हिरो की व्हिलन? (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 22 मे 2017

"हिरोच जर व्हिलनसारखा वागू लागला तं पिच्चर फ्लॉप होऊन जातो गा!' हे थोर रस्तेसुधारक श्रीमान नितीनजी गडकरीसाहेब ह्यांचे सुप्परहिट वाक्‍य शिवसेनेला उद्‌देशून असल्याचे लोक म्हणत असले, तरी आम्हांस ते पटत नाही. हे शुद्ध फिल्मी समीक्षेतील वाक्‍य आहे

""अबे भैताडा, हिरोच जर व्हिलनसारखा वागू लागला तं पिच्चर फ्लाप होऊन जातो गाऽऽ..! बटाटेवडे घ्या अजून...,'' गडकरीसाहेबांनी आमची अक्‍कल काढली, (त्याचे आम्हाला काही नाही, पण) त्यांचे हे सुप्परहिट वाक्‍य आमच्या मन:पटलावर पर्मनंट कोरले गेले, जसा की ट्याटू!! सैपाकघरातून वडे तळल्याचा खमंग वास येऊन ऱ्हायला होता. आमचा एक कान आणि एक नाकपुडी त्या दिशेने होती.
शालेय जीवनापासून आम्ही पुख्खा आणि पिच्चर ह्या दोन गोष्टींचे जबरदस्त अभ्यासक आणि भोक्‍ते आहो. तन-मन-धन ओतून आम्ही पिच्चरचा अभ्यास केला आहे. तसेच खाद्ययात्राही केली आहे. त्यासाठी प्रसंगी (तिकिटबारीपासून तीर्थरूपांपर्यंत) असंख्य ठिकाणी मरेस्तोवर मारदेखील खाल्ला आहे. पण असे असले तरी आम्ही हाती घेतलेले व्रत सोडिले नाही.

व्हिलनचा हिरो (विनोद खन्ना) झालेला आम्ही पाहिला आहे. व्हिलनचा विनोदकार (कादर खान) झालेला आम्ही पाहिला आहे. विनोदकाराचा व्हिलनही (शक्‍ती कपूर) आम्ही पाहिला आहे. हिरोचा विनोदकार (अमिताभ बच्चन) आम्ही पाहातच लहानाचे मोठे झालो, इतकेच नव्हे, तर विनोदकाराचा क्रांतिकारक व समाजसुधारक (इथे आम्ही अमोल पालेकरांचे नाव घेणे टाळले आहे, हे चाणाक्षांच्या नजरेत आलेच असेल. असो!!) झालेला आम्ही देखतडोळां पाहिला. पण हिरोचा व्हिलन होणे, हे सिनेमाधंद्याच्या दृष्टीने बरे नाही, हे आमच्या नजरेतून सुटले होते.

हिरोने व्हिलनगिरी करायला सुरवात केली, तर लोच्या होतो हे तर खरेच आहे. हिरोने हिरोसारखे राहावे व वागावे. झाडांभोवती घिरट्या घालत गाणी म्हणावीत, मां ने बनाया हुवा गाजर का हलुवा खावा, खानदान की इज्जत बचवावी, फर्स्ट डिव्हिजन में नंबर लाकर भी नौकरी के लिए दरदर की ठोकरें खावीत, "मेरे अंदर के जानवर कू मत जगावो, धन्नासेठ' असे म्हणत स्लो मोशनमध्ये व्हिलनची चांबडी लोळवावी, व्हिलनच्या चमच्यांना तर एकेका फायटीत शंभर शंभर फूट लाबं फेकून द्यावे... हिरोला बरेच काम असते. व्हिलनचे तसे नाही. त्याला सिनेमाभर वाईटसाईट कृत्ये करावी लागतात, आणि क्‍लायमॅक्‍सला पोलिस यावयाच्या आत मरेस्तवर हाणून घ्यायचे असते.

"हिरोनं हिरोगिरीच करावी असे आपले म्हणणे आहे काय?'' आम्ही हेतुपुरस्सर वाद वाढवला. वादे वादे जायते तत्त्वबोध: हेच खरे, नव्हे काय?
""अलबत! हिरो तं हिरो असतो. त्याले व्हिलनगिरी करायले कोण सांगतं?'' प्लेटीतला चौथा वडा उचलत गडकरीसाहेब म्हणाले.
""त्याले...आपलं त्याला अँटीहिरो म्हणतात!'' आम्ही ड्राकुलाचे सुळेदार उदाहरण तोंडावर फेकणार होतो. पण राहून गेले...
""काह्याचा अँटी हिरो बे! माणूस एक तं हिरो राहातो, नाही तं व्हिलन! हिरोला टाळ्या मिळतात, व्हिलनला शिव्या!!'' गडकरीसाहेबांनी प्लेट साफ केली.
""आपल्या शाहरुख खानाने डर नावाच्या चित्रपटात अँटीहिरो केला होता...,'' आशाळभूत नजरेने रिकाम्या प्लेटीकडे पाहात आम्ही सॉलिड तिढा टाकला. "हिंदी चित्रपटसृष्टी : एक सम्यक अभ्यास' हा ग्रंथ (भरल्यापोटी) लिहावा तर आम्हीच!!
""भजे येऊ द्यात आता भजे!!...,'' गडकरीसाहेबांनी सैपाकघराच्या दिशेने पुकारा केला. बटाटेवडा हा हिरो असेल तर भजी ही अँटीहिरोच आहेत, अशी अनुपम उपमा आम्हाला सुचली. (खुलासा : उपमा हा एक पदार्थ नव्हे, तर अलंकार आहे!! असो.)
""वड्यांना जी आहे, ती भज्यांना मजा नाही!,"' गडकरीसाहेबांनी व्हिलनसारखा चेहरा करून मत नोंदवले. आम्ही विषण्ण मनाने आणि रिकाम्या पोटी तेथून निघालो.

"हिरोच जर व्हिलनसारखा वागू लागला तं पिच्चर फ्लॉप होऊन जातो गा!' हे थोर रस्तेसुधारक श्रीमान नितीनजी गडकरीसाहेब ह्यांचे सुप्परहिट वाक्‍य शिवसेनेला उद्‌देशून असल्याचे लोक म्हणत असले, तरी आम्हांस ते पटत नाही. हे शुद्ध फिल्मी समीक्षेतील वाक्‍य आहे. फक्‍त चित्रपट निर्मितीशी संबंधित लोकांनीच ह्याचा गांभीर्याने विचार करावा. असो.

Web Title: dhing tang article