एक पारदर्शक पत्रव्यवहार! (ढिंग टांग)

- ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 10 मार्च 2017

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब यांस शतप्रतिशत नमस्कार. 

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब यांस शतप्रतिशत नमस्कार. 
सर्वप्रथम महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला दिनाचा पवित्र मुहूर्त साधून आपण मुंबई महापालिकेत येऊन गेलात असे कळले. पालिका सभागृह ते मलबार हिल अंतर काही फार नाही. चहाला आला असतात तर बरे झाले असते. पण आता राहू दे. महापालिकेत जाऊन आपण आपल्या डोळ्यांदेखत आपल्या पक्षाचा महापौर झाल्याचे पाहिलेत. अभिनंदन. एखाद्या मर्द मावळ्याला आणखी काय हवे असते? आता तरी तुमचा जीव भांड्यात पडला असेल, असे समजून चालतो. आमचा पाठिंबा खरोखर बिनशर्त होता, हे आता तरी तुम्हाला पटले असेल. भविष्यातही तुम्हाला आम्ही अस्सेच पाठबळ देऊ. खात्री असावी. बाकी सर्व मस्त चालले आहे. भेटीअंती बोलूच. पण भेट केव्हा? कळावे. आपला. नाना.
* * *
नानासाहेब-
तुमच्यावरी जो विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला!! आमचा महापौर होणारच होता. तुम्ही पाठिंबा दिला म्हणून तो झाला असे नव्हे!! संध्याकाळी सात-पाचला बातम्या लागतात, हे प्राचीन सत्य आहे. म्हणून सकाळी कोणी ‘आज सात-पाचला बातम्या लागतील’, असे सांगितले म्हंजे आकाशवाणी... आय मीन... भविष्यवाणी उच्चारली असा होत नाही. तुम्ही ज्याला पाठिंबा म्हणत आहात, ती प्रत्यक्षात माघार आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. हे म्हंजे शरण जाणाऱ्या माणसाने ‘थोडे विरजण आणायला गेलो होतो’ असे सांगण्यापैकी आहे. तुमचे लोक हिरवे फेटे घालून सभागृहात आले, तेव्हाच आमच्या कपाळावर आठी पडली होती. सगळे रंग सोडून हि-र-वे फेटे? हद्द झाली!! आम्हाला बघून त्यांनी ‘मोदी मोदी’ असा गजर केला. ह्या महाराष्ट्राच्या भूमीत राहून शिवाजी महाराज विसरून मोदींचे नाव घेता? कुठे फेडाल पापे? मी चेवात येऊन घोषणा देणार होतो, पण शेजारी आमच्या सौभाग्यवती होत्या. असो.
आमचा महापौर झाला, ह्याचा आनंद आहेच. शेवटी मुंबई आमची आहे. तुम्ही नागपूरचे काय ते बघा!! 
भविष्यात तुमचे पाठबळ आम्हाला कसे मिळेल, हे देवदेखील सांगू शकणार नाही. तेव्हा ती वेळ येईल, तेव्हा बघू. भेट कधी हेही देवच ठरवेल. तरीही आपलाच. (हे आपले म्हणायचे म्हणून-) उधोजी.
* * *
प्रिय उधोजी, उलटटपाली उत्तर धाडल्याबद्दल आभार. ‘मोदी मोदी’च्या गजरात काल आपला महापौर खुर्चीत बसला, हे आम्हाला कळले. त्याचे असे आहे, की आमच्या पार्टीत तसा नियमच आहे. काहीही झाले की मोदीजींचे नाव घ्यायचे. सारे काही सुकर होते. नमोनामाच्या जपामुळे अनेकांचे कल्याण झाले आहे. तुम्हीही प्रत्यंतर घेऊन बघा!! आमच्या ब्यांयशी पहारेकऱ्यांनी हिरवे फेटे बांधले होते, ह्याचा तुम्हाला राग आला का? अहो, बरेच हिरवे कापड उरले होते म्हणून त्याचे फेटे दिले. त्यात फार काही अर्थ शोधू नका. (म्हंजे सांपडणार नाही...) आम्ही आपल्याला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यावर आपण सावध झालात, हे साहजिकच आहे. महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला, म्हंजे कडकीच्या ऐन कळसाध्यायास कुण्या मित्राने बुडवलेले तीन हजार रुपये अचानक परत आणून दिले, तर मनात नाना शंका येणारच. हो की नाही? पण काळजी करू नका. आमचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा होता, आहे आणि इन्शाल्ला राहील!! आपलाच. नाना.
* * *
नाना-
तुमच्या पाठिंब्याची गरज कधीही नव्हती, नाही आणि नसेल!! तुमचा पाठिंबा आहे की नाही, हेच मुळात कळत नाही, तोवर आहे, तसेच चालू राहणार. कळलं? जय महाराष्ट्र.
 उ. ठा.
* * *
उधोजीसाहेब-
आमचा पाठिंबा आहेच व राहील- फक्‍त तो पारदर्शक असेल!!! हाहाहा! आपला पारदर्शक मित्र. नाना.
ता. क. : इलेक्‍शन आटोपले!! आता सुट्टीवर कुठे फिरायला जाणार आहात? कळावे.

Web Title: dhing tang artical