लोच्या झाला रे! (ढिंग टांग)

लोच्या झाला रे! (ढिंग टांग)

माणणीय मुंबई-ऱ्हिदयसंब्राट (ठाणे समाविश्‍ट) श्रीमान उधोजीसाहेब यांशी बाळक बबण बणचुके ऊर्फ बबन्याभाई ऊर्फ अप्पा ह्याचा शिर्साश्‍टांग नमस्कार. लाख लाख दंडवत. माणाचा मुजरा. पत्र लिहन्यास कारन का, की मी एक साधासुधा शिंपल कार्येकर्ता हाहे. पन आपल्या आशीवार्दाणे आत्ताच झालेल्या मुन्शिपाल्टीच्या विलेक्‍शनमध्ये आपला घोडा विनमध्ये आला.

थॅंक्‍यू!! (हाती घेऊन धनुश्‍यबान, बघा बबनअप्पाची शान...हे होर्डिंग आपन पाहिले असेलच!) आपन होता म्हनून बॉम्बेत मऱ्हाटी मानसाची इज्जत राहिली.  (तशे होर्डिंग आपन नाक्‍यावर ऑलरेडी लावले आहे. काळजी नसावी!) आपल्या आर्शिवादाणे ह्या टायमाला आपन कार्पोरेटर झालो. घरी बायकोणे वोवाळले. म्हनाली, ‘या कार्पोरेटरसाएब, आता काय खानार?’ जे काय खानार, ते तिला सांगिटले हाहे. काळजी नसावी. असो.

‘मातोशिरी’वरुण फोण आला, की मेयरचा अर्ज भर,’ असे मला कोपऱ्यावरच्या जितूशेठने सांगूण ठेवले होते. मी त्याला बोल्लो का ‘बाबा रे, आपल्याला काही मेयरबियर व्हायाचे णाही. येवडा मोटा गरम कोट घालूण दिवसभर कोन त्या खुर्चीत बसंल? मी शिंपल कार्येकर्ताच हाहे व ऱ्हाहीन!’ मेयरचे विलेक्‍शन होन्यापूर्वी आपापल्या पार्टीच्या कार्पोरेटर लोकान्ला फायू ष्टार हाटेलात बंद करुण ठेविन्याची चाल असल्याचे जितूशेठने सांगिटले.

कार्पोरेटर लोक हे ‘रेटर’ पन असल्याकारनाने भाव फुटला, की पार्टी चेंज करतात, म्हनून सर्व पार्ट्या त्यान्ला बंद करुण ठेवत असल्याचे जनरल नालेज त्याणे मला धिले. फायू ष्टार हाटेलात खायालापियाला मजबूत भेटते व पत्ते खेळावयास भेटतात, असे कळले. फायूष्टारमध्ये राहन्यायोग्य कापडे पायजेत, म्हनून मी स्वोता मॉलमधे जाऊण चार लुई फिलिप्प शर्ट, दोन फायनबाज टीशर्ट, एक जीनप्यांट, दोन रेमंड प्यांट अशी (क्‍याशलेस) खरेदी केली. ब्याग भरुण तयार होतो. पन...काल रोजी लोहोच्या झाला! 
काल रोजी अदमाशे साडेचारच्या टायमाला सीएम फडनीससाहेब ह्यांणी ‘आपली कमळ पार्टी बॉम्बेच्या मेयरच्या रेसमधी घोडा टाकनार नाही’, असे डिक्‍लेर केल्यानंतर आपली एकदम बेकार स्यिुचेशन झाली. कार्पोरेटर होन्याचा आणंदच लुटता आला णाही. हे म्हंजे आमच्या आळीतल्या बाब्या चिमणकर आनि सौ. बेबीणंदा हिच्यासारखे झाले. बाब्या आनि बेबीने पळून जाऊण लव्ह म्यारेज करावे, असे ठरवले. राती पिशवी भरुण बापाच्या खिच्यातले पैशे मारुण पळ काढायचा, आनि गाडीत बसूण हैदराबादला पळूण जायचे, असा प्लाण होता. पन त्यांच्या लफड्याची आधीच भनक लागल्याने बेबीचा बाप खुश झाला. आयता गडी गवसला, असे म्हनून त्याने खुशी खुशी त्यांच्या म्यारेजला परमिशन दिली. परिनामी, दोघांना बी अरेंज्ड म्यारेजगत मांडवात गुमान लगीन लावावे लागले. बाब्या आता दोन पोरांचा बाप हाहे, रोज पिशवीत गाजरे-मुळा, मेथी घेऊण घरी येताणा दिसतो!! 
पळून जाऊण लगीन केले तर सैराट धम्माल येते. अरेंज म्यारेजमधे ‘तू समोर बस. मी बी बसतो. तुझं हो हाहे का? माझं बी हो हाहे. माझा बाप खड्‌डूस हाहे. तुझा?’ येवढाच डवायलाग झाला तर झाला!! बाकी याद्या करुण, मुहूर्त बघूण बार उडविने बाकी ऱ्हाहाते. आमची तिच स्यिुचेशन झाली हाहे. गेले सैराट लव्ह म्यारेज करायला, झालं अरेंज!! जाव द्या. 

वायट भाग म्हंजे कालपरेंत घराभाहेर न पडलेला कमळ पार्टीचा नाना निमकर ऊर्फ निम्या ह्याणे राजरोस भाहेर येऊण आपल्या घराच्या दारात होर्डिंग लावले.- ‘करून दाखवले!’ आपल्याला काही टोटल लागेना. अशे कशे झाले? ॲक्‍चुअली गेल्या विलेक्‍शनमधे निम्याला मी ज्यबर्दस्त हानला होता. ‘घराभाहेर पडलास तर दात घरी घेऊण वापस जानार न्हाहीस,’ असे त्याला इज्जतमध्ये सांगिटले होते. पन कालपासूण निम्याला अर्जंटमध्ये पुन्ना माज आला आहे. आता कमळवाले आपले दोस्तलोक की अपोझिशन? हे क्रुपया लौकरात लौकर डिक्‍लेर करावे. अपोझिशन असतील, तर निम्या मेलाच म्हनून समजा. कळावे. जय महाराष्ट्र. आपका अपना बबनअप्पा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com