वाघ देणारा माणूस! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

प्रति,

मित्रवर्य मा. ना. नानासाहेब फडणवीस,
कारभारी, मलबार हिल दफ्तरखाना,
सुभा : बॉम्बे (महाराष्ट्रा)

आपल्या मंत्रिमंडळातील एका सदस्याबद्दल अत्यंत गंभीर व ऑफिशियल तक्रार दर्ज करण्यासाठी सदरील खत रवाना करीत आहे. अंबल करावा. कारभारी म्हणोन आपणांस साहेबमजकूरांनी नामजाद केले असोन दौलतीचे सर्वेसर्वा अजूनही साहेबच आहेती, ह्याची जाण ठेवणे. हयगय न करणे. रयतेच्या गवताच्या पांत्यास ढका लावाल, तर आमचे तरवारीचे पाते हरहमेश तय्यार आहे, त्यास मान (रिस्पेक्‍ट) देणे. बहरहाल आमचे ध्यानीं असे आले आहे की आपल्या मंत्रिमंडळातील एक कुणी सुधीर मुनगंटीवार नामे चंद्रपुरी सदस्य हालींच फार खोड्या काढो लागला असोन त्याचा पुंडावा वाढला आहे. त्यास वेळींच वठणीवर आणणे. समय बरबाद न करणें. सदर सदस्य काही ना काही निमित्ते काढून आमच्या बांदऱ्यातील मातोश्री महालावर टपकतो व गडाचे हरेक दरवाजे बंद करण्याचे गडकऱ्यांचे हरप्रयत्न हरप्रकारे हाणून पाडितो. तस्मात आता "हर हर महादेव' शिवाय आमच्यापास विलाज उरला नाही.
सदर हिकमती गडी प्रसंगी वेषांतर करोन गडात शिरकाव साधतो. ""आम्ही कटकांतील लोक, रातपाळी करोन परतलो आहो,'' ऐशी बतावणी करोन आमच्या मर्द मावळ्या निरागस शिपायांस हातोहात फसवितो. येका हातात वृक्षाचे रोप आणि दुज्या हातात व्याघ्र घेवोन सदरील मंत्र्याने संपूर्ण मराठी दौलतीला "दे माय धरणी ठाय' ऐसे करोन सोडिले आहे. आपल्या दौलतीचे जंगलखातेही ह्या मंत्र्याकडे असल्याणे, जागा मिळेल तेथे हा मनुष्य झाडेझुडे लावीत सुटला असून, महाराष्ट्रभर चौदा कोट झाडे लावण्याचा संकल्प त्याणें सोडिला असल्याची खबर आहे. चौदा कोट झाडे येथ उगवली, तर त्यास जंगलराज म्हणावे लागेल!! हा मनुष्य थैलीत झाडांच्या बिया घेवोन येतो आणि आमचें गडावर इतस्तत: फेकतो. त्यातील काही बियाणे चुकून आमचे अंगरख्यात अडकले. तेथेच रुजलें. परिणामी, आमच्या देहांस अनेक ठिकाणी अंकुर फुटल्याचे ध्यानी आले. सदर तण उपटण्यासाठी आम्ही कीडनाशकाची फवारणी स्वत:वर करोन घेतली. असो.

काहीही करोन आमची भेट घेणे, हे त्याचे ब्रीद दिसत्ये. आम्हांस गाठून आमच्या हाती (खेळण्यातला) वाघ ठेविण्याचा छंद जणू त्यांस जडला आहे. गुदस्ता ह्याच इसमाने आमचे गडावर 55 किलो वजनाचा सात फुटी लांबीचा व साडेतीन फुटी उंचीचा वाघ आणोन ठेविला. वाघ खेळण्यातील आहे, हे मात्र त्याणे गुलदस्त्यात ठेविले. परिणामी, गडात वाघ शिरल्याची हाकाटी झाल्याने भलताच गोंधळ उडाला. अखेरीस आम्ही काही हाक्‍यें घेवोन मृगयेसाठी उतरलो. आमचा जहरी भाला त्या वाघाचा कोथळा काढणार इतुक्‍यात सदरील इसमाने "साहेब, तो कचकड्याचा आहे' ऐसे जाहीर केले. आम्ही म्हटले, "मग हरकत नाही. राहू दे त्यास येथेच. शेवटी वाघाचे गुहेतच वाघ शोभतो!' पुन्हा असो.

...परवाचे दिशी सदर इसमाने हद्द केली. गडावर प्रवेश मिळवोन त्याणें आम्हास गाठले. "काये आलांत? कवण काम?' ऐसी विचारणा आम्ही केली असता त्याणे आमचे हाती बांबूध्वज आणि एक खेळण्यातील वाघ ठेविला. आता खेळण्यातील वाघाशी खेळत बसण्याची आमची उमर नव्हे! पण पुंडपणांस मर्यादा काय होय? संतापजनक बात ही की सदर खेळण्यातील वाघ चक्‍क बोलका निघाला!! जेथ डरकाळी मारावी, तेथ म्यांव म्यांव ऐसा ध्वनि काढतो आणि जेथ म्यांव करणे इष्ट तेथे डरकाळी काढतो!! ह्याला काय म्हणावे? सदर मंत्र्याच्या ह्या वाघवाटप मोहिमेमुळे तमाम मराठी रयत रंजीस आली असून योग्य ती कारवाई करणे. अन्यथा गडावर येवोन पडलेले सर्व वाघ आम्ही एकाच खेपेत आपल्या वाड्यावर आणून टाकू. बाकी भोगा आपल्या कर्माची फळे!

अंमल करणे. बाकी ईश्‍वर पाहातोच आहे.

आपला. उधोजीमहाराज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com