ऊठ म्हटलं की उठा! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 22 जून 2017

पंचवीस वर्षं "सजली' म्हणालो होतो, त्या लेकाच्या पोटावळ्या पत्रकारड्यांनी पराचा कावळा करून "ज' चा "ड' केला!! ही पत्रकार म्हंजे आनंदीबाईची औलाद...

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक.
वेळ : सुलह करण्याची.
काळ : वेळ पाहण्याचा.
प्रसंग : गोड!
पात्रे : गोडच!!

सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई नटून थटून गवाक्षापाशी उभ्या आहेत. कुणाची तरी वाट पाहात आहेत! तेवढ्यात नेहमीप्रमाणे राजाधिराज उधोजीराजे प्रविष्ट होतात. अब आगे...
उधोजीराजे : (खाकरत) उहु उहु... एक माणूस आमच्यावर अजुनी रुसलंय वाटतं... हहह!
कमळाबाई : (कानावरून पदर ओढत) सत्यभामे, कोण आलंय दारात बघ बरं?
उधोजीराजे : (आणखी जवळ जात) राग नाही का गेला अजून?.. हहह!!
कमळाबाई : (खोट्या संतापाने) सत्यभामे, आम्ही कुणाशी बोलत नाहीओत!!
उधोजीराजे : (दचकून) आता ही सत्यभामा कुठून काढलीत?
कमळाबाई : (गर्रकन वळून) असेल कुणीही!! तुम्हाला काय करायचंय? आधी छळ छळ छळायचं आणि नंतर गोड गोड बोलायचं!! कळतात बरं आम्हाला ही नाटकं? इतक्‍या का आम्ही "ह्या' आहो?
उधोजीराजे : (गमतीदार बोलण्याचा अपयशी प्रयत्न करत) ह्यॉ म्हॉंजे कॉय बॉरं?
कमळाबाई : (नाक मुरडत) ह्या म्हंजे डोंबलं तुमचं!! तुमच्या ह्या गोड बोलण्याच्या जाळ्यात आम्ही नाही फसणार हो आता!! एक म्हणता नि एक करता! विश्‍वास कसा ठेवायचा आम्ही एका माणसावर?
उधोजीराजे : (खचून जात) अहो, आम्ही नेमके कसे वागलो तर तुम्हाला पटेल?
कमळाबाई : (मुसमुसत) उठता लाथ नि बसता बुक्‍की, हाच आमचा खाक्‍या आहे असं म्हणाला होतात ना?
उधोजीराजे : (समजूत घालत) अहो, गैरसमज होतो आहे तुमचा. आम्ही-
कमळाबाई : (मध्येच तोडत) तुम्ही आमच्या कमरेत लाथ घातली म्हणून आम्ही दौलतीतल्या शेतकऱ्यांना कर्जाऊ उचल दिली, असं म्हणालात ना?
उधोजीराजे : (गोरेमोरे होत) आहो, ते आम्ही नाही म्हणालो, आमचे सरनोबत संजयाजी जरा अतिउत्साहात बोलले असतील. अशा वेळी जातो एखादा अधिकउणा शब्द!! त्याचं एवढं काय मनावर घ्यायचं?
कमळाबाई : (नाक फेंदारत) हुं: पाहुण्याच्या काठीनं विंचू मारण्याचा तुमचा हा डाव माझ्या मेलीच्या आधीच लक्षात यायला हवा होता!! दरवेळी लागट काहीतरी बोलता आणि नंतर सारवासारव करता!! मागल्या खेपेला "पंचवीस वरसं सडली' म्हणाला होतात!!
उधोजीराजे : (घाईघाईने) पंचवीस वर्षं "सजली' म्हणालो होतो, त्या लेकाच्या पोटावळ्या पत्रकारड्यांनी पराचा कावळा करून "ज' चा "ड' केला!! ही पत्रकार म्हंजे आनंदीबाईची औलाद-
कमळाबाई : (तडफेने एक पाऊल मागे जात) खबरदार आमच्या पत्रकारांबद्दल काही वेडेवाकडे बोलाल तर!!
उधोजीराजे : (बुचकळ्यात पडत) तुमचे पत्रकार? मग ते आमचे कुणी नाही वाटतं?
कमळाबाई : (उसना कढ गळ्याशी आणत) पंचवीस वर्षं आम्ही संसार कसा रेटला ते आमचं आम्हाला माहीत! सासुरवाडीइतका जाच असूनही कधी "हूं की चूं' केलं नाही! कोंड्याचा मांडा करून झोपडीची माडी केली!! माडीचा महाल केला!!
उधोजीराजे : (हादरून जात) अहो, हा महाल आमचा आहे!! आम्ही तो तुम्हास दिला!! ही दौलत आमची, आम्ही ती तुम्हांस आंदण दिली!! इथली रयतदेखील आमची, आम्ही ती तुम्हास दिली!!
कमळाबाई : (सावरून घेत) हो हो!! आणखी नाही का दिलं काही?
उधोजीराजे : (कळवळून) कमळाबाईसाहेब, आम्ही काहीही बोललो तरी शेवटी आम्ही तुमच्या मनासारखंच करतो ना? "बस म्हटलं की बसा पाहिजे आणि ऊठ म्हटलं की उठा', हे आम्हीच म्हटलं होतं ना तुम्हाला?
कमळाबाई : (चिडून) फारच चांगलं सुभाषित आहे होऽऽ..! स्त्रीद्वेष्टे कुठले!! तुमच्याविरुद्ध मोर्चेच काढले पाहिजेत!!
उधोजीराजे : (गुडघ्यांवर बसत) पण तुमच्या इच्छेनुसार "उठा'बश्‍या आम्हीच काढतोय ना? जय महाराष्ट्र.

Web Title: dhing tang article