योग! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 18 मे 2017

..ज्याअर्थी भगवी कफनीवाले बाबाजी आहेत, त्याअर्थी जेन्युइन असू शकतील. आल्यासरशी हात आणि कुंडली दाखवून घ्यावी, असा पोक्‍त विचार राजियांच्या मनी डोकावला. करेक्‍ट!! असेच केले पाहिजे.

इतिहास साक्षी आहे. नेमकी तीथ सांगावयाची तर वैशाख शुक्‍ल नवमी श्रीशके 1938. संवत्सर हेमलंबी. पहाटे अकरा-साडेअकराचा सुमार होता. शिवाजीपार्कावरील "राजगडा'ला जाग येत होती. झुंजुमुंजूची सोनेरी किरणे राजियांच्या मंचकापर्यंत पोहोचली आणि अवखळपणे त्यांच्या डोळ्यांशी बागडू लागली. चावट कुठली!! खुशाल डोळ्यांत बोटे घालतात! कानात गुदगुल्या करतात!!
""तुमच्या ** * ***!! गुर्रर्र,'' बाजूला पडलेली उशी डोक्‍यावर ओढून राजियांनी पहाटकिरणांना पिटाळू पाहिले. सिंह झोपलेला असताना सिंहाच्या छाव्यांनी उगीच दंगामस्ती सुरू केली तर सिंह कसा ओरडतो? अगदी तस्से! (पुराव्यादाखल पाहा : ऍनिमल प्लानेट.) अर्धवट निद्रेतच राजियांनी चुटक्‍या वाजवून सूर्यकिरणांना "गेटाउट' म्हटले. एक व्योम व्यापणारी जांभई दिली. आता उठावे!!
...तेवढ्यात फर्जंद पप्याजी दबकत अंत:पुरात आला, किंचित खाकरून (आणि चिक्‍कार भेदरून) म्हणाला-
""राजे, उठावं! दारी कुणी योगीपुरुष आले आहेत!''फर्जंद म्हणाला.
"" कोणॅय?,'' उशीखालून राजियांनी नेहमीच्या शैलीत विचारपूस केली.
"" कुणी बाबाजी म्हणून आहेत!' फर्जंद म्हणाला.
"" कराडकडून आले असतील, तर उद्या या म्हणावं!,'' उशीखालून राजे.
"" अंहं!! ह्या बाबाजींनी भगवी कफनी धारण केली असून पायी खडावा आहेत! हातभर दाढी असून मुखाभोवती प्रकाशाचा तेजस्वी पुंज आहे!! आपली भेट हवी, म्हणून कृष्णकुंजाच्या पायथ्याशी ध्यानस्थ बसले आहेत!!'' फर्जंदाने माहिती दिली.
""काय कटकट आहे!!..भेटत नाही म्हटले तर तक्रारी करता की भेट देत नाहीत! आता भेट द्यायला तयार झालो तर हे यायला लागले!! हॅ:!!,' राजियांनी तक्रार मांडली.
""योगीपुरुष पॉवरफुल आहेत असं दिसतं, राजे! आल्या आल्या त्यांनी पोटाची खोळ खळाखळा अशी काही हलवून दाखवली की बरेच जण उठून घाईघाईने पळाले!!,'' फर्जंदाने योगीजींच्या पॉवरची कल्पना दिली. तो पुढे म्हणाला, ""तुझ्या राजाचं भविष्य मला स्वच्छ दिसत आहे, मुला!' असं ते मला म्हणाले!''
अस्सं? आमचे भविष्य ह्यांनी पाहिले? जे आम्हाला क़ळले नाही, ते ह्यांना कळले? जगदंब जगदंब.
...ज्याअर्थी भगवी कफनीवाले बाबाजी आहेत, त्याअर्थी जेन्युइन असू शकतील. आल्यासरशी हात आणि कुंडली दाखवून घ्यावी, असा पोक्‍त विचार राजियांच्या मनी डोकावला. करेक्‍ट!! असेच केले पाहिजे. त्या बाबाजीस घरात बोलावून नीट जाजमावर बसवून हळूचकन हात पुढे करावा. विचारावे, ""योगीजी, जरा हात पाहा बरे? कां असे बेक्‍कार दिवस चालले आहेत? महाराष्ट्राचे नवनिर्माण कोठे अडले आहे? नवनिर्माणाच्या आम्ही सुरू केलेल्या यज्ञयागात हे कुठले असुर आणि राक्षस विघ्ने आणत आहेत? काही तोडगा सुचवावा, ऋषिवर! ह्या मराठी दौलतीसाठी आम्ही मार्गशीर्षातले गुरुवारसुद्धा करू!!...''
मऱ्हाटी दौलतीसाठी येवढे तरी केलेचि पाहिजे! धीर्धरा धीर्धरा तकवा...हडबडूं गडबडूं नका....
""पप्याजीऽऽऽ...''उशी फेकत राजियांनी नव्या उमेदीने पलंगावरून खाली उडी मारली. म्हणाले, ""त्या योगीपुरुषास सन्मानाने बोलवा. आगतस्वागत करा!! नेहमीसारखं नको, खरंखुरं आगतस्वागत करा!! आम्ही स्नानादी कर्मे उरकून येतोच!!''
राजे लगबगीने अंतर्भागात पळाले. इकडे पप्याजीने खाली जाऊन बाबाजींना मोठ्या आदरेकरोन आणिले. बाबाजी येऊन आसनावर बसले. एका डोळ्याने त्यांचे त्राटक सारखे चालूच होते. राजे आले. आल्या आल्या त्यांनी त्या योगीपुरुषाच्या चरणाची धूळ मस्तकी लावली. म्हणाले-
""साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा!! कसं काय येणं केलंत बाबाजी?''
बाबाजी दाढीतल्या दाढीत हसले. खांद्याच्या झोळीतून एक पुडके काढत ते म्हणाले, "" प्रणाम वत्स! आमच्या योगाश्रम-कम-कंपनीनं हा साबणचुरा काढला आहे! पाश्‍शे लिंबांची शक्‍ती असलेला!! ऐंशी रुपये किलो!! घेता?''
Web Title: dhing tang article