ढिंग टांग : हॅप्पी बर्थ डे...डिअर फ्रेंड!

Dhing-Tang
Dhing-Tang

प्रिय मित्रवर्य आदरणीय श्री. रा. रा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. काल रात्री (जागून) बारा वाजताच अभीष्टचिंतनाचा फोन करणार होतो. तेवढ्यासाठी मध्यरात्रीपर्यंत जागा राहिलो!! परंतु, तुमचा फोन (नेहमीप्रमाणे) औटॉफरीच होता. (उगीचच आम्हाला जागरण मात्र झाले!!) तुमचा फोन औटॉफरीच झाला की (खरोखर) पोटात गोळा येतो. पण वाढदिवसाच्या आदल्या मध्यरात्री लोकांनी फोन करून पिडू नये म्हणून काही लोक फोन बंद ठेवतात, असे मला (सकाळी) सांगण्यात आले. माझी समजूत पटली. शेवटी हातानेच पत्र लिहून तुम्हाला शुभेच्छा पाठवाव्यात, असे ठरवले. त्यानुसार हे शुभेच्छापत्र लिहीत आहे.

हॅप्पी बर्थ डे टू यू...हॅप्पी बर्थ डे टू यू...
मे गॉऽऽऽऑड ब्लेस यूऽऽऽ डिअर उधोजीसाहेऽऽऽब...
...आमच्या बर्थं डअसे बर्थडे-गीत गुणगुणतच मी ह्या शुभेच्छा पाठवत आहे. कृपया स्वीकार व्हावा!! सोबत नागपुरी संत्रा बर्फी पाठवत आहे, त्याचाही स्वीकार व्हावा! आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे. मी २२ जुलैचा, तर तुम्ही २७ जुलैचे! (टेक्‍निकली मी तुमच्यापेक्षा पाच दिवसांनी मोठा भाऊ आहे हं!!) ‘‘माझ्या भावाच्या वाढदिवसानिमित केळ्याचे शिक्रण, कोबीची भाजी आणि काकडीची कोशींबीर असा बेत ठरवला आहे. तुमच्या घरी काही कोळंबीभात किंवा तिखले वगैरे बेत असेल तर प्लीज कळवा! लग्गेच येईन.
आपली मैत्री केवढी प्रगाढ आहे, हे महाराष्ट्राची रयत बघत आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या ठरवाठरवीवरून थोड्याफार कुरबुरी आपापल्या पक्षात सुरू आहेत, हे खरे. पण त्यातले काहीही मनावर घ्यायचे नाही, हे आपले ‘ठरले आहे ना?’

हल्ली तुमच्याकडील इनकमिंग जोरात वाढले आहे, असे दिसते. चांगले आहे!! आपला मित्रपक्ष जोमाने वाढतो आहे, हे बघायला कोणाला आवडणार नाही? मी लौकरच महाजनादेश यात्रेला निघत आहे. तुम्ही सोबत आलात तर मजा येईल!! येता?

बाकी भेटीअंती बोलूच. (आज जेवणाचा प्रोग्राम असेल तर कळवा...मी वाट पाहत आहे!!)
पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा. 
आपला एकमेव सच्चा मित्र. नानासाहेब.

नानासाहेब-
शुभेच्छा मिळाल्या. सोबत संत्रा बर्फीच्या मोजून दोन वड्या होत्या! जाऊ दे. शुभेच्छांबद्दल थॅंक्‍यू. तुम्ही जनादेशयात्रेला जाऊन या. मला वेळ नाही. आम्ही इथे जनआशीर्वाद यात्रेत बिझी आहोत. आमच्याकडे इनकमिंग वाढते आहे. पण ते आमच्याबद्दल जनतेच्या मनातले प्रेम वाढत चालल्याचे लक्षण मानावे!! आऊटगोइंगचे बिल तुम्हालाच पाठवणार आहे!!

मुख्यमंत्रिपदाबाबत उभयपक्षी जी बडबड चालली आहे, ती माझ्या खिजगणतीतही नाही. कारण मला त्याची पर्वा नाही. तुम्ही आत्ता मुख्यमंत्री आहात, हे जितके खरे आहे, तितकेच पुढल्या टर्मला मुख्यमंत्री आमचाच, हेही तितकेच खरे आहे. तसे माझे बोलणे आधीच झाले असल्याने त्याबद्दल पुन्हा चर्चा होऊ शकत नाही. 

तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा : आज आमच्या घरी कोळंबीभात वगैरे काहीही नाही! केकदेखील कापणार नाही. वायफळ खर्च आम्हाला मंजूर नाही. आमच्या वाढदिवसाला होर्डिंगसुद्धा लावू नका, त्यापेक्षा रक्‍तदान वगैरे करा, असे मी आमच्या कार्यकर्त्यांना बजावून सांगितले आहे. तुम्हीही तसेच विधायक काहीतरी करावे, ही सूचना. (जनआशीर्वाद यात्रेसाठी चिरंजीवांना पॉकेटमनी दिला, त्यात बराच खर्च ऑलरेडी झाला आहे...असो.) 
सारांश : शुभेच्छा तूर्त लांबूनच द्याव्यात..! 
आपला. उधोजी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com