आशिक-ए-नाशिक! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

बायको : (सक्‍काळी सक्‍काळी...) अहो, ऐक्‍लं का?
पती : ("नाही!'- हे मनात) हो, ऐकतॉय!! (हे उघड.)
बायको : (स्वप्नाळू आवाजात) आपण नाशिकला जाऊ या गडे!
पती : (बेसावधपणाने) का? तुझ्या आईची तब्बेत अंमळ बिघडली होती म्हणून विचारतोय!

बायको : (सक्‍काळी सक्‍काळी...) अहो, ऐक्‍लं का?
पती : ("नाही!'- हे मनात) हो, ऐकतॉय!! (हे उघड.)
बायको : (स्वप्नाळू आवाजात) आपण नाशिकला जाऊ या गडे!
पती : (बेसावधपणाने) का? तुझ्या आईची तब्बेत अंमळ बिघडली होती म्हणून विचारतोय!
बायको : (फणकाऱ्यानं) इतकी वाट नको पाह्यला काही!! माझ्या आईला काहीही धाड भरलेली नाही! गुडघे दुखतायत फक्‍त!.. येत्येय पुढल्या आठवड्यात आपल्याकडे ऱ्हायला!!
पती : (मनातल्या मनात) म्हंजे आम्ही मेलो!! (आता उघड) व्वा, व्वा!!
बायको : (पुन्हा किचिंत लाडात येत) पण मी काय म्हंटेय! उद्या नाहीतरी इलेक्‍शनची सुटी आहे ना तुम्हाला?
पती : (लोकशाहीची चाड बाळगत) हे पाहा, इलेक्‍शनची सुटी असं म्हणायचं नाही!! इलेक्‍शन हे आपलं कर्तव्य असतं!! मतदान हा आपला अधिकार, हक्‍क आणि कर्तव्य आहे!! तो बजावल्याशिवाय मी...मी...मी आंघोळसुद्धा करणार नाही!!
बायको : (फणकाऱ्यानं) आंघोळ टाळायला तुम्हाला कारणच हवं असतं! हुं:!!
पती : (चुकीची दुरुस्ती करत) बरं...आंघोळ करीन! पण नाशिकला येणार नाही! आहे काय त्या नाशकात? हॅ:!!
बायको : (राग आवरून खोट्या प्रेमाने) नाशकात सग्गळं काही आहे! सुंदर सुंदर कारंजी, छॉन छॉन रस्ते!! म्युझियम, बोट्यानिकल गार्डन, गोदा पार्क, ट्राफिक पार्क... नुसती बागबगीच्यांची रेलचेल! पाहावं तिथे बागा!! कित्ती लक्‍की आहेत नाशिककर! प्रत्येक फ्लॅट गार्डन फेसिंग हो!! एकदा जाऊ याच म्हंटे मी!!
पती : (च्याट पडत) खरं सांगतेयस की तुझ्या त्या चिमीमावशीसारखं... म्हणायचं क्‍यांडी फ्लॉस, आणि द्यायचे बुढ्‌ढी के बाल!!
बायको : (दुर्लक्ष करत) इंडियाची नवी गार्डन सिटी आहे नाशिक म्हटलं! तिथल्या बोट्यानिकल गार्डनची ख्याती तर दूरदेशी पसरली आहे! ब्लॅक फॉरेस्ट केक असतो ना, तसा नाशिक फॉरेस्ट केक येणारे म्हणे!! इतकं निबीड अरण्य आहे तिथं!
पती : (चिंतन करत) हं...उगीच नाही, प्रभुरामांनी तिथं पंचवटीत कुटी बांधली!!
बायको : (डोळे विस्फारून)...तिथली झाडं बोलतात म्हणे!!
पती : (स्वत:शीच) हो...जरा अतीच बोलतात!
बायको : (कपाळाला आठी) काय म्हणालात?
पती : (गोरेमोरे होत) झाडं बोलतात म्हंजे जरा जास्तच होतंय, असं म्हंटोय मी!
बायको : (नाशिक महिमा कंटिन्यू...)...हत्तींचं अभयारण्य केलंय तिथं! आपल्या अगदी जवळ येतात, सोंड हलवत!
पती : (घाबरून) बाप रे!
बायको : (दिलासा देत) घाबरताय कशाला इतके?..कुणीतरी हत्तीच्या पायी दिल्यासारखे? हत्ती फायबरचे आहेत! फुलपाखरू गार्डन पण आहे तिथं! बघावं तिथं फुलपाखरं!!
पती : (मॅटर ऑफ फॅक्‍टली.., पण अर्थात स्वत:शीच) पुण्यात डेक्‍कनवर, ठाण्यात राम मारुती रोडवर, डोंबोलीत फडके रोडवर, दादरमध्ये रानडे रोडवर, बांदऱ्यात लिंकिंग रोडवर फुलपाखरं दिसत नाहीत, असं कोण म्हणतं?..(उघडपणे) नाशकातले कावळे माहीत होते, फुलपाखरं?
बायको : (चिडून) तुम्हाला मेलं कसलं कौतुकच नाही! मी म्हंटे, इतरांनी गर्दी करण्याच्या आत आपण नाशिकला शिफ्ट व्हायला हवं! नाहीतरी आहे काय तुमच्या पुण्यात!! मुख्यमंत्र्यांच्या सभेला फुलपाखरू सोडा, चिटपाखरू फिरकलं नाही!! फू:!!
पती : (ओठांचा चंबू करत) आमचे गिरीशभाऊ बापट पुण्याचे आहेत म्हणून इतकी काही नावं ठेवायला नको हं!
बायको : (वाटाघाटीं सुरूच ठेवत) मी म्हंटे, नाही गेलो मेलं आपण त्या बर्विणीसारखे दरवर्षी बंगळूर, उटी, नि म्हैसूरला!! पण आता निदान-
पती : (साक्षात्कार होत) आत्ता ट्यूब पेटली! तरुण वयापासून मला नेहमी प्रश्‍न पडायचा! शिमला, उटी, नैनिताल, काश्‍मीर इथली मंडळी हनिमूनला कुठे जात असतील? त्यांचा प्रॉब्लेम आता सुटलाय!!
बायको : (लाडात येत) मग येताय ना गडे नाशिकला !!
Web Title: dhing tang article