ढिंग टांग : अखेरचे रणांगण!

ढिंग टांग : अखेरचे रणांगण!

मुक्‍काम ठाणे. ठिकाण : शेवटचे रणांगण.

साहेबांच्या गाड्या वेगात सभास्थळी निघाल्या  होत्या. नवनिर्माणाचा एक कडवट सैनिक म्हणून आम्ही तेथे उपस्थित होतोच. नुसते उपस्थित नव्हतो, तर साहेबांचा निष्ठावंत अंगरक्षक म्हणून आमची नेमणूक झाली होती. अचूक वेळ पाहून मामलेदार कचेरीजवळच्या मिसळीच्या दुकानी फोन करून मिसळीची ऑर्डर प्लेस करण्याची गुप्त कामगिरी आमच्यावर सोपवण्यात आली होती.

‘‘मतं मागायला लाज कशी वाटत नाही यांना?’’ मोटारीत बसल्या बसल्या साहेब भडकून स्वत:शीच म्हणाले. आम्ही मागल्या शीटवर अंग चोरून बसलो होतो. गेल्या जाहीरनाम्यातले एकही वचन पूर्ण न करता लेकाचे पुन्हा मते मागायला लोकांकडे येतात. लोकसुद्धा थोरच! तेसुद्धा त्यांनाच मते देतात. संतापाने साहेबांच्या कपाळाशी शीर थडथडू लागली. 

‘‘अरे, तुमच्या संवेदना, जाणिवा मेल्या आहेत का?’’ साहेब ओरडले.

‘‘छे हो!’’ आम्ही घाबरत घाबरत म्हणालो. जाणिवा मेल्या आहेत, अशी कबुली दिली असती; तर साहेबांनी सभेनंतरची मिसळ क्‍यान्सल केली असती.

‘‘गृहीत धरताहेत ते तुम्हाला!!’’ साहेब स्वत:शीच ओरडले. 

‘‘चालतंय!’’ आम्ही बेसावधपणे म्हणालो. मिसळमालकांनी आम्हाला गृहीत धरायचे नाही तर कोणाला? असा कृतज्ञ तांबडा विचार आमच्या मनात तेव्हा तर्रीसारखा तरंगत होता.

‘‘खामोश!’’ साहेब ओरडले. आम्ही भानावर आलो.

सभेचे ठिकाण हळूहळू जवळ येत होते. ऐन भरतीच्या वेळी समिंदरात लोटलेल्या नौकेतील नाखव्याप्रमाणे साहेबांचे मस्तक हलत होते. हे सारे रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे!! नतद्रष्ट सत्ताधाऱ्यांनी खड्डेसुद्धा धड बुजवले नाहीत. कुठेही जा! ठाण्यात जा, पुण्यात जा! सगळीकडे खड्डेच खड्डे!!

...साहेबांनी गाडीची काच खाली करून आभाळात पाहिले. ढग दिसत होते. म्हणजे आज (आपल्यालाही) भिजायला मिळेल का? भिजता भिजता भाषण करता आले, तर भिजरी भिजरी मते मिळतील! भिजरे भिजरे यश मिळेल!

भिजऱ्या भिजऱ्या पावसात भिजरी भिजरी सभा...

नवनिर्माणाचा शिल्पकार मधोमध उभा...

...आपल्याला आपोआप कविता बिविता होतेय की काय, अशी भीती वाटून साहेबांनी घाईघाईने गाडीची काच भराभरा वर केली. माणसाने काहीही करावे; पण कविता करू नये. त्यात सध्या दिवाळी अंकांचे दिवस जवळ आले आहेत. साहेबांनी अंगावरचा शहारा प्रयत्नपूर्वक दाबला.

ठाण्यात सभा घेतली की बरे असते. सभा आटोपून थेट मामलेदाराची तिखटजाळ मिसळ खायला जाता येते. मध्यंतरी भिवंडीहून परत येताना ठाण्यात गाडी वळवून मिसळीचा स्वाद चाखला होता. दुसऱ्या दिवशीच्या तिन्ही सभा तिखटजाळ झाल्या होत्या...

पण, पाऊस पडला पाहिजे. पडलाच पाहिजे. आभाळाकडे फार काळ बघितले तर ढग घाबरून पळतील. त्यापेक्षा तिकडे न बघितलेलेच बरे.

प्रचाराचा शेवटचा दिवस. हे भाषण संपले की मिसळ. मग थेट शिवाजी पार्क! साहेबांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. गेले काही दिवस नाही म्हटले तरी दगदग झाली. वीस-वीस सभा घ्यायच्या म्हंजे काय चेष्टा आहे का?

त्यात या मतदारांची काही ग्यारंटी नाही. ग्यारंटी नाही, म्हणजे नाहीच! नाशकात इतके चांगले काम करूनही लेकाच्यांनी मते नाही दिलीन!! काम करून नंतर मते मागितली होती... तरीही!! या कमळवाल्यांनी तर सारी लाजच सोडली आहे. कामे न करता मते मागताना यांना लाज वाटत नाही. पण, मतदारांचे काय? एवढी कामे करूनही आम्हाला मते टाकायची नाहीत म्हणजे काय? संतापाने साहेबांनी ॲक्‍सिलरेटरवर पाय दाबला आणि आमच्याकडे बघून म्हणाले,

‘‘आजची मिसळ क्‍यान्सल! थेट घरी जायचं! कळलं?’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com