शिलंगण! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या, लेका ऊठ, पसरलायस काय असा? आज दसरा! सकाळी उठावे, मुखमार्जन करून जनलोकात सोने वाटावे असा परिपाठ आहे. संस्कृती वगैरे विसरलास का?’’
तरीही डोक्‍यावर पांघरूण घेऊन चिरंतन घोरणाऱ्या मोरूचे मुटकुळे ढिम्म हलले नाही. ते पाहून मोरूच्या बापाचा तीळपापड झाला. खसकिनी पांघरूण ओढून मोऱ्याच्या पेकाटात दोन लाथा घालाव्यात, अशी त्यास उबळ आली. परंतु आज सणासुदीच्या दिवसाची सुरुवात अशा हिंस्र पद्धतीने करणे योग्य होणार नाही, असे त्याच्या मनात आले.

दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या, लेका ऊठ, पसरलायस काय असा? आज दसरा! सकाळी उठावे, मुखमार्जन करून जनलोकात सोने वाटावे असा परिपाठ आहे. संस्कृती वगैरे विसरलास का?’’
तरीही डोक्‍यावर पांघरूण घेऊन चिरंतन घोरणाऱ्या मोरूचे मुटकुळे ढिम्म हलले नाही. ते पाहून मोरूच्या बापाचा तीळपापड झाला. खसकिनी पांघरूण ओढून मोऱ्याच्या पेकाटात दोन लाथा घालाव्यात, अशी त्यास उबळ आली. परंतु आज सणासुदीच्या दिवसाची सुरुवात अशा हिंस्र पद्धतीने करणे योग्य होणार नाही, असे त्याच्या मनात आले.

‘‘मोरेश्‍वरा, सणावारी असे उशिरापर्यंत झोपून राहणे बरे नाही. अशाने स्वास्थ्य आणि आपले समाजजीवनदेखील बिघडते. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे हे विसरलास का?’’ मोरूच्या बापाने एकदम अशी सोशल लाईन घेतल्यानंतरही मोरूवर त्याचा अजिबात परिणाम झाला नाही.
‘‘मोऱ्या किती तास झोपशील मेल्या!,’’ बराच वेळ वाट पाहून मोरूच्या स्थितीवर काहीही परिणाम होत नसल्याचे पाहून मोरूच्या बापाचा तोल सुटू लागला. या वाक्‍याला मात्र मोरूने चुळबुळ केली.

‘‘बाप हो, जाग्रण करून झोपलेल्या लेकरास उठवू नये...,’’ पांघरुणातूनच मोरूने उत्तर दिले.

‘‘जाग्रण का केलेस?’’ हा पोरगा परीक्षेच्या काळातही कधी जाग्रणे करताना दिसला नाही, आता बेकारीच्या काळात कसली जाग्रणे? थापा मारतो लेकाचा, असे मोरूच्या बापाच्या मनात आले.

‘‘बाप हो, अष्टमीच्या दिवशी लाऊडस्पीकरला रात्री बारापर्यंत परवानगी असते. सबब, आम्ही पहाटे तीन वाजेपर्यंत गरबा खेळत होतो...’’ मोरूने खुलासा केला.

‘‘लाज नाही वाटत सांगायला? गरबे खेळून का माणूस मोठे होते?’’ मोरूचा बाप भडकला. ‘‘होय बाप हो, गरबा खेळून पंतप्रधान झालेले एक सज्जन गृहस्थ माझ्या पाहण्यात आहेत...,’’ मोरूने बापास निरुत्तर केले.

‘‘असू दे, असू दे... पण तू आधी ऊठ! मी सोने वाटपासाठी बाहेर जात आहे, तूदेखील चल!,’’ ज्याप्रमाणे वेताळपंचविशीतील विक्रमादित्याने कधीही हट्ट सोडला नाही, त्याप्रमाणे मोरूच्या बापानेही आपला प्रयत्न सोडला नाही.
‘‘नको, मी उठलो तर अनर्थ होईल...’’ मोरूने इशारा दिला.
‘‘तो कसा काय?’’ मोरूचा बाप म्हणाला.

‘‘मी उठल्यावर दाढी व आंघोळ करणार. शिलंगणाच्या नावाखाली घराबाहेर जाणार. जाताना नवीन पोशाख करणार. तशा स्थितीत मी अतिशय राजबिंडा दिसतो हे मला चांगले ठाऊक आहे...,’’ मोरू म्हणाला.

‘‘गाढवाचे पोर हरीण पाडसासारखे दिसले तरी अंतिमतः ते गाढवच असते,’’ मोरूच्या बापाने शाब्दिक प्रहार केला.

‘‘आपण स्वतःस गाढव म्हणता बाप हो? कमाल आहे. मी राजबिंडा दिसत असल्यामुळे व माझ्या सदऱ्याच्या खिशात आपट्याची पाने असल्यामुळे काही ललनांना मी दसऱ्याचे सोने लुटायास देईन. ते करताना माझा पुसटसा हस्तस्पर्श जरी त्या ललनांस झाला तर पंधरा-वीस वर्षांनंतर आमचा मीटू होईल! तेव्हा विषाची परीक्षा घ्यावीच कशाला? त्यापेक्षा झोपलेले बरे...,’’ मोरू निर्ममपणे म्हणाला.

मोरूचा बाप पार हडबडून गेला. तो मनाशी म्हणाला की, मोऱ्या म्हणतो, ते खरेच आहे. मोऱ्याला पंधरावीस वर्षांनंतरचे भविष्य दिसते; तर आपल्या वर्तमानाचे काय? आपण अधिक काळजी घेण्याची गरज आहे...

...काळजीने काळवंडून त्याने हातातली आपट्याची पाने खिशात ठेवून दिली आणि बेधडक अंथरूण घालून तोदेखील घोरू लागला.

Web Title: Dhing tang Article