आमचे मेघदूत! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 24 जून 2017

आषाढस्य प्रथम दिवसे सक्‍काळच्या पारी चाळीच्या सज्जाच्या कठड्यास ओठंगून उभे राहून दांतास मंजन करताना आमचीही आभाळाकडे नजर गेली. आम्हालाही तेथे एक ढग दिसला. त्या ढगास पाहून आम्हांस कळ आली!!

सर्वप्रथम आमच्या सर्व रसिक वाचकांस आषाढाच्या प्रथम दिवसाच्या शुभेच्छा. आज आषाढ लागणार हे आम्हाला सर्वात आधी कळते. कां की आमचे काम वाढते. आखाड आला की माश्‍या येतातच, आणि ही जमात मारण्यात आम्ही हयात खर्ची घातली असून त्यात विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे, हे आम्ही येथे नम्रपणे नमूद करु. पण आषाढ लागला की काही लोकांना काव्ये सुचतात!! ही फार गंभीर बाब आहे. आधीच काव्य हा दुर्धर रोग!! पावसात तर त्याची लक्षणे फार तीव्र होतात. मनुष्य इंपॉसिबल होतो. त्याची दोन ठळक़ उदाहरणे म्हंजे कविकुलगुरु कालिदास आणि दुसरे...आम्ही!!

इसवीसन चौथ्या ते सहाव्या शतकात कधीतरी कविकुलगुरु कालिदास नामे एक गृहस्थ होऊन गेले. माणूस (आमच्याप्रमाणेच) कंडम असावा! कां की त्यास काव्य करण्याची खोड होती. त्यांनी एका यक्षाची ष्टोरी लिहिली. हा यक्ष पत्रकार असावा. बायकूचे ऐकून कामात हलगर्जीपणा केल्याबद्‌दल त्यास कुबेर नामक बॉसने हाकून दिले होते. (खुलासा : हे सारे हजार-बाराशे वर्षापूर्वी घडले आहे...आत्ता नव्हे!!) कुबेर द बॉस अत्यंत कडक व सपशेल काव्यविरोधी होते. शिवाय सदर यक्षास शनिची साडेसाती असणार, असा आमचा कयास आहे. कारण तडीपारीच्या शिक्षेनंतर हा गृहस्थ सरळ आपल्या पायांनी चालत विदर्भात आला!! माणूस उगीच (आमच्या) विदर्भात का येईल? रामटेकच्या टेकडीवर घटकाभर टेकला असताना त्यास भयंकर गरम होऊन ऱ्हायले होते. अंगातील गंजिफ्राक काढून (थेट वऱ्हाडी पध्दतीने) छाती व बगला पुसून काढत त्याने सहजच आभाळात पाहिले. पाहातो तो काय! तिथे एक ढग!! त्या ढगास पाहून यक्षास एक दूतकाव्य सुचले. ते पुढे क्रमिक पुस्तक म्हणून चिक्‍कार खपले. वाचकहो, त्यास आपण आज "मेघदूत' असे संबोधतो.

सा मां पातु सरस्वती भगवती...आषाढस्य प्रथम दिवसे सक्‍काळच्या पारी चाळीच्या सज्जाच्या कठड्यास ओठंगून उभे राहून दांतास मंजन करताना आमचीही आभाळाकडे नजर गेली. आम्हालाही तेथे एक ढग दिसला. त्या ढगास पाहून आम्हांस कळ आली!! कळ आणि ढग एकाच वेळेस येणे हा निव्वळ योगायोग आहे, असे कोणाला वाटेल. पण तसे नाही. ढगाला पाहून आम्हाला भसाभसा ओळी सुचल्या. त्या अश्‍या-

बायकूचे ऐकूनका गड्या हो मरालगाळातजाल:
व्हाटृसॅपाणि फेसबुक:हिते बंद: ठेवाघड्याळ:
आषाढाच्या प्रथमदिवशी जोरा:त सुटली: हवा
झाला: ढगासग्यास की नकळे: कळहि लागे: जीवा

विस्मरुनी: घरात जैंव्हा निघाल: मोबाइल:
बाई: जात अतिहुश्‍शार: तैं पाहील की बाइल:
फोटोमेसेऽऽज: क्‍लिप: जोक: सारे पडे उऽऽघडे
टांगापल्टि: होत फराराश्‍व कीते जाईल: भल्तीकडे:

विसरावा: खुशालसेलघरीहि ठेवून: स्विचॉफ की:
किंवा नीटकरा: डीलीट सारे- दावाच मर्दूमकी:
आषाढाच्या प्रथमदिवशी जावे टेकडिवर:
आणि: पिटाळा ढगास:ऐसे फुक्‍काच ड्यूटीवर:

...वाचकहो, उपरोक्‍त मेघदूत आमचे असून ते संस्कृत वाटावे म्हणून आम्ही अधूनमधून टिंबे व विसर्गादि चिन्हे अचूक पेरली आहेत. ही कोड ल्यांग्वेज आम्हीच तयार केली असून तुमच्याकरवीच अन्य कुणाला तरी पाठवत आहो!! कां की तुम्हीच आमचे मेघदूत!! थॅंक्‍यू!!

Web Title: dhing tang article