टीच्या निवडणुकांमुळे माहौल टाइट होत चालला असून, विविध पक्षांनी आपापले जबर्दस्त वचननामे कम वचकनामे कम जाहीरनामे कम आश्‍वासननामे जाहीर केले आहेत, हो की नाई? त्या सर्वांना लोकसेवेची भयंकर म्हंजे भयंकर खोड आहे. मुन्शिपाल्टीची निवडणूक ही तर लोकसेवेची जबर्दस्त संधी. तेव्हा त्यांना ही संधी आपण द्यायला हवी. म्हणून त्या निवडक पक्षांचा अजेंडा आपण आज (आपल्या शाळकरी भाषेत) थोडक्‍यात समजून घेणार आहोत. म्हंजे काय करायचं? तर ह्या पोलिटिकल पार्ट्यांना नेमकं काय म्हणायचंय? हे आपण सोप्प्या भाषेत समजून घ्यायचं! चला, वह्या उघडा बरं...घ्या लिहून!

शतप्रतिशत कमळ पार्टी : अरे, काय माणसं आहात की कोण? गेल्या तीन वर्षांत आमची पार्टी प्रचंड वाढली आहे, हे कुणी आता तरी मान्य करणार आहे की नाही? तीन वर्षांपूर्वी आम्हाला कुणी हिंग लावून विचारत नव्हते हे कबूल...पण अहो, आता आम्ही मोठे भाऊ आहोऽऽत!! प्लीज, विश्‍वास ठेवा नाऽऽ...!!! गेल्या इलेक्‍शनपर्यंत आम्ही कान पाडून फिरलो की नाही? आता आम्ही दंडाच्या बेटकुळ्या दाखवल्या तर कुठं बिघडलं? कालपरवापर्यंत पाप्याचं पितर म्हणून सोसायटीत प्रसिद्ध असलेल्या बंड्यानं अचानक जिम जॉइन करून सहा महिन्यांत सलमान खानी बॉडी कमावली तरी तुम्ही त्याच्याकडे वळून बघत नाही, ह्याला काय अर्थय? तेव्हा बऱ्या बोलानं बंड्याला...आय मीन कमळ पार्टीला भरघोस मतांनी विजयी करा. हो, हो, प्रचाराला मोदीजीच येतील!! डोण्ट वरी!! नाही, नाही...आता नोटाबंदी वगैरे काहीही होणार नाही. ओके? घाबररू नका. मतं दिली नाहीत, तर मग मात्र बघून घेऊ. मतं देता की करू शंभराच्या नोटा क्‍यान्सल! करू? करू? करू?
आवाऽऽज कुणाचा पार्टी : माझ्या प्रिय मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो...आणि हो, तुम्हाला विसरतच होतो...माझ्या प्रिय उल्हासनगरवासीयांनो, खरं तर माझं मन भयानक गदगदून आलं आहे. किती तुमचं हे प्रेम! छ्याः काहीच्या काहीच बुवा! अर्थात आम्हीही तुमच्यासाठी इतकं काही करून दाखवलं की तुम्ही गारच पडलात. आज मुंबई-ठाण्यातला प्रत्येक सजीव ‘स्वर्ग जर का कुठे असेल तर तो इथंच, इथंच, इथंच!’ असं अभिमानाने म्हणतो, ते काय उगीच? गुळगुळीत रस्ते, चोवीस तास पाणी, आरशासारखी लख्ख स्वच्छता...आणि भ्रष्टाचार औषधालादेखील नाही!! आमच्या पक्षानं तुमच्या जीवनात जसं सुख आणलं, तशी तुम्हीही आम्हाला कायम भरभरून मतं दिलीत. आपल्या ह्या घट्ट नात्याबद्दल फूल ना फुलाची पाकळी म्हणून यंदा आम्ही जंगी आश्‍वासनांचा सेल लावलाय. जा, नका भरू मालमत्ता कर. आहे की नाही चंमतग? इतकंच नाही तर तुमच्या शहरात आम्ही एक प्रचंड मोठ्ठं सेंट्रल पार्क बांधणार आहो. जा, संध्याकाळी तिथे फिरायला जा! भेळपुरीच्या गाड्यासुद्धा उभ्या करणार आहो. खा, हवी तितकी भेळ! आणि हो, जरा कान इकडे करा...ठाणेकर गेली किती तरी वर्ष आमच्यामागे उगीचच आणि निमूट उभे आहेत. त्यांच्यासाठी खास धरण बांधणार आहो, धरण!! मज्जा आहे बुवा ठाणेकरांची!! आता रोज आंघोळ करा, म्हणावं!! दातसुद्धा घासायचं हं! आणि हो...उगीच त्या भूलथापा देणाऱ्या कमळवाल्यांच्या मागे जाऊ नका. एक नंबर्चे थापाडे आहेत ते...हो, हो...त्यांची नालस्ती हासुद्धा आमच्या पक्षाचा अजेंडाच आहे. नोटाबंदी करून त्यांच्या 
***!!**!!**ऽ....

कांग्रेस : हेल्लो...ओळखलंत का मला पावसात आला कोणी...कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी...हेल्लो...अरे, कोई है? अरे, कुणी घर देता का घर? एका तुफानाला...अरे इतना सन्नाटा क्‍यूं है भाऽऽई...अरे अरे अरे...जाऊ नका असे तरातरा निघून...थोडं तरी ऐका हो...हा घ्या आमचा जाहीरनामा...अहो अहो, शुक शुक!!
राष्ट्रवादी : चला, काढा पत्ते!

Web Title: dhing tang artical