सरसकट भेळीचे तत्त्व! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 13 जून 2017

निकष म्हंजे दुसरं तिसरं काहीही नसून थोडीफार कागदपत्रं असतात!,'' दादांनी आणखी समजावून सांगितल्याने आमच्या "सर'मध्ये एकदम उजेडच पडला. निकष ह्या शब्दाचा इतका सोपा अर्थ आम्हाला आजवर कोणीही सांगितला नव्हता

सांप्रतकाळी महाराष्ट्र देशी सरसकट अच्छे दिन आल्याचे आमचे परममित्र ती. चंदूदादा कोल्हापूरकर ह्यांनी (एकदाचे) जाहीर केल्याने आम्ही खुश झालो व त्यांस रंकाळ्यावर "राजाभाऊ'च्यात भेळपार्टी देण्याचे तत्त्वत: मान्य करून टाकले. "नक्‍की ना?' असे त्यांनी चार्चारवेळा विचारून घेतले. आम्ही चार्चारवेळा "होऽऽ'कार भरला. परंतु, हेदेखील कबूल करायला हवे की सरसकट ह्या शब्दाने आम्ही काहीसे सरफिरे झालो होतो. "सरसकट अच्छे दिन', तेही "तत्त्वत:' आणि "निकषांवर आधारित' ह्या तिन्ही शब्दांच्या भेळीने आमची मती कुंठित झाली होती. अखेर रंकाळ्यावर भेटल्या भेटल्या आम्ही दादांना छेडले. मनात शंका उपस्थित झाली की ती तात्काळ फेडून घ्यावी. उगीच पाटलोणीत शिरलेल्या मुंगीप्रमाणे शंकाकुशंका सहन करीत बसू नये, येवढे आम्हाला सरसकट कळते.

""सरसकट म्हंजे काय हो दादा?,'' न राहवून आम्ही डायरेक्‍ट सवाल केला. आमच्यासमोर रंकाळा होता. आमच्याखाली हिर्वळ होती. आम्हाला सरधोपट हिशेब कळतो. सरसकट कसा समजावा? पण आमच्या ह्या थेट प्रश्‍नरूपी भाल्याचा दादांवर ढिम्म परिणाम झाला नाही.

"" सोप्पंय की...सरसकट म्हंजे सरसकट!,'' दादांनी "सरसकट' ह्या शब्दाचा अर्थ आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितला. एवढा साधा अर्थ आम्हाला समजू नये? आम्हीही खुळेच आहोत. पण आधुनिक मराठीत "सर' ह्या शब्दाचे किमान अर्धाडझन अर्थ (उदा : डोके, लष्करी वा मुलकी पद, इंग्रज पदवी, उभी चढाई, बाजूस सरकणे, पावसाची झड इ. ) मौजूद असून "सकट' ह्या आडनावाचे आमचे एक शेजारीदेखील होते, हे आम्ही दादांना सांगू शकलो नाही.
""असं होय..!,'' एवढेच गुळमुळीतपणे आम्ही म्हणालो.
"" भेळीचं काय झालं?,'' दादांनी आठवण करून दिली.
"" निकषांवर आधारित सरसकट अच्छे दिन ही काय भानगड आहे हो?,'' आम्ही शिताफीने विषय बदलला.
""निकषांवर आधारित याने की सरसकट सगळ्यांना अच्छे दिन येतील, पण त्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतील!!'' त्यांनी पुन्हा तपशिलात अर्थ उलगडून सांगितला. आम्ही पुन्हा ओशाळलो. छे, आपले अज्ञान किती अगाध आहे?
"" असं होय...,'' एवढेच गु. आ. म्ह.
"" निकष म्हंजे दुसरं तिसरं काहीही नसून थोडीफार कागदपत्रं असतात!,'' दादांनी आणखी समजावून सांगितल्याने आमच्या "सर'मध्ये एकदम उजेडच पडला. निकष ह्या शब्दाचा इतका सोपा अर्थ आम्हाला आजवर कोणीही सांगितला नव्हता. गेल्या किती पिढ्यात अच्छे दिन आलेले नाहीत? आधी आलेल्या अच्छे दिनांचे हप्ते फेडले का? सरकारी नोकरी, व्यवसाय, प्राविडंट फंड आदी सुविधा आहेत का? सातव्या वेतन आयोगाचे किती फायदे मिळाले? अशी ही कागदपत्रे असतात. त्याचे दाखले दिले की झालं...एवढी सोपी प्रोसेस आहे.
""इतकं सोपं असेल असं वाटलं नव्हतं! उगीच आम्ही इतक्‍या यात्रा काढल्या...,'' गंभीर गुन्ह्याची कबुली देताना आरोपी जो आवाज लावतात, त्या आवाजात आम्ही म्हणालो.
""अहो, तुम्ही निकषात बसलात तर तुम्हाला सरसकट अच्छे दिन शंभर टक्‍के मिळणारच! काळ्या दगडावरची रेघ!!.. शंभर टक्‍के म्हंजे माहीत आहे ना?,'' डोळे बारीक करून दादांनी विचारले.
"" शतप्रतिशत!,'' आम्ही तात्काळ उत्तर दिले. दादा भयंकर खुश झाले.
""करेक्‍ट!! जस्ट डोण्ट वरी नाऊ, निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला सरसकट अच्छे दिन देऊन टाकण्याचे आम्ही तत्त्वत: मान्य केलं आहे...आता भेळ आणा! किती वेळ घालवाल?,'' कातावून दादांनी आम्हाला झापलेच.
"" राजाभाऊ कुठं जात नाही दादा, पण तुम्ही निकषात बसताय का, हे पाहायला नको का?'' आम्ही तितक्‍याच ठामपणाने म्हणालो. आमच्या प्रश्‍नात शतप्रतिशत बुराई होती, असे नंतर दादा कोणाला तरी (भेळ खात) सांगताना आम्ही ऐकले. इति.

Web Title: dhing tang article