आमची (पण) 'मन की बात'! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 10 एप्रिल 2017

कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा बोजवारा उडाल्याने चिंतेत असलेल्या त्याच्या चॅनेलमधूनही "हमारे लिए कोई रिऍलिटी शो किजीए' अशी रिक्‍वेस्ट झाली. मी आणखी एकदा थॅंक्‍यू म्हणालो. किती वेळा थॅंक्‍यू म्हणायचे

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 चैत्र शुद्ध त्रयोदशी.
आजचा वार : संडेवार.
आजचा सुविचार : बोलणाऱ्याची माती खपते, न बोलणाराचे सोने पडून राहते!

नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे) सकाळपासून चिक्‍कार फोन येताहेत. तुम्ही किती छान दिसता? किती छान बोलता? किती छान हसता? वगैरे वगैरे. "थॅंक्‍यू' असे नम्रपणे बोलून मी फोन ठेवत होतो. काय बोलणार? "आय नो' असे म्हणणे बरे दिसले नसते. मी तरी काय करू? वर दिलेल्या तिन्ही प्रतिक्रिया सत्यच आहेत, हे खरेच मला माहीत आहे. किंबहुना, मी छान दिसतो, बोलतो, हसतो म्हणूनच मी आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, ह्याची नम्र जाणीव मला आहे.
अपेक्षेप्रमाणे "मी मुख्यमंत्री बोलतोय' ह्या दूरदर्शनवरील कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. इतका टीआरपी कुठल्याच कार्यक्रमाला मिळाला नसल्याची माहिती मिळाली. प्राचीनकाळी (म्हंजे वीसेक वर्षांपूर्वी!!) महाभारत मालिका पाहण्यासाठी रविवारी सकाळी रस्ते ओस पडत असत. तसाच प्रकार ह्या रविवारी झाला, असे आमचे पीए सांगत होते. माझा विश्‍वास बसेना. प्रमोशन मिळविण्यासाठी लोक काय वाट्‌टेल ते सांगतात. पण साक्षात अमिताभ बच्चंजींचा फोन आला आणि उडालोच. ते म्हणत होते, ""कौन बनेगा करोडपतीलासुद्धा एवढा टीआरपी नव्हता.'' मी थॅंक्‍यू म्हणालो. थोड्या वेळाने आमीर खानचा फोन आला. तो म्हणाला, ""आपने तो टीव्हीजगत में "दंगल' कर दी. आमच्या वॉटर कपसाठीही एखाद्या चॅनेलवर करा की असा कार्यक्रम!'' मी पुन्हा थॅंक्‍यू म्हणालो. कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा बोजवारा उडाल्याने चिंतेत असलेल्या त्याच्या चॅनेलमधूनही "हमारे लिए कोई रिऍलिटी शो किजीए' अशी रिक्‍वेस्ट झाली. मी आणखी एकदा थॅंक्‍यू म्हणालो. किती वेळा थॅंक्‍यू म्हणायचे.

""माझ्यासाठी हा थॅंक्‍सगिव्हिंग संडे आहे'' असा विनोद करून मी घरातील वातावरण थोडे हलके करण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ! थॅंक्‍यू म्हणून म्हणून माझे तोंड इतके दुखले की माझ्या ओठांचा चंबू झाला!! (खुलासा : थॅंक्‍यू म्हणत आरशात बघावे!!) असो. "मी मुख्यमंत्री बोलतोय' ह्या कार्यक्रमाच्या टायटलबद्दल मात्र मी जरा अजूनही साशंक आहे. "मी मुख्यमंत्री बोलतोय, काय म्हणणं आहे?' किंवा "होय, मी मुख्यमंत्री बोलतोय ज्जा!!' असा वास त्याला येतो. पुढले वाक्‍य ऐकू आले नाही, तरी ते आहे, असे वाटत राहते. "मी किनई मुख्यमंत्री बोलतोय हं!' असे कार्यक्रमाचे नाव असायला हवे होते, अशी सूचना मी करून बघितली. पण आमच्या जनसंपर्क विभागाने ऐकले नाही. जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे?

बाकी कार्यक्रमात मी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे दिली. पण कर्जमाफी कधी करणार, हे सिक्रेट पुढच्या एपिसोडमध्ये कळेल, अशी सोय करून ठेवली!! मालिकांमध्ये असेच असते. नाही का? "विक्रांत असा का वागला असेल?' असा सवाल करून तीनदा वीज पडल्याचा साऊंड इफेक्‍ट द्यायचा... की पुढल्या एपिसोडला लोक टीव्हीसमोर येणारच!! हा साधासुधा आडाखा मी इथेही वापरला. शेतीच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली, पण कर्जमाफीचा बॉल चक्‍क सोडून दिला. ह्या मुद्द्यावर मी कितीही टीआरपी खेचू शकतो. लोकांचे कौतुकोद्‌गार स्वीकारत असतानाच संध्याकाळी आमचे चंदुदादा पाटील कोल्हापूरकर आले. काही बोलेनात! मीच त्यांना विचारले, की "आमचा कार्यक्रम पाहिलात का?' त्यावर त्यांनी मान डोलावली. "जबर्दस्त टीआरपी आहे!' असे त्यांना सांगितले. त्यांनी पुन्हा मान डोलावली. थोडावेळ थांबून त्यांनी जे काही मत दिले, त्यानंतर पोटात गोळाच आला. ते म्हणाले-

" टीआरपी मिळवा, पण "मन की बात'पेक्षा जास्त नको!!''
 

Web Title: dhing tang article