ढिंग टांग  - म्यारेथॉन मुलाखत! 

ढिंग टांग  - म्यारेथॉन मुलाखत! 

(भाग दुसरा आणि फायनल!) 
खंडेनवमीचा दिवसभर साहेबांना आम्ही अनेक प्रश्‍न विचारले. उत्तरादाखल त्यांनीही अनेक प्रश्‍न आम्हाला विचारले. प्रश्‍नाखातर आम्ही त्यांना यथाशक्‍ती उत्तरे दिली. हे साधारणपणे उत्तरपत्रिका वाटून झाल्यानंतर तीन तासांत त्यावरून प्रश्‍नपत्रिका सेटिंग करण्यापैकी होते. पण तरीही मुलाखत झणझणीत, खणखणीत आणि उनउनीत झाली. 

दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा मुलाखतीला बसलो. मुलाखतीला सुरवात करण्यापूर्वी आम्ही खिशात हात घालून आठवणीने सोने काढले आणि साहेबांना ‘सोने’ दिले. सोने म्हणताच त्यांनी चपापून इकडे तिकडे पाहात सोने कुडत्याच्या खिशात टाकले. मुलाखतीसाठी स्थानापन्न झालो. यावेळी साहेब कालच्यापेक्षा अधिक जोशात होते. 

आम्ही - (विनम्रतेने) दसऱ्याच्या शुभेच्छा!

साहेब - (दचकून) तुम्ही पुन्हा आलात? आम्ही चटकन ओळखलं नाही!

आम्ही - (ओशाळून) असं कसं?

साहेब - (गंमतीदार डोळे मिचकावत) आम्हाला वाटलं दसऱ्याचा रेडा कुठून इथं आला!!

आम्ही - (गंमत न आवडून) मुलाखत कंटिन्यू करू या?

साहेब - (दिलखुलासपणे) येऊ द्यात तुमचे सवाल!

आम्ही - (रोखठोकपणे) तीनशेसत्तर कलमाबद्दल तुम्हाला काय वाटतं!

साहेब - (परखडपणे) ते भिकार कलम रद्द झालं त्या दिवशी मी कंदी पेढे वाटले होते... त्यात माझं उत्तर मिळालं नाही का?

आम्ही - (विषय बदलत) कंदी पेढ्यांवरून आठवलं! लोक कंदी पेढे खाताहेत आणि इथे बाजारात मंदी आली आहे...

साहेब - (अचंब्याने) कुठाय? आम्ही भेटलो नाही!

आम्ही - (सडेतोडपणे) म्हंजे बाजारात मंदी आहे, हे तुम्हाला मान्य आहे का?

साहेब - (खांदे उडवत) मी मान्य करून ती पीडा टळणार आहे का? तसं असेल तर ‘हो’!!

आम्ही - (अर्थतज्ज्ञाच्या आविर्भावात) भयंकर परिस्थिती आहे! देशाचा जीडीपी घसरतोय!

साहेब - (तिऱ्हाईताप्रमाणे) बरं मग?

आम्ही - (हेका न सोडता) त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?

साहेब - (तळहाताने ॲक्‍शन करून दाखवत) त्या जीडीपीच्या तळाला खरखरीत पॉलिशपेपर लावा... म्हंजे तो घसरणार नाही!

आम्ही - (सर्द होऊन) पण नोटाबंदीला तुमचा विरोध होता...

साहेब - (दात ओठ खात) च्या ***...!*** **!!!

आम्ही - (घाबरून) काय झालं?

साहेब - (भानावर येत) नोटाबंदीमुळे खूप लोकांची अडचण झाली, हे खरं आहे! पण जीडीपी वगैरे भानगडी आपल्याला समजत नाहीत! पैसे आहेत की नाहीत? कडकी आहे की नाही? एवढंच आपल्याला समजतं! पुढे विचारा!

आम्ही - (जरा तिरकसपणे) हल्ली ईडी-सीबीआयच्या कारवायांचं पेव फुटलं आहे! सत्ताधारी पक्ष अन्य नेत्यांना छळतोय, असं बोललं जातं! आपलं काय मत?

साहेब - (सुप्रसिद्ध समंजसपणा धारण करत) ज्यांनी काही घोटाळे केले आहेत, त्यांनाच छळतायत ना? दाल में कुछ काला होगा, तोही सीबीआय चमचा ढवळेगी ना? कोटी कोटीचे आकडे बाहेर येतायत!!

आम्ही - (डोळे बारीक करून) आणि ईडीचं काय? तुमच्यावरही ईडी प्रयोग झाल्याची चर्चा आहे!

साहेब - (डोळे गरागरा फिरवीत) हिंमत आहे का कुणाची? वाट्टेल ते काय बोलताय? कर नाही त्याला डर कसली? मी लढवय्या माणूस आहे, सांगून ठेवतोय! हाँऽऽऽ!!

आम्ही - (शेवटला निर्णायक प्रश्‍न) मुंबईतील रस्त्यांना भयंकर खड्डे पडल्यामुळे पब्लिक जाम वैतागलं आहे! कंत्राटदारांशी साटंलोटं करून-

साहेब - (उसळून) ऊठ! ऊठ इथून!! नीघ बाहेर!! ऊठ म्हणतो ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com