...हे अशक्‍य आहे! (ढिंग टांग!

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

गोदापार्क घडवलं. कारंजी उभारली. ते पहा, ते विशाल फुलपाखरू... पंख पसरून आपल्या स्वागताला उभं आहे. ते पहा, वनराईने विनटलेलं माझं बोट्यानिकल गार्डन! तिथल्या हत्तींचे चित्कार मला ह्या इथं ऐकू येत आहेत

नेमका दिवस सांगावयाचा तर माघ महिन्यामधील कृष्ण पक्षातील द्वादशीचा दिवस. टळटळीत दुपार होती. ऊन मी म्हणत होते. पण, तेवढ्यात कृष्णकुंजगडाच्या बालेकिल्ल्यातील कोपऱ्यातील पलंग करकरला. उन्हाने तात्काळ मी म्हणायचे थांबवले. उगीच काय तोंड चालवायचे? आपले गप्प पडून राहिलेले बरे. (खुलासा : ऊन नेहमी पडते... कळले?) असो. खुद्द राजे हळूहळू जागें होत होते.

""पप्याऽऽ... पप्याजीऽऽऽ...!'' अंतःपुरातून एक दबकी हांक ऐकू आली. दबकी एवढ्याचसाठी की हांक मारणाऱ्या मुखावर एक टोलेजंग उशी होती. चढत्या उन्हाचे वार परतवण्यासाठी उशीसारखी ढाल नाही. उशी ही उजेडाची शत्रू असते. हा अभेद्यपणा कुठल्याही चादरीत नाही, जो उशीत असतो. जिवाचे रान आणि प्राणाचे कान करणाऱ्या पप्याजी फर्जंदाने आपल्या धन्याची हांक अचूक ऐकली.
वाफाळता चहाचा कप घेवोन तो अदबीने अंतःपुरात पोचला.
""साहेब, चहा!,'' फर्जंद म्हणाला.
""काय बातमी?'' उशीखालून राजियांनी विचारले.
""एक चांगली बातमी आहे, एक वाईट बातमी आहे, साहेब!,'' फर्जंद म्हणाला.
""कुठलीही सांग! आम्हाला सर्व बातम्या एकच...,'' उशीखालून आवाज आला.
""आपला दादरचा गड पडला. मावळ्यांनी एकच एल्गार करोन आपली शिबंदी कापून कांढिली. ऐन दादरमध्ये आपण हरलो साहेब!,'' पडेल आवाजात फर्जंद म्हणाला.
""आता वाईट बातमी सांग!,'' उशीखालून आवाज.
फर्जंद हैराण जाहला. वाईट बातमी म्हणोन त्याने निवडून दादरचे वृत्त आधी देऊन टाकले होते. आता आणखी वाईट बातमी आणावयाची कोठून? हे म्हंजे न्यूज च्यानलसारखेच जाहले. वाईट बातम्यांना टीआरपी असतो, तेव्हा वाईट बातम्या आधी आणा. चांगल्या बातम्यांना प्रेक्षक नाही... असो.
""बरं, आपण नाशकात कमी का काम केलं साहेब?,'' फर्जंदाने सुरवात केली. नाशिकचे नाव निघाले की त्याच्या चेहऱ्यावर नकळत श्राद्धाची अवकळा येत्ये. स्वभावाला औषध नाही, येवढेच त्याचे कारण. पण नाशकाचे नाव काढताच त्याचा आवाज आणखीनच पडला.
""नाशकात आपण गेल्या पाच वर्षांत इतकं काम केलं की इतर पक्षांना पंचवीस वर्षांत जमणार नाही! नाशकात पैशाला मत देतात की कामाला, हे बघायचंच आहे मला!,'' राजियांनी त्वेषाने उशी दूर फेकून दिली. नाशिकातील उत्फुल्ल कारंजी, तिथल्या फुलांनी सजलेल्या बागा राजांच्या डोळ्यांसमोर नांचू लागल्या.
""नाशिकसाठी आम्ही काय केलं नाही? बागा बांधल्या. गोदापार्क घडवलं. कारंजी उभारली. ते पहा, ते विशाल फुलपाखरू... पंख पसरून आपल्या स्वागताला उभं आहे. ते पहा, वनराईने विनटलेलं माझं बोट्यानिकल गार्डन! तिथल्या हत्तींचे चित्कार मला ह्या इथं ऐकू येत आहेत..,'' राजांच्या स्वप्नाळू डोळ्यांसमोर मनोरम नाशिक उभे राहात होते...
""साहेब, पण-,'' फर्जंदाने त्यांना अडवण्याचा अपयशी प्रयत्न केला.
""आमचे नाशिककर मुलाबाळांना घेऊन बागेत डबा खायला जाताना बघून आमचं ऊर भरून येतं... दादरचं पतन ही काही विशेष बाब नाही. आम्ही नाशिकचे... नाशिक आमचं!,'' राजे उद्‌गारले.
""नाशकात पैशाला मत मिळालं, साहेब!,'' मनाचा हिय्या करून फर्जंदाने अखेर "चांगली बातमी' फोडली.
""क्‍काय? अशक्‍य!!,'' एक हात छातीवर ठेवून धक्‍का बसल्यासारखे राजे ओरडले.
""होय साहेब... होत्याचं नव्हतं झालं,'' फर्जंदाच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले.
""असा झडझड्या मार का बरं बसला असेल? केलेल्या कामाची काहीच पावती मिळाली नाही?,'' खंतावलेल्या राजांनी स्वत:लाच बहुधा सवाल केला; पण आगाऊ फर्जंदाने उगीचच उत्तर दिले. तो म्हणाला-
""पावती द्यायला नाशिककर तयार होते साहेब... पण पावती द्यायची कोणाला? हे त्यांना अखेरपर्यंत कळलं नाही...''
असो.

Web Title: dhing tang article