वैशाख वणवा! (ढिंग टांग!)

ब्रिटीश नंदी
शनिवार, 13 मे 2017

वैशाखाच्या आभाळातच
शापित काही लवलवणारे
मळकट काही सुके मेघ अन
फोलकटासम तडतडणारे

वैशाखाच्या वणव्यामध्ये
जळते सैराटाची ओल
ऋतुचक्राच्या मधील आरी
फिरते केवळ गोलंगोल

अगा उदारा, किती पाहसी
कळीकाळाची अशी कसोटी
किती पाहसी वाट सख्या रे,
जीवित्वाची फुटेल कवटी

वैशाखाच्या जिन्याखालती
वेटोळ्यांकित सुने कुलुंगी
लहा लहा अन्‌ जीभ गाळते
लाळ कोठली सांगोवांगी

वैशाखाच्या आभाळातच
शापित काही लवलवणारे
मळकट काही सुके मेघ अन
फोलकटासम तडतडणारे

वैशाखाच्या तळात काही
धगधगणारे जिवंत इंगळ
चुल्ह्यावरती रटरटणारी
मेजवानीची अभद्र चंगळ

वैशाखाच्या पाणवठ्यावर
तुडुंब भरते असली कोरड
भग्न घड्यांची जुनी खापरे
अवकाळाशी करिती बडबड

वैशाखाची धृष्ट वासना
घुसमटते असहाय चराचर
शेतकऱ्याची पोर फुटावी,
तशी सृष्टीची होते तडफड

वैशाखाच्या फांदीवरती
कुठे लटकल्या शुष्क सावल्या
ैंउन्हात जळत्या वाटेवरती
तहानलेल्या मूक माऊल्या

वैशाखाच्या थैमानातच
धरतीपोटी धरेल जीव
एका अमृतथेंबामधुनी
देत दिलासा एक वळीव!
-ब्रिटिश नंदी
..................................

Web Title: dhing tang article