दोस्ता, कुठे आहेस? (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 7 जून 2017

मी कुठे आहे, हे तुम्हाला काय करायचे आहे. काही अपरिहार्य कारणाने मला दर उन्हाळ्यात परदेशी यावेच लागते. तसा मी निघून आलो आहे, पण महाराष्ट्राच्या भल्यासाठीच आम्ही हे उन्हाळी दौरे करत असतो. जोवर तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीची घोषणा करत नाही, तोवर आम्ही तुमच्या मदतीला येणार नाही, हे भले जाणून असा

प्रिय मित्र उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. सध्या तुम्ही कुठे आहात? गेले दोन-तीन दिवस तुम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न करीत आहे. अनरिचेबल आहे. सावित्री नदीवरल्या पुलाचे उद्‌घाटन कुठल्याही परिस्थितीत तुमच्या हस्ते व्हायला हवे, असे आम्हाला नितीनजी गडकरीसाहेबांनी सांगून ठेवले होते. पण आपण आलाच नाहीत! शेवटी मलाच त्या पुलाची फित कापावी लागली. सगळ्यांचा किती हिरमोड झाला. त्यासाठी मी "मातोश्री'वर फोन केला होता. पण ""साहेब बाहर गएले है!'' असे उत्तर मिळाले. मी विचारले, ""बाहर बोले तो किधर?'' तर "मालूम नहीं' असे उत्तर मिळाले. फोन ठेवण्यात आला. आमचे उजवे हात चंद्रकांतदादा कोल्हापूरकरांना कोण कुठे गेले आहेत, ह्याची खडान्‌खडा माहिती असते. त्यांनाही विचारले. तर त्यांनी 'कोणास ठाऊक' ह्या अर्थी ओठ काढून खांदे उडवले. विनोदवीर तावडेजींना विचारले तर ते म्हणाले, की "आपले शेलारमामा उजळमाथ्याने मुंबईभर फिरताहेत, त्याअर्थी उधोजीसाहेब मुंबईबाहेर असणार!' शेवटी मी नाद सोडला. सदर पत्र तुमच्या घरच्या पत्त्यावर पाठवतो आहे. कुठे रिडायरेक्‍ट होते ते कळेलच! (मी गृहमंत्री आहे...हो की नाही?) असो.

"फ्रेंडिन्नीड इज ए फ्रेंडींडीड' असे इंग्रजीत म्हटले जाते. "गरजवंत मित्र मित्राचेच पाय धरी' असे त्याचे (ढोबळ मानाने) मराठीत भाषांतर होईल. तुमचा हा मित्र संकटात सापडलेला असताना, तुम्ही कुठे गेला आहात? काही लोकांनी सांगितले की तुम्ही इंडोनेशियाच्या जंगलात फोटो काढायला गेला आहात. काही लोक म्हणाले की तुम्ही हेच काम करायला दक्षिण आफ्रिकेत गेला आहात. एकाने तर मला सांगितले, की तुम्ही आयसीसीच्या क्रिकेट म्याची बघायला लंडनला गेला आहात. थोडक्‍यात, तुम्ही बांद्रा सोडून सगळीकडे आहात!! इथे महाराष्ट्र पेटलेला असताना तुम्ही तिथे फोटो काढत राहिलात, तर तुमच्या ह्या जिवलग मित्राचे काहीही खरे नाही. तेव्हा पत्र हाती पडताच त्वरेने येथे यावे व मित्रास संकटातून वाचवावे. आपला. नाना.
ता. क. : सावित्री पुलाचा चान्स गेला म्हणून रागावू नका! बदल्यात तुम्हाला मुंबई- गोवा महामार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमाची सुपारी नक्‍की देऊ! आम्ही मैत्रीधर्म पाळतो!! कळावे.

नाना-
तुमचे पत्र मिळाले. माझा शेतकरी बांधव तिथे बांधावर होरपळत असताना मी लंडनला म्याच बघायला गेलो, असे तुम्हाला वाटलेच कसे? वाट्टेल त्या वावड्या उठवाल तर याद राखा. गाठ ह्या मर्द मावळ्याशी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीसाठी आम्ही कालही उभे होतो, आजही आहो आणि उद्याही उभे राहू. (कुठे उभे राहू हा मुद्दा गैरलागू आहे...कुठेही उभे राहू!!) आज शेतकऱ्यांना जो आंदोलनाचा हुरूप आला आहे, त्याला कारणीभूत आमचेच नेतृत्व आहे, हे लक्षात घ्या!!

मी कुठे आहे, हे तुम्हाला काय करायचे आहे. काही अपरिहार्य कारणाने मला दर उन्हाळ्यात परदेशी यावेच लागते. तसा मी निघून आलो आहे, पण महाराष्ट्राच्या भल्यासाठीच आम्ही हे उन्हाळी दौरे करत असतो. जोवर तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीची घोषणा करत नाही, तोवर आम्ही तुमच्या मदतीला येणार नाही, हे भले जाणून असा. किंबहुना मी तिथे नाही, ही तुम्हाला केलेली एक प्रकारची मदतच आहे, असे समजा!!

आम्ही तुमचे तथाकथित मित्र आहोत आणि शेतकऱ्यांचे खरे मित्र आहोत. त्यामुळे नसत्या अपेक्षा बाळगू नये. एक आंब्याची पेटी पाठवलीत, म्हणून आम्ही तुम्हाला धर्मसंकटातून वाचवावे काय? त्रिवार नाही!! आपला संबंध संपला, संपला, संपला!! ट्रिपल संपला!! कळावे. आपला. उधोजी.

ता. क. : मुंबई-गोवा हायवेचे भूमिपूजन कधी करणार आहात? तारीख लौकरात लौकर कळवा. नक्‍की येईन. सावित्रीचा चान्स हुकलाच!! असो. पुन्हा कळावे.

Web Title: dhing tang article