विनोदकाकांस पत्र! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 12 मे 2017

विनोदकाकांच्या ह्या आदेशामुळे बालपणीचा काळ सुखाचा असे मुलांनी भविष्यात कसे म्हणावे? आपणही "लहानपण देगा देवा' कसे म्हणावे? त्यात एका विद्यार्थ्याचे पत्र आम्हाला सापडले

वाचकहो, शाळकरी मुलांसाठी आमचे हृदय आज शतप्रतिशत विदीर्ण झाले आहे. द्रवले आहे. हरवले आहे. ती का मुले आहेत? फुलेच ती!! देवाच्या बागेतील ताटव्यातली छोटी छोटी फुले!! गोड गोजिरी आणि निरागस! मुले कसली, सोनेरी चांदीत लपेटलेली छान छान चाकलेटेच ती! ते का क्‍यालरीज मोजायचे वय आहे? ते तर खेळण्या-बागडण्याचे वय. मस्त मजेने खायचे-प्यायचे. खूप खूप खेळायचे! पण त्यांच्या आयुष्यात एक विनोदकाका आले आणि सगळ्ळी मज्जाच निघून गेली! विनोदकाका म्हंटात, ""वडापाव? अंहं! मुळीच नाही हो खायचा. तब्बेतीला वाईट्ट ! पिझ्झा? छे छे! हे काय भलतेच? कोकाकोला? व्वारे व्वा!! असले जंक फूड नाही हं खायचे? भूक लागली तर पोहे खावेत, गूळपापडीच्या वड्या खाव्यात. छानसा सांजा खावा. उप्पीट खावे. तेव्हा यापुढे वडापाव वगैरे सगळं बंद! कळलं? उघडा बरं पुस्तकं!!..''

विनोदकाकांच्या ह्या आदेशामुळे बालपणीचा काळ सुखाचा असे मुलांनी भविष्यात कसे म्हणावे? आपणही "लहानपण देगा देवा' कसे म्हणावे? त्यात एका विद्यार्थ्याचे पत्र आम्हाला सापडले. आमच्याप्रमाणेच वाचकांच्या हृदयाला अनारश्‍यासारखी जाळी पडावी, ह्या हेतूने आम्ही ते पत्र जसेच्या तसे येथे देत आहो.
* * *
प्रीय ती. विनोदकाकांस अनेक उत्तम आशीर्वाद...स्वॉरी...चुकले...साष्टांग नमस्कार. मी इयत्ता सातवी (फ) मध्ये शिकीत असून, माझे नाव बबन बोटमारे असे असून, सर्वीजणे मला पोटल्या असे म्हणतात. कारण मी खूप खातो. कै. जा. म. दहाडे विध्यालय ही माझी शाळा आहे. ही एक चांगली शाळा असून तेथे चांगले शिक्षन भेटते. आमचे चित्रकलेचे गुर्जी फवारेमास्तर हे मला हुशेन अशी हाक मारतात. "हुशेन लगा हिकडं ये की!' किंवा "ओ हुशेन, कोपऱ्याच्या पानवाल्याच्यातनं आपलं पान घिउन ये. धावत जा आनि पळत ये, लठ्ठ्या!' असे प्रेमाने म्हणतात. मग मी जातो. (एक मसाला पान मीपण खातो.) एकदा त्यांनी चित्रकलेच्या तासाला "बईल काढा' असे सांगितले व ते झोपून गेले. मी बईल काढलेला कागद त्यांच्याकडे नेला. ते म्हणले, ""हे रं काय, सुक्‍काळीच्या?'' मी म्हणले, ""बईल आल्ता, तुम्ही उटायच्या आत श्‍यान टाकून ग्येहेला. हा घ्या पुरावा!'' कागदावर मी दोन बारके डोंगुर काढले होते. फवारेमास्तराने हुशेनला फोकाने बडिवले.

आमच्या शाळेत एक क्‍यांटिंग असून तिथे वडापाव चांगला भेटतो. पाचवीधरनं मी तिथे आटवड्याला एकदा म्यागी नूडल खातो. म्यागी नूडल मला फार आवडते. ते दोन मिंटात खायचे असते. मी तर एका मिंटात खातो. तुम्ही म्यागी नूडल कधी खाल्ले का? नसेल तर आमच्या शाळेच्या क्‍यांटिंगमधे शुक्‍कीरवारी यावे. नूडल भेटतील. तशे मी क्‍यांटिंगच्या अण्णाला सांगून ठेवितो. पत्र लिहण्यास कारण कां की आमच्या क्‍यांटिंगमधे यापुढे वडापाव, सामोसा, चाकलेट आणि नूडल भेटणार नाही, असे फवारेमास्तरांनी सांगितले. हे खरे अहे का? खरे असेल तर वाईट अहे. हे ऐकूण मला खूप वईट वाटले. मी रडलो. फवारेमास्तर म्हणले, पोराहो, मी तरी काय करू? घरची चपातीभाजी खाऊन मला बी काव येतोय. पण तावडेगुर्जींनीच फतवा काढल्यावर आता काय विलाज? घरचाच डबा आणा आणि खावा आता!''

शाळेच्या क्‍यांटिंगमधे जंगफूड भेटनार नाही, त्याऐवजी उप्पीट, पोव्हे, खिचडी, फोडनीचा भात असे आयटेम भेटनार असल्याचे क्‍यांटिंगच्या अण्णाने सांगितले. हे खरे अहे का? असेल तर जामच वईट अहे. ऐकून मी खूप रडलो.

शाळेत खायाला भेटते म्हणून मी इतकी वर्षे शाळेत जात होतो. क्‍यांटिंग बंद झाल्याकारणाने आता मी तिथे कशापायी जावू? कळावे. आफला नम्र आज्ञाधारक विध्यार्थी बबन बोटमारे. सातवी फ.

Web Title: dhing tang article