मिमिक्री आर्टिस्ट! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 23 मार्च 2018

डिअरम डिअर व आदरनीय होम्मिनिष्टर व सीएमसाहेब नानासाहेब यांसी कानिष्टेबल बबन फुलपगार (कदकाठी पाच फू. साहा इच्च, वजन 47 कि., उमर 47 व 4 म., बक्‍कल नंबर 1212) याचा कडक सलाम. अर्जंटमध्ये आपणांस निवेदण लिहण्याचे कारन कां की आपला डिक्‍टो टु डिक्‍टो आवाज काढून कुन्या एका इसमाने ठान्यातल्या नगरसेवकाकडे दहा कोट रुप्ये मागितल्याची कंप्लेंट आल्याचे कळले. पेपरमधे न्यूज वाचून हैरान झालो. हे अत्यंत डेंजर असे काम असून गुन्हेगारांची डेरिंग भयंकर वाढली आहे, ह्याचा हा पुरावा आहे. डायरेक होम मिनिष्टरचाच आवाज काढून गुन्हा करने, म्हंजे जरा जास्तच झाले. सबब आपन अर्जंटमध्ये काही पावले उचलने गरजेचे आहे, हे सांगन्यासाठी हे लेटर लिहत आहे. क्रुपया राग मानू ने.

डिपारमेंटमध्ये आपली निम्मी उमर गुजरली. हाताखालून अनेक गुन्हेगार आले, आनि गेले. आपल्या एरियातले पाकीट जरी मारले तरी हे कुनाचे काम असनार, हे आपन वळखू शकतो. तेवढा एक्‍सीरेन्स आपल्याकडे आहे. पूर्वीच्या काळी गुंडा ब्रॅंचमध्ये असताना वेशांतर करून मी गुन्हेगारी जगात फेरी मारून येत असे. बूटपॉलिशवाला, बुरखाधारी भगिनी, मेडिकल सेल्समन अशी बरीच क्‍यारेक्‍टर मी करत हुतो. मला दिलीप कुमार, नाना पाटेकर, शारुख्खान आनि विद्या बालनचा आवाज डिक्‍टो काढता येतो. आनखीसुद्धा आवाज काढता येतात. ज्यास्त काही सांगत नाही, पन मागल्या टायमाला आमचे फौजदारसाहेब (नाव गुलदस्तात) मला सुट्‌टी देईत न्हवते. मी एसीपीसाहेबांचा आवाज काढून त्यांना फोन करून सुट्‌टी मंजूर करावी, अशी आर्डर दिली. फौजदाराने मला सुट्‌टी दिलीच, पन स्वोतासुद्धा रजेचा अर्ज टाकला! आता बोला!!

सांगन्याचा उद्‌देश येवढाच की पॉलिटिक्‍समध्ये स्वोताचा आवाज काडता नाही आला तरी चालेल, दुसऱ्याचा काडता आला पाहिजे. गळ्यातून आवाज काडता येत नसेल, तर दुसऱ्याच्या कानाखाली तरी काढता आला पाहिजे!! ज्यांना कानाखाली आवाज काडता येत नाही, ते लोक गळ्यातून आवाज काडतात, हे लक्षात ठेवावे.
आपला आवाज काडून एका नगरसेवकाला आमदारकीच्या बदल्यात दहा कोटी देन्याची डिमांड एका इसमाने केली, अशी न्यूज आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पन काळ सोकावतो. ही चारसोबीसीची किरकोळ चाप्टर केस आहे, असे म्हनून सोडून देन्यात काही पॉइंट नाही. असल्या लोकांचा बंदोबस्त वेळीच केला नाही तर गावोगाव मिमिक्री आर्टिस्ट तयार होतील. महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेचे दोन वाजतील. (बारा कधीच वाजून गेले आहेत...) तेव्हा सावधान!

सध्या मिमिक्री आर्टिस्टांचे पेव फुटले आहे. मिमिक्रीचे शो गावोगाव होत असतात. टीव्हीवर पन त्याची हवा चालू असते. कुनीही दुसऱ्याचा आवाज काढून चार डायलॉक बोलले की पब्लिक खूश होते. फिल्मष्टारचा आवाज काढून अनेक मिमिक्री आर्टिस्ट मोठे झालेले मी बघितले आहेत. पन हल्लीच्या जमान्यात पोलिटिकल आवाज काढने हे ज्यास्त डिमांडमध्ये आहे, ह्याची क्रुपया नोद घ्यावी.

आपल्या नावाने दुसऱ्याने फोन करून पैशे उकळले, इथवर ठीक आहे. कायदा नाम की कोई चीज होती है. अदालत अपना काम कर लेगी...कानून के हाथ और कान भी लंबे होते है...(साहेब डायलॉक कसा आहे?) पन आजकाल पॉलिटिक्‍समध्ये काहीही होऊ शकते. हल्ली अनेक मिमिक्री आर्टिस्ट पोलिटिकल पुढाऱ्यांचे पन आवाज डिक्‍टो काढताना आपन पाहात असतो. उद्या कोनी आपल्याला मोदीजींचा किंवा अमित शहासाहेबांचा आवाज काढून फोन करून सांगितले की, ""बाबा, बबन फुलपगारला डीआयजी करा...करनार का?'' कळावे.

आपला बबन फुलपगार. (ब. न. 1212)

Web Title: dhing tang article