मत कुणाला द्यावे? (ढिंग टांग)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मत कुणाला द्यावे?
मत कुणालाही द्यावे!

मागणाऱ्याला तर द्यावेच,
पण न मागणाऱ्यालाही द्यावे.

चारचौघांच्या टोळक्‍याने
दारात उभ्या राहणाऱ्या
बत्तीस चोक एकशेअठ्‌ठावीस
दातांना मत द्यावे
पाच-पन्नासांच्या कळपाने
गल्लीकुच्यात हिंडणाऱ्या
पाच-पन्नास दुणे शे-शंभर
हातांना मत द्यावे.

मत कुणाला द्यावे?
मत कुणालाही द्यावे!

मागणाऱ्याला तर द्यावेच,
पण न मागणाऱ्यालाही द्यावे.

चारचौघांच्या टोळक्‍याने
दारात उभ्या राहणाऱ्या
बत्तीस चोक एकशेअठ्‌ठावीस
दातांना मत द्यावे
पाच-पन्नासांच्या कळपाने
गल्लीकुच्यात हिंडणाऱ्या
पाच-पन्नास दुणे शे-शंभर
हातांना मत द्यावे.

मत कर्वतकाठी लुगड्याला द्यावे,
मत खोट्यानाट्या झगड्याला द्यावे.
मत आयत्या बिळावरच्या नागोबांना द्यावे
मत दर पाच वर्षांनी गरजणाऱ्या ढगोबांना द्यावे.

हात जोडून पदर पसरणाऱ्या
हसतमुख उमेदवाराला मत द्यावे.
हात पसरून पदर जोडणाऱ्या
फसतमुखालाही मत द्यावे.
पंचवार्षिक मुखदर्शन घडवणाऱ्या
दैवदुर्लभ नेत्याला मत द्यावेच,
पण रोज संध्याकाळी "बसणाऱ्या'
बैठकीतल्या नगर"पित्या'लाही मत द्यावे.

मत कुणालाही द्यावे.

टळटळीत दुपारी लावलेल्या
सभेतील रिकाम्या खुर्च्यांना मत द्यावे.
विलेक्‍शनच्या चिखलफेकीत
झोंबलेल्या मिर्च्यांनाही मत द्यावे.
पाच वर्षे कारभारापोटी केलेल्या
मन:पूत लोच्यांना मत द्यावे,
न केलेल्या कारभारापेक्षा
स्वप्नातल्या बगिच्यांना मत द्यावे.
शिकार सोडून पंजे आपटत
टाळ्या पिटणाऱ्या वाघांना मत द्यावे.
स्वत:ला सिंह म्हणविणाऱ्या
शतप्रतिशत महाभागांनाही मत द्यावे.
बोकडांना द्यावे, बोक्‍यांना द्यावे,
उंदरांना द्यावे, चिचुंदरांना द्यावे,
चार पायांच्या कुणालाही
तीन पायांवर मत द्यावे.

मत कुणालाही द्यावे.

मत लोणकढी थापांना द्यावे.
मत भावनिक हाकांना द्यावे.
मत अस्मितेच्या हुंकाराला द्यावे,
मत पुष्टान्न डकारांना द्यावे,
मत फॉर्च्युनर गाड्यांना द्यावे
रातोरात वाटलेल्या साड्यांना द्यावे,
नव्याकोऱ्या गुलाबी नोटांना द्यावे,
दहा-दहा लाखांच्या कोटांना द्यावे
मर्द मावळ्यांच्या तुतारीला द्यावे,
ऐनवेळी केलेल्या उतारीला द्यावे,
मत गाडीत सापडलेल्या
लाखोंच्या रोकड गड्‌डीला द्यावे
मत रात्री गच्चीवरल्या अंधारात
वाढलेल्या बिर्याणीतल्या हड्‌डीला द्यावे
मत धुवट कुडत्यांना द्यावे,
मत खवट अडत्यांना द्यावे,
मत नेहमीच्या यशस्वी चढत्यांना द्यावेच,
पण चिवटपणे झुंजणाऱ्या पडत्यांनाही द्यावे.

मत कुणालाही द्यावे.
करुन दाखवले म्हणणाऱ्यांना मत द्यावे
चोरुन दाखवले म्हणणाऱ्यांना द्यावे
धरुन दाखवले म्हणणाऱ्यांना द्यावेच,
फिरुन दाखवले म्हणणाऱ्यांनाही द्यावे,

आपल्या शहरातल्या रस्त्यांना मत द्यावे,
रस्त्यांमधल्या खड्ड्यांना मत द्यावे,
खड्ड्यांमधून चालणाऱ्यांना द्यावे,
खड्‌डे पाडणाऱ्या वाहनांना द्यावे,
खड्‌डे बुजवणाऱ्या कंत्राटदारांना द्यावे,
कंत्राटदारांच्या टक्‍केवारीला द्यावे,
टक्‍केवारीवाल्या नगरपित्यांना द्यावे,
नगरपित्यांच्या पक्षांना मत द्यावे,
पक्षाच्या पुढाऱ्यांना मत द्यावेच,
पुढाऱ्यांच्या मतालाही आपले मत द्यावे!

मत कुणालाही द्यावे, कारण

मत आहे आपल्या
लोकशाहीचा सारांश वगैरे!

ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे
पर्जन्यपाणी अखेर सागरालाच
जाऊन मिळते...
ज्याप्रमाणे कोठल्याही देवाला
केलेला मनोभावे नमस्कार
अखेर केशव:प्रति पोहोचतो...

त्याप्रमाणे-
आपण दिलेले मत
हे जळाऊ लाकूडफाट्याप्रमाणे
जाऊन मिळते एका
विशाल, विराट अशा होळीत
आणि,
होळीभोवतीच्या शिमग्यात
होळीभोवतीच्या शिमग्यात.
-ब्रिटिश नंदी
.......................................

Web Title: Dhing Tang article