एका बैलाची कैफियत! (ढिंग टांग)

एका बैलाची कैफियत! (ढिंग टांग)

एकदा संतप्त झालो, की मग आम्ही कोणाचे ऐकत नाही. आम्हाला आवर घालायला दहा-बारा माणसे आली, तरी आम्ही त्यांना उचलून सहज फेकून देऊ. त्यादृष्टीने (किंवा कुठल्याही दृष्टीने) पाहू गेल्यास आम्ही शुद्ध बैल आहो!! पार्श्‍वभागी हिरवा लेप लावून आम्ही निष्कारण ‘आम्हाला बैल म्हणा’ असे सांगत नाही. खरेखुरे बैल आहो. मागल्या खेपेला बिरबल नावाच्या एका निर्बुद्ध माणसाने आमच्या अंगावर खडा मारून आम्ही बैल आहोत की नाही, ह्याची चाचणी घेतली होती. आम्ही कातडे थर्थरवून बैल असल्याचे सिद्ध केले. बिरबल गरीब गाईसारखा चेहरा करून निघून गेला. दुसऱ्या खेपेला एक गडी संशयाने खाली वाकून वाकून आमचे बैलपण न्याहाळत होता. पुन्हा तो दिसला नाही!! माणसांच्या जगात जसे सूरसम्राट असतात, तसे आम्ही खूरसम्राट आहो, ह्याची खूण त्यास पटली असेल. असो. 

सांगावयाचा मुद्दा हा, की सांप्रत दिवस संतप्त आंदोलनाचे असून, जल्लिकट्टूच्या निमित्ताने आम्हीही आमची शिंगे रोखून पवित्र्यात उभे आहो. नाकातून वाफारे निघताहेत. अंगारासारखे डोळे ऊर्ध्व लागल्याप्रमाणे कपाळात घुसले आहेत. चारही खूर थडाथडा भूमीवर हापटत आहेत. 
एकंदरित आम्ही फार्फार म्हंजे फार्फारच आक्रमक झालो आहो. कां की आमच्या अस्मितेला कोणीतरी पऱ्हाणी टोचली आहे. आमच्या जन्मसिद्ध अधिकारावर गदा आणली आहे.

होय, झुंज खेळणे हा तो आमचा पहिला जन्मसिद्ध अधिकार आहे. खाल्ल्या चाऱ्याला जागणे, हा दुसरा अधिकार. मधल्या काळात वेळ मिळाल्यास आम्ही मालकाच्या विनंतीनुसार गुऱ्हाळा-गुऱ्हाळात बर्फाचे वाटपही करीत असतो, तो आमचा तिसरा जन्मसिद्ध अधिकार. चौथा अधिकार भलताच प्रायवेट असल्याने तो आम्ही कधीच सांगणार नाही. नॉन्सेन्स. असो.
आसामात बुलबुलाच्या झुंजी खेळल्या जातात. (छ्या, काय तरी एकेक छंद!!) बुलबुल हा पक्षी वास्तविक झुंजीचा नाही. त्याने फार तर गुलशनमध्ये बहार वगैरे आल्यावर गाणीबिणी म्हणावीत. झुंजीचा संबंध काय? दोन बुलबुलांची झुंज म्हंजे ‘कट्यार काळजात घुसली’ मधल्या खानसाहेब आणि आचार्यांची जुगलबंदीऐवजी कुस्ती लावून देण्यापैकी आहे. पोळ्याच्या पवित्र दिवशी आमच्या कपाळावर गंधाचा लालेलाल ठिपका ठेवला जातो. तो मिरवणे केवळ आनंदाचे असते. परंतु बुलबुलाची जातच बेकार! त्यांचा ठिपका वेगळ्याच ठिकाणी!! ह्याला काय अर्थ आहे? कॅहित्तरीच.

आंध्र प्रदेशात कोंबड्या झुंजवण्याची चाल आहे. आम्हाला कोडेच आहे. कोंबडे झुंजवणे हा सार्वत्रिक छंद आहे. आंध्रातल्या कोंबड्यांनी काय घोडे मारले आहे? कोंबडे झुंजवणे, हा खेळ हापिसा-हापिसात, राजकारणात, समाजकारणात सर्वत्रच खेळवला जातो, हे कोणीही कबूल करील. पण आंध्रात मात्र त्यावर बंदी आहे!! अर्थात, वास्तविक झुंजण्यापेक्षा भुंजण्याशी कोंबडीचा अधिक संबंध, हे कोणासही मान्य व्हावे. अंतिमत: जी गोष्ट माणसाच्या पोटात जाणार आहे, तीस अशा अनावश्‍यक कृतीत वाया घालवणे, हे खुळेपणाचे लक्षण आहे, असे आमचे मत आहे.

घोड्यांच्या शर्यती चालतात, पण बैलगाड्याच्या शर्यती का चालत नाहीत? असा एक युक्‍तिवाद प्राय: केला जातो. येथे आमची अक्‍कल (बैल असूनही) घोड्यापुढे धावत्ये, हे आम्ही नम्रपणे नमूद करू. घोडे शेती करत नाहीत. नांगरास घोडे जोडणारा शेतकरी आम्ही अजून तरी पाहिला नाही. बैलाचे तसे नसते. शिवाय घोडा ह्या प्राण्यास शिंगं नसतात. फाइट करणार कशी? महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. ह्याच्या इतके अन्याय्य दुसरे काही नसेल. पण आळस साधणार असेल तर आमचे काही म्हणणे नाही. बंदी तर बंदी!! पण झुंज खेळणे हा आमचाच अधिकार आहे... माणसांचा नव्हे!! मनुष्यप्राणी ह्याची दखल घेतील काय? 
डुर्रर्र...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com