उठता लाथ, बसता बुक्‍की! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 14 जून 2017

चांगलं मैदानात जावं आणि तलवार गाजवावी!! पण तेवढं बरीक इकडच्यांना सांगून उपयोगाचं नाही!! माजघरातच तुमची मर्दुमकी!! हु:!!

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : भरत आलेली!
काळ : थांबलेला!
प्रसंग : अत्यवस्थ.
पात्रे : राजाधिराज उधोजी महाराज, सौभाग्यवती कमळाबाई आणि...सरनोबत संजयाजी.

वातावरण गंभीर आहे. कमळाबाई काहीशा आजारी मंचकावर पडून आहेत. त्यांच्या उशाशी उधोजीराजे चिंतित होऊन उभे आहेत. अब आगे...
उधोजीराजे : (घाबरत घाबरत) बरं वाटतंय का आता?
कमळाबाई : (संतापून अंथरुणातच) मला काय धाड भरलीये? हातीपायी धड आहे की! तुमच्या ह्या तलवारीच्या हातापायीनं हे होऊन बसलं! अगं आई ग्गं...
उधोजीराजे : (ओशाळून) आम्ही तलवारबाजीची नुसती प्रॅक्‍टिस करत होतो! तुम्ही मध्येच कडमडाल, हे कोणाला ठाऊक होतं? दैव बलवत्तर म्हणून घाव बसला नाही ह्या उधोजीचा!! नाहीतर भलतंच काही होवोन बसलं असतं!!
कमळाबाई : (वैतागानं) काही अडलं होतं, माजघरात तलवारबाजीची प्रॅक्‍टिस करायला? चांगलं मैदानात जावं आणि तलवार गाजवावी!! पण तेवढं बरीक इकडच्यांना सांगून उपयोगाचं नाही!! माजघरातच तुमची मर्दुमकी!! हु:!! अगं मेले गं...गेली माझी कंबर!!
उधोजीराजे : (हताशपणे) आम्ही तलवारीचे दोन-चार हवेत हात करतो काय आणि तुम्ही सतरंजीवर धडपडून खाली पडता काय!! सगळंच अतर्क्‍य!!
कमळाबाई : (फणकाऱ्यानं) काही अतर्क्‍य बितर्क्‍य नाही!! चांगले "काटो, मारो गनिम को' असं ओरडलात! मी ऐकलंय स्वत:च्या कानांनी!!
उधोजीराजे : (आणखी ओशाळून) अहो, त्याला अंगात वीरश्री संचारणं म्हणताऽऽत! मर्द मावळ्याला अधूनमधून असं होतंऽऽ..!
कमळाबाई : (मंचकावर पडल्या पडल्या) जळलं तुमचं वीरश्रीचं लक्षण!! माझ्या कमरेत उसण भरलीये त्याचं काय? तेवढं लाटणं फिरवा म्हटलं, तर तेवढंही मेलं जमलं नाही तुम्हाला!!
उधोजीराजे : (अन्यायग्रस्त चेहरा करत) ज्या हातांनी हयातभर तलवार फिरवली, त्यांनी लाटणी फिरवावीत, लाटणी?
कमळाबाई : (कसनुसा चेहरा करत) तेवढं टायगर बाम तरी लावून दिलं असतंत तर...तेही नाही!!
उधोजीराजे : (डोळे विस्फारुन) टायगर बाम जाम झोंबतं माहिताय ना? "ठो ठो' ओरडाल!! मागल्या वेळेला तुमच्या कपाळाला मीच चोळलं होतं, आठवतंय ना?
कमळाबाई : (हात झटकत) मला मेलीला बिलकुल झाली नाही आग!
उधोजीराजे : (तावातावाने) पण मला झाली ना!! माझ्या हाताला-
कमळाबाई : (घाईघाईने) पुढचं नका सांगू बाई! आठवला तो प्रसंग! तरी मी तेव्हा हात धुऊन घ्या, असं परोपरीनं सांगत होत्ये!! अगं बाई गं...मरत्ये आता!!
उधोजीराजे : (घाबरुन) तुम्ही एवढ्या विव्हळू नका हो! काळजाला घरं पडतात आमच्या!! (गडबडीनं) कोण आहे रे तिकडे? तातडीने इकडे या!!
संजयाजी : (मुजरा करत प्रवेश) आज्ञा महाराज!!
उधोजीराजे : (आदेश देत) कमळाबाई राणीसाहेबांच्या कमरेत उसण भरली आहे! उठता येईना की बसता येईना!! राजवैद्यांना त्वरित पाचारण करोन बोलावून घेणे!! उपचार करणे!! निघा!!
संजयाजी : (पेशंटकडे पाहात) कंबर धरली म्हणता? मग राजवैद्य कशाला हवा? एक लाथ घातली की सरळ येतील राणीसाहेब!
उधोजीराजे : (किंचाळून) लाथ? (तेवढ्यात संजयाजी आक्रमण करतात. "हर हर हर हर महादेव अशी आरोळी ठोकत "उपचार' करतात-धडाक!!)
कमळाबाई : (गगनभेदी किंकाळी घुमते...) अगं आईग्गंऽऽ...
संजयाजी : (आत्मविश्‍वासानं) महाराजांचा शब्द म्हंजे देवावरचं फूल!! वाया कसं जाऊ देऊ? आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही लाथ घातली म्हणून तर बाईसाहेब सरळ आल्या!! महाराजांचा विजय असो!!

Web Title: dhing tang article